मांगी तुंगी किल्ला
बागलाण सुपीक, सधन आणि संपन्न असा मुलूख आहे. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते, ती या बागुलगेड बागलाण विभागातूनच होते. येथे असणार्या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड आहे. मांगी तुंगी ही जैन लेणी आहेत. परंतू बागलाण मधील किल्ल्यांची भटकंती मांगी तुंगी या सुळक्यांना भेट दिल्या शिवाय पूर्ण होत नाही. मांगीतुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे आहेत.मांगी तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा पंचकल्याणक, प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये संपन्न झाला. हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे एकोणीस वर्षे एवढा अवधी लागला.ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम १२० फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्याबरहुकूम ही मूर्ती घडविण्यात आली. मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता.
त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली, संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखांचाही अभ्यास करण्यात आला. संस्कृत, ताडपत्रांवरील ग्रंथ, तामिळ, कन्नड, तेलगू, वैष्णव ग्रंथ, द्रविड, हीडा, ग्रीक मायथॉलॉजी आदी ग्रंथांतील वर्णनांचा अभ्यास झाला. त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले. त्याचे रूपांतर फुटांत करून मूर्तीचे परिमाण निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाली आहे. त्यामुळे मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे जागतिक तीर्थस्थळ होऊ घातले आहे.अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या बॅसाल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वांग सुंदर मानली जात आहे. जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या या १०८ फुटी मूर्तीची नोंद लवकरच गिनीज बुकमध्ये केली जाणार आहे.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
मांगी सुळक्याच्या पोटातील गुहांमधे महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यातील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. बलभद्र म्हणजे श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, जैन पुराणात त्याचा बलभद्र म्हणुन उल्लेख येतो. बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे. डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते. मांगी तुंगी या दरम्यानच्या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण व बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडेवर आहेत. तिथेच एक पाण्याच कुंड आहे. त्याला कृष्णकुंड म्हणुन ओळखले जाते. मांगी सुळक्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. या मार्गावर जागोजागी २४ तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. उन -वारा – पाऊस यामुळे या मुर्ती झिजलेल्या आहेत. गुहा मंदिराच्या बाजूला पाण्याची टाक आहेत. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. मांगी पेक्षा तुंगीवर कमी गुहा कोरलेल्या आहेत. त्यात जैन तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. त्यातील एका गुहेला बुध्द गुहा म्हणतात. तुंगी सुळक्यालाही प्रदक्षिणा मार्ग आहे.