दौलतमंगळ किल्ला
पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये माळशिरस गावात दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामधे आहे. अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो. या किल्ला व मंदिराविषयीची ऐतिहासिक माहिती असलेले दशरथ यादव यांचे यादवकालीन भुलेश्वर हे संशोधन पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यातून जुना इतिहास उलगडला आहे.भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामधे आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत. पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे.
पहाण्याची ठिकाणे
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून १० किलोमीटर अंतरावर दौलतमंगळ गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या, आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते. वाहनाने गेल्यास वाहने मंदिरा च्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तिथून मंदिरात प्रवेश होतो यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो.