रोहिडा किल्ला (Rohida Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

रोहिडा किल्ला

इतिहास
या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली की ३० च होन का, तर राजं त्यावर म्हंटले की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायया पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर आहे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडाचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे.किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu