सुधागड
इतिहास
सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा.पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.शिवाजी महाराजांनी १६५७-५८ मध्ये जेव्हा आदिलशाही मुलुख जिंकला त्या वेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा.नारो मुकुंद सबनीस यांच्या कडे गड होता.शिवरायांनी या गडाचे भोरपवरून सुधागड असे नामकरण केले. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते.
इ.स. १६९४ साली याबाबत असा उल्लेख आढळतो की,’साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ या गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.
पहाण्यासारखी ठिकाणे
या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे, तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. येथे जंगलही बर्यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पायर्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांतील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही चोर दरवाज्यांकडे जात असे. ही वाट आता अस्तित्वात नाही. पाच्छापूर दरवाजा या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर ,तसेच धान्याची कोठारे, भाडांचे टाके, हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. गडावरील टकमक टोक वाडापासून आपण पायर्यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट हत्तीपागांमधून जाऊन, सरळ एका टोकावर पोहचते. रायगडावरील ‘टकमक’ टोकासारखेच हे टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.महादरवाजा सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट महादरवाज्यात आणून सोडते महादरवाजाच्या अगोदर २ दरवाजे लागतात. पहिल्या दरवाजा चढून आल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे टाकं आहे महादरवाजा हा रायगडावरील ‘महादरवाजा’ची हुबेहूब प्रतिकृती आहे. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम आहे. टकमक टोक/ बोलणारे कडे