हातगड किल्ला
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील सातमाळा रांगेचा प्रारंभ म्हणजे हतगड हा किल्ला होय. सुरगाणा तालुक्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी हतगड हे गाव वसलेले असून पलीकडे गुजरात राज्याची हद्द जेथून सुरू होते ते सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण अगदी जवळ आहे. शिवरायांनी हा किल्लाबांधला असून काही काळ येथे वास्तव्य केले होते. त्यांनी सुरतची ऐतिहासिक धाडसी लूट ह्याच किल्या वरून केली होती. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हतगड हा किल्ला नाशिक जिल्ह्याचा एक महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू आहे.हतगड हे आदिवासी वस्ती असलेले गाव असून या गावातून हतगड किल्यावर पूर्वी एक कातरवाट होती. या वाटेवरून किल्याचे दर्शन घेण्यासाठी जात असताना वाटेवर मारूती व गणेशाची शिल्पे आपल्याला दिसतात. पुढे चालत गेल्यावर तटबंदीची नजाकत नक्षीदार बुरूज अस्ता व्यस्त दगडांची वाट, खांबावर कोरलेले शिलालेख, ठिकठिकाणी लपलेल्या गुहा आपल्याला खुणावतात व रोमहर्षक इतिहासाची आठवण करून देतात. सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरूवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. या सातमाळ रांगेची किल्ला म्हणजे जणू काय एक तटबंदीच. याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे. त्याचे नाव हतगड. या भागातील जनजीवन तसे सामान्यच आहे. फार थोड्या आधुनिक सुविधा येथपर्यंत पोहोचल्या आहेत.हा किल्लामुघलांच्या वर्चस्वाखाली दीर्घकाळ असल्यामुळे एकूण बांधकामाची रचना बघता मुघलशाहीचे वर्चस्व जाणवते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात. पहिल्या दरवाजाच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याची टाकी लागते. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मुर्ती आहे. गडाच्या पहिल्याच दरवाजाचे फक्त खांब शिल्लक आहे. या दरवाज्या जवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत. थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगीसार ‘या दरवाजातून आत शिरतो. या दरवाजाला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण होते. बाजुला एक गुहासुद्धा कोरलेली आहे. यात पाण्याच्या तीन टाक्या आहेत. या दरवाजातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो. गडमाथा खूप विस्तीर्ण आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यासाठी एक तास लागतो. दरवाजातून वर आल्यानंतर पायऱ्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते. येथे मोठ्या प्रमाणावर तटबंदी आहे. जी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे.समोरच एक पीर आहे. उजव्या बाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे व पाण्याची एक टाकी आहे. हे सर्व बघून झाल्यानंतर आल्या वाटेने परतायचे. आता दरवाजाच्या उजवीकडील वाट धरावी. येथे थोडे वर गेल्यावर पाण्याची टाकी लागते. थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष दिसतात. येथे एक बुरूज वजा इमारतही आहे. थोडे खाली उतरल्यावर पाण्याचा एक तलावसुद्धा आहे. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. तलावाच्या समोरच किल्याचे मोठे पठार आहे. किल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही बऱ्यापैकी भक्कम आहे. तलावा च्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते. वाटेत पाण्याच्या अनेक टाक्या पहावयास मिळतात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरूज आहे. संपूर्ण गड फेरीस एक तास पुरतो. असा हा हतगड नाशिकपासून 80 किमी अंतरावर आहे. नाशिकवरून एका दिवसांत सहज जाऊन पाहता येते.