संतोषगड
संतोषगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडा पासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे.शंभूमहादेव रांग ,बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड वारुगड महिमान गड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत.हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे.सर्व ठिकाणी वीज दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.फलटण च्या माण तालुक्यात असणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात.विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
ताथवडे गावात “बालसिद्धचे जीर्णोद्धार’ केलेले मंदिर आहे.मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे.या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे.या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे.एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे.मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते.मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते.पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते.येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते.आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे.दरवाज्यामधील पहारे कर्यांचा देवड्या आजही सुस्थितित आहेत.दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनूमानाचे टाके आहे.त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत.धान्य कोठारांच्या भिंति उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे.याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे लांब वरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मा त्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचं टाकं आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळ भिंतिला भोक पाडून पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावर असणारी संरक्षक तटबंदी , बुरुज आजही चांगल्या परिस्थित उभे आहेत.आजमितिस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात पण संतोषगड याला अपवाद आहे.