प्रचितगड (Prachitgad fort)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

प्रचितगड

प्रचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील किल्ला. तो शृंगारपुर या गावाजवळ ५४० मी. उंचीवर आहे. किल्ल्याकडे येणाऱ्या दोन्ही वाटा सह्याद्रीची मुख्य रांग व किल्ला यांमधील खिंडीत एकत्र येतात.प्रचितगड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दक्षिण टोकाकडे भवानी देवीचे घुमटी सदृश्य मंदिर आहे. मंदिरात मुख्य दोन मूर्ती दिसतात. एक मूर्ती अंदाजे ३ फूट उंच असून ती भैरवाची असावी, तर दुसरी मूर्ती २.५ फूट उंच असून ती देवीची आहे. या मूर्तींच्या हातात ढाल, तलवार व डोक्यावर मुकुट आहे. वस्त्र व अलंकार परिधान केलेली ही मूर्ती सुबक आहे. जेव्हा किल्ल्यावर राबता होता, तेव्हा मंदिर मोठे असावे. सध्या मंदिराची घुमटी, गाभाऱ्याची जागा व सभामंडपाचे प्रशस्त जोते दिसून येते. या जोत्यावर चार तोफा ठेवलेल्या दिसतात. तोफा अंदाजे साडेचार ते पाच फूट लांबीच्या आहेत. या तोफांना चुना लावलेला आहे, त्यामुळे तोफा पांढर्‍या रंगाच्या दिसतात.

मंदिरातील भवानी देवीच्या घुमटीसमोर म्हणजेच अंदाजे १५ ते २० फूट अंतरावर एक दीपमाळ असून त्याच्याजवळच एका देवीची छोटी मूर्ती आहे. मंदिरातील भवानी देवीची घुमटी हा गडाचा सर्वोच्च माथा. मंदिरापासून पूर्वेकडे ३० फूट खाली थोडी सपाटी आहे. येथे कातळात लेण्यासारखी खोदलेली पाण्याची टाकी असून त्याला खांब आहेत. खडकात खोदलेली एकूण पाच टाकी या भागात दिसतात. ही टाकी आतून एकमेकांना जोडलेली आहेत. टाकी पूर्वेकडे तोंड करून गडाच्या माथ्याच्या पोटात आहेत. टाक्याबाहेरील सपाटी ही गडावरील सध्याची मुक्कामाची जागा होय.गडाच्या दक्षिणेकडील भागात एक कोठार आहे. कोठाराचे छप्पर शिल्लक नसले, तरी भिंती सुस्थितीत आहेत. कोठारात किंवा कोठार सदृश्य या बांधकामात दिवा लावण्यासाठी छोटा कोनाडा केलेला दिसतो. कोठाराशेजारून वाट गडाच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकावर जाते. कोठारसदृश्य भागाजवळ आणि भवानी मंदिराजवळ बांधकामाची काही जोती दिसून येतात. गड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा वेगळा झालेला दिसतो. गडाला एकूण १८ बुरूज असल्याचा उल्लेख असून प्रत्यक्षात आज गडाचे १२ बुरूज अस्तित्वात आहेत. गडावर पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे गडावरील अवशेष हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला दिसतो. सूर्यराव सुर्वे हे संगमेश्वर व शृंगारपूर या भागाचे आदिलशाहाचे सरदार होते. त्यांच्या अंमलाखाली शृंगारपूर व प्रचितगड होता. छ. शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६१ मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्यावर स्वारी करून प्रतिचगड जिंकून घेतला. छ. शिवाजी महाराजांनी प्रचितगड घेतल्याचे उल्लेख शिवभारत, जेधे शकावली व शिवचरित्र प्रदीप या ग्रंथांमधे येतात. परंतु सभासद बखरीमध्ये छ. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रचितगडचे नाव येते. याचा अर्थ असा की, किल्ला महाराजांनी बांधला; परंतु काही काळ तो सुर्व्यांकडे होता व नंतर परत महाराजांनी तो घेतला. छ. संभाजी महाराजांच्या काळात प्रचितगड हा स्वराज्यातच होता, कारण छ. संभाजी महाराजांचा मुक्काम प्रचितगडच्या पायथ्याशी असलेल्या शृंगार पूरमध्ये अनेक वेळा झालेला होता. किल्ल्यांवरील वास्तू व इतर अवशेष पाहून किल्ला कधीच मोगलांकडे किंवा मुस्लिम सत्ता धीशांकडे गेला नसावा. मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून घेतला (१८१८). किल्ला जिंकल्यावर तो पाडल्याचे उल्लेख येतात; परंतु किल्ला न पाडता किल्ल्यावर जाणारे रस्ते सुरुंग लावून उडविण्यात आले.खिंडीतून पुढे एका शिडीवरून किल्ल्यावर पोहोचता येते. पुढे कातळात खोदलेल्या १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात. दरवाजाची कमान अस्तित्वात नसली तरी कमान ज्या खांबांवर उभी होती ते खांब आहेत. दरवाजा उत्तराभिमुख असून दरवाजावर शिल्पकाम होते की नाही हे समजून येत नाही. दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी देवड्या नाहीत. किल्ल्यात थोड्याच अंतरावर मंदिर व बांधीव तलाव टाके आहे. यात बारमाही पाणी नसते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d