कमळगड किल्ला
कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतर च्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात.धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरे कडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.कमळगड किल्ला कोणी बांधला याबद्दल माहिती उपलब्ध नाही मराठा साम्राज्याच्या वेळी हा किल्ला विजापूरच्या मोकासदार यांच्याकडे असल्याचा उल्लेख आहे.मोडी लिपीत असलेल्या उल्लेखां वरून या किल्ल्याचे नाव कत्तलगड असल्याचे समजते. १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर गडाच्या निकट पोहचता येते. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदर्यांचा सुंदर मुलूख दृष्टिपथात येतो. अन्य किल्ल्यावर आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत.गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरी चे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. या ५० – ५५ खोलखोल पायर्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.
गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथर्यांचे अवशेष दिसतात. नैर्ऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.जवळच मराठी कवी वामन पंडित यांची भोमगावाला समाधी आहे.आकोशी गावातून दिड ते पावणे दोन तासाच्या चालीनंतर आपण गडावरील लोखंडी शिडीपाशी पोहोचतो.शिडी चढून गेल्यावर गडमाथ्याच्या सपाटीवरून आजु बाजूचा डोंगरदर्यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथात येतो.गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा-नवरीचे डोंगर म्हणतात.पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते.त्याला आत उतरायला मजबूत पायर्याही आहेत. हिलाच गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात.विहिरीच्या वरच्या बाजूला कातळात कोरलेले टाके आहे.गडावर एक गोरक्षनाथांचे मंदिरसुद्धा आहे.गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे.