राजमाची किल्ला
इतिहास
राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. यालाच ‘कोंढाणे लेणी’ असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणचा दरवाजा’संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येताना वाटेतच गडाच्या वेशीजवळ एक वीरशिल्प व स्मृतीशिळादिसते. जवळच तटबंदीचे व बुरुजांचे अवशेष तसेच गणपति आणि मारुतीचे लहान मंदिर आहे. तेथून पुढे मार्ग श्रीवर्धनगडाला वळसा घालून किल्ल्याच्या माचीवरील ‘उधेवाडी’ गावात येतो. गावात मारुतीचे मंदिर आहे. गावाच्या उत्तरेस असलेल्या खिडकीच्या वाटेने कोकणात कोंढाणे लेणी कडे उतरता येते. उधेवाडीच्या दक्षिणेस देवराई असून पलिकडे महादेवाचे जूने मंदिर व उदयसागर तलाव आहे. ह्या तलावावर एक शिलालेख असून तलावाशेजारी चुणा मळण्याचा घाणा व दगडी चाक आहे. महादेव मंदिरामागील पठारावर काही स्मृतीशिळा आहेत. पश्चिमे दिशेला कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. श्रीवर्धन व मनरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मुर्त्या आहेत. मंदिरा समोरुन श्रीवर्धनगडावर तर मंदिरामागून मनरंजनगडावर वाट जाते.
मनरंजन उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. या किल्ल्याला दोन दरवाजे असून दोनहक दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाहीत. मनरंजनच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू, एक मोठा तलाव व काही इमारतींचे अवशेष आहेत. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व तीन चार मोठे बुरुज ह्ता तटात आहेत. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाक, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.
श्रीवर्धन राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्यापैकी सुस्थितीत आहे.दरवाजाची कमान बर्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत. किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहे. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदिचा म्हणजेच चिलखती बुरज आहेत. गडाच्या माथ्यावरुन लोहगड , तुंग, मोरगिरी , कोरीगड , घनगड, बहिरान पठार , खंडाळा, सोनगिरी, माथेरान , ढाक हा परिसर दिसतो.