गाळणा किल्ला
गाळणा किल्ला नाशिकपासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचा उल्लेख मध्ययुगा केळणा असाही झाल्याचे दिसते. गाळणा किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ७१० मीटर, म्हणजे साधारण २, ३२९ फूट आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला पांजरा नदी खोरे, उत्तरेला तापी खोरे, तर त्याच अंगाला सातपुडा पर्वतरांग दिसते. पूर्वेला खान्देश मुलूख व लळिंग किल्ल्याचे टोक दिसतं. पश्चिमेला सातमाळा रांगेतला धोडप, कंकराळा व इतर शिलेदार नजरेत भरतात.या सगळ्यांत गाळणा आपल्या वैभवशाली स्थापत्य वैशिष्ट्यांमुळे आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. किल्ल्यावरील मशीद, कातळात कोरलेल्या गुहा, पडका रंगमहाल, वाडा, अजूनही उभी असलेली दिमाखदार तटबंदी, बुलंद बुरुज, देखण्या पायवाटा, एखाद्या किल्ल्याला सजविण्यासाठी सज्ज झालेली शिल्प, सुंदर महिरपी, अनेक फारसी व देवनागरी शिलालेख, अंबरखाना, किल्ल्यावरील देखण्या बारवा व पाण्याची टाके, मंदिरे, गुहा, असंख्य थडगी व त्यावरील नक्षीकाम, एखाद्या किल्ल्याच्या बुलंदपणाला साज चढविणारे किल्ल्याचे चार प्रवेशद्वार म्हणजे परकोट, लोखंडी, कोतवाल व लाखा नावाचे चार बुलंद दरवाजे, अशा दुर्ग अवशेषांनी गाळणा किल्ला ऐश्वर्यसंपन्न झालेला दिसतो.
या किल्ल्याच्या लढायांची गाथा सांगणाच्या तोफा आता नाहीत. त्यांची कमतरता येथील साधारण २८-२९ शिलालेख भरून काढताना दिसतात. त्यातील अनेक आपण गमावले आहेत. आहेत त्यांची अवस्था बिकट आहे. गाळणा किल्ल्यावरील या शिलालेखांतून किल्ल्यातील घडामोडी व त्या त्या काळात किल्ला कसा घडत गेला, यांचा इतिहास नोंदविला आहे. गाळणा किल्ल्याचा इतिहास म्हणजे बागुलवंशीय राजे, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज यांच्यातील लढायांचा इतिहास, असे म्हटले जाते. १४ व्या शतकापासून या किल्ल्याचे व या विविध राजसत्तांच्या लढायांचे, त्यांच्यातील तहाचे आणि कुरघोड्यांचे संदर्भ तत्कालीन अनेक मुस्लिम ग्रंथांत व पत्रव्यवहारातून वाचायला मिळतात. या राजसत्तांनी किल्लावर राज्य केले. एवढेच नव्हे, तर प्रत्येकाने किल्ला अधिकाधिक बुलंद करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. त्यांनी किल्ल्यावर तटबंदी, बुरुज, महालांची कामे केल्याचे दिसते. किल्ल्याच्या उत्तरेकडील एका बुरूजावर १५८३चा शिलालेख असून, तो बुरुज बांधणारा महंमद अलीखान याच्या नावाचा आहे. आणखी एका बुरुजावर १५८७चा पर्शियन शिलालेख आहे. त्यापूर्वीच्या म्हणजे १५६२-६३, १५६६-६७, १५६९-७० आणि १५७०-७१ या वर्षातील चार शिलालेखांत ‘अफलातून खान’या निजामशाही किल्लेदाराचा उल्लेख येतो. त्याने गाळण्याच्या किल्ल्यावर प्रचंड बांधकाम केले. हे बांधकाम ‘हुशीसिराजी’ आणि ‘हाकिमी गालीबखान या तंत्रज्ञांनी केल्याचा उल्लेखही शिलालेखांतून येतो. १५७७ ते १५८० या काळात हैबतरखान। हा गाळण्याचा निजामशाही किल्लेदार होता. तो आबिसिसन हबसी मुसलमान होता.
त्याने किल्ल्यात निजामशहासाठी ‘मुराद’ नावाचा खास राजवाडा बांधला. या राजवाड्याची इमारत बनविणारा तंत्रज्ञ मराठा असून, त्याचे नाव ‘दत्तो त्रिमुरारी’ असे होते. यावरून गाळण्याच्या बांधणीत स्थानिक स्थापत्यशास्त्रींचे योगदानही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.काळाचा शोध गाळणा किल्ला नेमका कोणी बांधला, याचा उल्लेख नाशिकमधील इतर किल्ल्यांप्रमाणेच कोठे मिळत नाही. काही अभ्यासक हा किल्ला बागुलवंशीय राठोडांनी १३व्या शतकात बांधला असावा, असे मानतात. हा किल्ला यादवकालीन असेल का? या किल्ल्याची बांधणी देवगिरीशी मिळतीजुळती वाटते का? हा संशोधनाचा विषय असला, तरी या अंगाने आजपर्यंत याकडे कोणीही पाहिलेले नाही. हे एका विशिष्ट पद्धतीने किल्ला पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे घडले असावे. गाळणेश्वर मंदिर यादवकालीन असेल का, हे शोधण्यासाठी आता तेथे मंदिराचे अवशेष मिळत नाहीत. मग हा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. गाळणा हा किल्ला यादव कालखंडापासून अथवा त्यापूर्वीपासून असावा,असे म्हणण्यासाठी आणखी एक दुवा पायथ्याच्या गाळणा गावातील जमिनीत गाडल्या गेलेल्या पाताळेश्वर महादेव मंदिरावरूनही समोर येतो.
या मंदिराची बांधणी आणि तेथील शिल्प या मंदिराचा कालखंड बाराव्या शतकाआधी असल्याचे सांगतात. किल्ल्यावरील मंदिर आणि गावातील मंदिर हे एकाच कालखंडातील असावेत, या तकला येथे बळ मिळते; कारण बागुलांनी मंदिर बांधल्याचे पुरावे नाहीत. नाशिक परिसरात दगडी बांधणीची प्राचीन मंदिरे ही यादव कालखंडानंतर झालेली दिसत नाहीत.डोंगरावरील किल्ला आणि पायथ्याचे गाळणा हे गाव वेगवेगळे नाहीत. गावही किल्ल्याचाच एक भाग असल्याचे १८०४ च्या दरम्यान एका इंग्रज अधिका-याने काढलेल्या चित्रावरून समजू शकते. या चित्रावरून गाळणा किल्ल्याला फक्त चार तटबंदी नव्हत्या. गावाभोवतीच्या दोन तटबंदींचाही विचार केला, तर किल्ल्याला सहा तटबंदी आहेत. गावाभोवतीच्या तटबंदीचे भग्न प्रवेशद्वार व तटबंदी आजही पहायला मिळते.