रत्नदुर्ग
इतिहास
रत्नदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली. १७५५ मधे रत्नदुर्ग आंग्रें यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मधे भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन १९८९ मधे या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली..रत्नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणार्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरुन संपूर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नागिरी शहराचा नजारा दीपगृहावरुन बघण्यासाठी संध्याकाळी ५.०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.