शनिवार वाडा
शनिवार वाडा म्हणजे पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू. शनिवार वाडा ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली हा राजवाडा बांधला होता. त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र इंग्रजांनी या वाड्यावर कब्जा केला आणि हा वाडा जाळून टाकला. आता या वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो.
आगा खान पॅलेस
गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी,महादेव भाई यांच्यासाठी तुरूंगासाठी करण्यात आला होता. असं म्हणतात की महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे.
लाल महल
पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात कापली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.
सारसबाग
पुणे शहरातील स्वारगेट येथे सारसबाग आहे. हिरव्या गार झाडे आणि फुलझाडांनी नटलेली ही बाग पुणे शहराची शान आहे. बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिर आहे. या गणपतीच्या मंदिला तळ्यातला गणपती असे म्हणतात. बागेत व्यायाम आणि बोटींगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी फुलराणी नावाची एक रेल्वेदेखील साारसबागेत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या लहानमुलांना घेऊन पुण्यात जाणार असाल तर सारसबागेत जरूर जा.
पर्वती
पुणे शहरात सकाळी फिरायला जाण्यासाठी पर्वती हे ठिकाण नक्कीच उत्तम आहे. पर्वती ही छोटेखानी टेकडी आहे ज्यावर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुण्यात मॉर्निंगवॉकसाठी पर्वतीवर जाण्याची पद्धत आहे. पुर्वीच्या काळी पेशव्यांचे प्रार्थना करण्याचे ठिकाण म्हणून पर्वती प्रसिद्ध होती. सकाळच्या रम्य वेळी शुद्ध हवेत मेडीटेशन करण्यासाठी पर्वतीवर आजही लोक जातात.
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय
कात्रजमधील राजीव गांधी सर्पोद्यान जवळजवळ 130 किमीवर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये विविध जातीचे सर्प आणि जंगलातील प्राणीसंग्रहालय आहे. हे प्राणीसंग्रहालय फिरण्यासाठी कमीत कमी एक दिवस तुम्हाला लागेल एवढं मोठं आहे. दिवसभराच्या दगदगीतून निवांतपणा हवा असेल या उद्यानात नक्की जा.
तुळशीबाग
पुण्यात गेल्यावर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर पुण्यातील तुळशीबागेला जरूर भेट द्या. तुळशीबागेत तुम्हाला काय मिळेल यापेक्षा काय मिळणार नाही हेच विचारावं लागेल. कारण तुळशीबागेत तुम्हाला सौंदर्यसाधने, देवदेवतांच्या मुर्ती, भांडी-कुंडी, खेळणी, भेटवस्तू अशा सर्वच गोष्टींमध्ये निरनिराळे प्रकार मिळू शकतात.
विश्रामबाग वाडा
विश्रामबाग वाडा हा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव विश्रामबागेत राहणं पसंत करत असत. आता पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.