कल्याणगड किल्ला (Kalyangad fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

कल्याणगड किल्ला

कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. साता-यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला आपण पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट म्हणजे चढण्यास सर्वात सोपा. संपूर्ण प्रदेश ऊसामुळे सधन झालेल्या शेतक-यांचा प्रदेश. त्यामुळे एसटीची सोय देखील उत्तम प्रकारची आहे.कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ‘नांदगिरीचा किल्ला’. सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स. ११७८ ते इ.स.१२०९ या कालावधीत बांधला गेला असावा. शिलाहाराच्या सापडलेल्या अनेक ताम्रपटावरून असे दिसते की शिलाहार राजांनी जैन लोकांना अनेक दानधर्मेकेली, आणि कल्याणगडावरील गुहेत असणा-या पार्श्र्वनाथांच्या मूर्तीवरून हा गड शिलाहारांनी बांधला असावा हे सिद्ध होते. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर याचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. पुढे पेशव्यांमध्ये व प्रतिनिधींमध्ये वितुष्ट निर्माण झाले आणि हा किल्ला पेशव्यांकडे आला. पेशव्याने इ.स. १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
किल्ल्यावर चढताना दोन दरवाजे लागतात. पहिला दरवाजा हा उत्तराभिमुख आहे. यातून आत शिरल्यावर समोरच एक मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूने तटबंदीच्या अनुरोधाने एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरल्यावर समोरच एक भुयार लागते. हे कल्याणगडावरील सर्वात प्रेक्षणीय स्थान आहे. हे भुयार जवळजवळ ३० मीटर आत आहे. भुयारात जाणा-या वाटेच्या दोन्ही बाजूला १२ महिने पाणी असते.वाटेच्या आजुबाजूला लोखंडी सळया लावलेल्या आहेत.भुयाराच्या शेवटी नवव्या शतकात घडवलेली पार्श्र्वनाथांची मूर्ती, पद्मावती देवीची मूर्ती आणि श्री दत्तात्रेयाची मूर्ती अशा ३ मूर्त्या आहेत. भुयारात बॅटरी घेऊन जाणे आवश्यकच आहे. पावसाळ्यात भुयारात उतरणे धोक्याचे आहे. हे भुयार पाहून परत पहिल्या दरवाजापाशी यावे. येथून वर जाणारी पाय-यांची वाट आपल्याला दुस-या पूर्वाभिमुख दरवाजापाशी घेऊन जाते. या वाटेने गडावर प्रवेश करून समोरच हनुमान मंदिरातील हनुमानाचे दर्शन घेता येते. डावीकडे गेल्यावर एक बामणघर लागते. या घरात सध्या एक साधू तपश्चर्येसाठी बसतो. बामणघराच्या समोरच कल्याणस्वामींची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन पुढे निघावे. वाटेतच श्री गणेशाचे पडीक मंदिर व एक मोठे तळे लागते. थोडेसे अंतर चालून गेल्यावर गडावरील वाडांचे अवशेष दिसतात. या वाटेने १० मिनिटे पुढे गेल्यावर गडाच्या पूर्व टोकापाशी आपण पोहचतो. या टोकावरून समोरच जरंडा, अजिंक्यतारा, यवतेश्र्वर, चंदनवंदन, मो-या, वैराटगड ही ठिकाणे दिसतात. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी (धुमाळवाडी) गावातून वर येते. सातारा एसटी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारारोड ते नांदगिरी हे ३ कि.मी.चे अंतर आहे. येथून किन्हईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किन्हई बसने नांदगिरीला उतरावे. गावातून गडावर जाण्यास ४५ मिनिटे लागतात. वाटेतच एक गुहा लागते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu