रामशेज किल्ला
ऐतिहासिक महत्व
प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी रामशेज किल्ल्यावर वास्तव्य केले. रामशेज किल्ल्यावर प्रभू श्रीरामांची शेज किंवा शैय्या असल्याचे वर्णन आहे. यावरूनच किल्ल्याचे नाव ‘रामशेज’ पडले असल्याचे समजते.शिवाय मराठ्यांच्या इतिहासात देखील महत्वाचा किल्ला म्हणून रामशेज गडाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्यावर वारंवार आक्रमणे केली. यामध्ये रामशेज गडाचे नाव देखील सामील होते.गड जिंकण्यासाठी त्याने आपला कर्तबगार सरदार शहाबुद्दीन खानाला पाठवले. मुघलांच्या हजारोंच्या सैन्याला मात्र काही शेकडो मावळ्यांनी शह दिल्याचे इतिहासात नमूद आहे. छत्रपती संभाजी राजेंनी महाराजांच्या पाठीशी हा किल्ला मोठ्या शिताफीने लढवला.जवळपास सहा-साडेसहा वर्षे चाललेल्या या दीर्घ लढ्यात मुघलांनी हत्ती, घोडे व तोफांनीशी सर्व ताकदीने हल्ला चढवला. परंतु त्यांना यश काही हाती लागत नव्हते. दुर्भाग्याने गडाचा किल्लेदार मुघलांना फितूर होऊन हा गड मुघलांच्या ताब्यात गेला असे इतिहासात नमूद आहे.रामशेज गड हा नाशिक जिल्ह्यात असून स्वराज्यातील इतर गडांसारखा दऱ्याखोर्यांत किंवा फार उंचीवर नसून सपाट भूभागावर आहे. हा गड सर्व बाजूंनी चढता येऊ शकतो. लहान ते वयोवृद्ध दुर्गप्रेमी या गडावर सहज चढू शकतात. अगदी तास-अर्धा तासात आपण हा गड सर करू शकतो.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
हा गड फार विस्तारलेला नसून याचे क्षेत्र तसे कमीच आहे. गडाजवळ प्रभू श्रीरामांचे मंदिर असून सोबत माता सीता, लक्ष्मण, व भक्त हनुमान विराजमान आहेत. पाण्याचे कुंड, सीता गुंफा इ. पौराणिक स्थळे आहेत. सितागुंफेतून गडावर जाण्यासाठी एक बोगदा असल्याचे म्हटले आहे. गडावरील कोरीवकाम अतिशय सुरेख व आकर्षक आहे.यांशिवाय पाण्याच्या टाक्या, बुरुज हे पाहण्यासारखे आहे. गडावर चढताना एक शिलालेख दिसतो. ज्यावर गडाचा इतिहास कोरलेला आहे. हा लेख वाचल्यावर अंगावर काटा उभा राहतो. गडापासून साधारणतः ८ कोसांवर त्र्यंबकगड आहे. रामशेज गडावरून आपण सातमाळा डोंगररांग बघू शकतो.