मानगड (Mangad fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

मानगड

शिवाजीराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या प्रभावळीमध्ये सोनगड, चांभारगड, पन्हाळगड, दौलतगड अशा अनेक लहान किल्ल्यांची वर्णी लागलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील निजामपूर गावाजवळ अतिशय लहानसा किल्ला सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या भाऊगर्दीत त्याचे स्थान अढळपणे टिकवून उभा आहे. ज्या किल्ल्यामुळे त्या तालुक्याला माणगाव हे नाव प्राप्त झाले तो अतिशय सुंदर दुर्ग म्हणजे किल्ले मानगड. मानगडाला भेट देण्यासाठी पुण्याकडच्या ट्रेकर्सनी ताम्हिणी घाटातून माणगावच्या रस्त्यावर असणारे निजामपूर गाव गाठावे रायगडाच्या पायथ्याला असलेले छत्री निजामपूर आणि हे निजामपूर ही दोन वेगळी गावे आहेत. मुंबई कडच्या दुर्गप्रेमींनी मुंबई-गोवे महामार्गावरच्या माणगाव मार्गे दहा किलोमीटरवर असलेल्या निजामपूरमध्ये दाखल व्हावे. निजामपूर गावातून रायगड पायथ्याच्या पाचाड गावात रस्ता गेला आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्‍यास वाटेत बोरवाडी हे छोटे गाव लागते. त्याच्या पुढे असलेल्‍या मशिदवाडीतून गडावर प्रशस्त पायवाट गेली आहे. निजामपूर ते मशिदवाडी या रस्त्यावर मानगडाचा रस्ता दाखवणारे मार्गदर्शक फलक बसवण्यात आले आहेत. निजामपूर गावातून मानगडावर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट असून, त्या वाटेने सुमारे पंधरा-वीस मिनिटे सोपी चढण पार केली, की गडाच्या अर्यासूवर असणारे विझाईदेवीचे कौलारू मंदिर आहे. विझाई मंदिराच्या जवळच दगडात कोरलेल्या दोन मूर्ती आहेत. शेजारी छोटी दगडी दीपमाळ आहे. विझाई मंदिरापासून गडाकडे नजर टाकली, की दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये बंदिस्त झालेला, पण कमान हरवलेला गडाचा दरवाजा दिसतो.

मंदिरापासून खोदीव पायऱ्यांच्या मार्गाने पाच मिनिटांत गडाच्या दरवाज्यात येऊन पोचता येते. मानगडाच्या मुख्य दरवाज्यापासून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा फुटल्या आहेत. मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, गडाच्या मूळ वैभवाला धक्का न लावता त्यांनी गडाला नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. संस्थेने संपूर्ण गडावर अवशेषांची दिशा दाखवणारे फलक बसवले आहेत. मानगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान जवळ असून त्याच्यावर मासा आणि कमळ यांचे शिल्प कोरलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारा तून डावीकडे गेल्यास समोर धान्यकोठारसदृश खोली आहे. कोठाराच्या बाहेर एक व समोरच्या बाजूला एक अशी पाण्याची दोन टाक्‍या आहेत. तेथून सरळ गेले, की गडमाथ्याचा मार्ग दाखवणारी पाटी असून तेथून काही खोदीव पायऱ्यांच्या अतिशय सोप्या मार्गाने केवळ दोन ते तीन मिनिटांत थेट गडमाथ्यावर दाखल होता येते. मुख्य दरवाज्यातून उजवीकडे जाणारी पायवाटही गडमाथ्यावरच घेऊन जाते, पण उतरताना त्या बाजूने उतरल्यास चहुबाजूंनी किल्ला बघता येऊ शकतो. गडमाथ्यावर ध्वजस्तंभ असून त्याच्या जवळच पाण्याच्‍या दोन टाक्‍या आहेत. पायथ्याच्या मशिदवाडी गावाचे; तसेच, मानगडाशेजारच्या कुंभ्या घाटाजवळच्या धन्वी शिखरांचे विहंगम दृश्य ध्वजस्तंभापासून दिसते.

गाव ध्वजस्तंभापासून डावीकडे ठेवून पुढे जाणे झाले, की मानगडावरच्या काही जोत्यांचे अवशेष आहेत. ते अवशेष पाहून पुढे गेल्यास डावीकडे पिराचे स्थान असून त्याच्यासमोर विस्तीर्ण पटांगण आहे. तेथे जवळच काही भग्न जोती बघायला मिळतात. मानगडाचा माथा लहान असून, साधारणपणे अर्ध्या-पाऊण तासात गडमाथा व्यवस्थित पाहून होतो. गडावर चढणे झाले, त्याच्या विरुद्ध बाजूने उतरायला सुरुवात केली, तर पुन्हा मुख्य दरवाज्याच्या जवळ येणे होते. मानगडाचे मुख्य आकर्षण असलेला चोर दरवाजा तेथूनच पुढे गेल्यावर आहे. गडमाथा थोडासा उतरून पुन्हा निजामपूरच्या दिशेने जाऊ लागलो, की उजवीकडे पाण्याच्या खोदीव टाक्यांची मालिका आहे. त्या वाटेने सरळ पुढे गेल्यास अखेरीस नजरेस पडतो तो गडाचा छोटा, पण अतिशय देखणा चोर दरवाजा! ‘दुर्गवीर’च्या सदस्यांना गडाच्या या बाजूला काम करत असताना काही पायऱ्या आढळून आल्या. त्यांनी उत्सुकतेने त्या भागातील माती दूर केल्या नंतर त्यांना जमिनीत पूर्णपणे गाडला गेलेला दरवाजा सापडला आणि मानगडाचे आणखी एक वास्तुवैभव प्रकाशात आले. मानगडाच्या चोरदरवाज्याला व्यवस्थित पायऱ्या असून स्थानिकांच्या मते तेथून खाली उतरणारी वाट चाच या गावी जाऊन पोचते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu