महिमानगड (Mahimangad)




महिमानगड

महिमानगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे.महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा – पंढरपूर रस्त्यावर महिमानगड गाव आहे . गावाच्या मागे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर असलेला महिमानगड किल्ला त्याच्या ताशीव कातळ कड्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो. स्वत:चे वाहन असल्यास एका दिवसात महिमानगडा बरोबर माण तालुक्यातील वर्धनगड,शिखर शिंगणापूरचे मंदिर व गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर पाहाता येते.आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर पंढरपूर सातारा वाई महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
वाडीतील मंदिरापासून एक वाट गडावर जाते. या वाटेवरुन गडाच्या दरवाजाचे बुरुज दिसतात. वळणावळणाने ही वाट दरवाजापर्यंत जाते. या वाडीतील जनावरे अनेकदा गडावर चरायला नेतात. त्यामुळे अनेक ढोरवाटा तयार झालेल्या आहेत.या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याची टाकी कोरलेली आहे. पैकी एकात झाडी गच्च माजलेली असून दुसरे गाळाने पूर्ण भरले आहे. तिसर्‍यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मुळे वाटेवर येवू शकतो. येथून गडात शिरणारा मार्ग दिसतो. तो उत्तरेकडून असला तरी तो वळवून आत घेतला आहे. आत मधे दरवाजा पुर्वाभिमुख बांधलेला होता.

इथल्या तटबंदीवर एक झाड वाढलेले आहे. झाडाच्या असंख्य मुळ्यांनी तटबंदीला चांगलेच जखडले आहे. अर्थात हे दृष्य अनेक ठिकाणी पहायला मिळते. पण महिमानगडाच्या या झाडाची तर्‍हाच काही और आहे. हे झाड उभे वाढलेले नाही तर आडवे वाढले आहे. ते जमिनीला समांतर असे चाळीस पन्नास फूट पुढे आले आहे. त्याचे वजन त्या तटबंदीने कसे पेलले याचे आश्चर्य वाटते.महिमानगडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली आहे. कमानीच्या बाजूचे उभे खांब मात्र अजून तग धरून आहेत. सुबक घडीव दगडाच्या या खांबांच्या खालच्या बाजूला देखणे असे हत्ती कोरलेले आहेत. कोणीतरी तिथली दगडमाती काढल्यामुळे हे हत्ती दिसू लागले आहेत. दरवाजाच्या समोर वळणदार भिंत अणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रुपासून संरक्षण दिलेले होते, असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ होते.

शत्रूपासून नाही पण काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून आपण गडामधे प्रवेश करतो. डावीकडील वाट गडाच्या माथ्यावर जाते. तर समोरची वाट तटबंदीकडे जाते. या वाटेने तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे काळजीपुर्वकच फिरणे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहे. हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा राखला आहे. या तटबंदीमध्ये दोन दिंडीदरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील दिंडी दरवाजा दगडी ढासळल्याने बंद आहे.गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा मुलूख दिसतो. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगर ही दिसतो. महिमानगडाच्या माथ्यावर घरांचे अवशेष एक कबर. एक हनुमानाचे मंदिर तसेच किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.या माथ्याच्या उतारावर पाण्याचे टाके आहे. खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहे. असे टाके इतर किल्ल्यांवर आढळत नाही. अर्थात हे टाके पुर्वी बुजलेले होते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड