जवळ्या किल्ला
इतिहास
ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख “रोला-जोला” म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.
पहाण्याची ठिकाणे
रवळ्या आणि जवळ्या हे किल्ले ज्या पठारावर आहेत. त्या पठारावर एक वस्ती आहे. तिला तिवारी वस्ती या नावाने ओळखले जाते. वस्ती मध्ये शिरण्यापूर्वीच एक वाट जंगलामधून डावीकडे रवळ्यावर जाते. वाट सहजच सापडणारी नाही. थोडीशी शोधावी लागते. पण एकदा सापडल्यावर १५ मिनिटांतच आपण एका घळी पाशी पोहोचतो. वाटेत उजवीकडे कड्यामध्ये एक गुहा आहे. या घळीतून “चिमणी क्लाईंब” करुन वरच्या झाडापाशी जायचे. या झाडाच्या समोरच रवळ्याचा तुटलेला कडा आहे. या कड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. ज्याला गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असेल तो सहजपणे रोप न लावता सुध्दा येथून चढू शकतो. वर गेल्यावर समोरच एक भगवा झेंडा आहे. रवळ्याच्या माथ्यावर काही अवशेष नाहीत. दुसर्या टोकाला पाण्याची सुकलेली टाकी आहेत. माथ्यावरुन मार्कंड्याचे सुंदर दर्शन होते. आभाळ स्वच्छ असल्यास अचला आणि अहिवंत सुध्दा दिसतो.रवळ्या जवळ्या हे असेच दोन किल्ले आपल्याला एका पठारावर पहायला मिळतात. हे किल्ले साधारण ३.५ कि.मी. लांब व १.५ कि.मी.रुंद अशा मोठ्या पठारावर वसलेले दोन स्वतंत्र किल्ले आहेत. या दोन किल्ल्यांमधील अंतर साधारण १ कि.मी. असुन पठार चढुन आल्यावर एका दिवसात हे दोन्ही किल्ले पाहुन होतात. मुळाणे व बाबापुर हि या दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याची गावे असुन या दोन गावाच्या मध्ये असलेली मुळाणे बारी किंवा बाबापुर खिंड येथुन या किल्ल्यांवर जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. याशिवाय मुळाणे गावातुन देखील किल्ल्याखालील पठारावर जाता येते. नाशीकहुन वणीमार्गे बाबापुर खिंड हे अंतर ५३ कि.मी.असुन वणीपासुन हे अंतर ९ कि.मी.आहे. वणीहुन बाबापूर मार्गे या खिंडीत आल्यास डावीकडील वाट मार्कंडेय किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट रवळ्या जवळ्या खालील पठारावर जाते. खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे. पठारावर जाणारी वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नसली तरी दोन्ही गड संपुर्णपणे पहायचे असल्यास बाबापुर गावातुन अनुभवी वाटाड्या घेणे उत्तम. त्यामुळे कमी वेळात संपुर्ण गड व त्यावरील सर्व अवशेष पहाता येतात. उजवीकडील सोंडेवरून पठार चढायला सुरवात केल्यावर साधारण अर्ध्या तासाने समोर पठाराचा दुसरा भाग दिसतो व येथुन वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. वाट जेथुन उजवीकडे त्या ठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. खिंडीतुन पठारावर जाण्यास साधारण एक तास लागतो. रवळ्या जवळ्या किल्ले ओळखण्यात गोंधळ होऊ नये यासाठी मार्कंड्याच्या बाजुस असलेला जवळ्या व धोडपच्या बाजुस असलेला रवळ्या हे लक्षात ठेवावे. पठारावर आल्यावर समोरच त्रिकोणी आकाराचा जवळ्या किल्ला दर्शन देतो. येथुन उजवीकडून तसेच डावीकडुनही रवळ्या जवळ्या मधील खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. जाताना डावीकडुन गेल्यास व येताना उजवीकडून आल्यास जवळ्या किल्ल्याला संपुर्ण फेरी मारून होते व पठारावरील सर्व अवशेष पहाता येतात. या दोन्ही वाटा पुर्णपणे मळलेल्या आहेत. पठारावर काही ठिकाणी झाडीत लपलेले वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याला वळसा घालताना पुर्व बाजुस एका ठिकाणी ८-१० कबर व त्यावर कोरीव दगड दिसुन येतात. या कोरीव दगडावर दिवा ठेवण्याची सोय केलेली आहे. वाटेच्या पुढील भागात खडकात खोदलेले लहान पाण्याचे टाके असुन टाक्यात माती वाहुन येऊ नये यासाठी टाक्याचा डोंगराकडील भाग घडीव दगडांनी बांधुन काढला आहे. गडावर पिण्यायोग्य पाण्याचे हे एकमेव टाके असुन या टाक्यातील पाणी वर्षभर पुरते. टाक्याच्या काठावर दगडी ढोणी असुन काही अंतरावर कोरीव नंदी,शिवलिंग व पादुका पहायला मिळतात. टाक्याच्या वरील बाजुस अजुन एक खोदीव टाके असुन या टाक्यात जमा झालेले पाणी पाझरून खालील टाक्यात येते. टाक्याच्या समोरील बाजुस पठारावर ४-५ घरे असुन हि वस्ती तिवारी वस्ती म्हणुन ओळखली जाते. हे तिवारी सध्या नाशीक येथे राहायला असुन पावसाळ्यात किल्ल्याखालील गावातील गुराखी गुरांसह येथे राहायला असतात.