ब्रम्हगिरी किल्ला
छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना व नंतर सुरतेच्या स्वारी दरम्यान त्र्यंबकेश्वरी आल्याची नोंद मिळते. तीर्थोपाध्यायांचा वाद त्यांनी सोडविल्याची नोंदही मिळते. शिवकाळात व नंतर पेशवाईत त्र्यंबकेश्वरला स्थैर्य लाभले आणि उपजीविकेसाठी कोकण तसेच पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातून अनेक ब्राह्मण त्र्यंबकेश्वर व नाशिकला स्थिरावले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला ब्राह्मणांचे गाव असेही म्हटले जाते. श्रावणात त्र्यंबकेश्वराचे दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्याची परंपरा जुनी आहे. ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी-हरिहरगिरी व ब्रह्मगिरी-हरिहरगिरी-अंजनेरी असे प्रदक्षिणेचे तीन प्रकार आहेत. ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेतील एक विशाल पर्वत अन् त्र्यंबकेश्वरची शान आहे. ब्रह्मगिरीतून वैतरणा, अहिल्या आणि गोदावरी या नद्यांचा उगम होतो.
ब्रह्मगिरीवरचा त्र्यंबकगड हे त्या काळातील राजकीय घडामोडींचे केंद्र होते.इ.स.१२७१-१३०८ दरम्यान त्र्यंबकेश्वर गड आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र्रदेव यादव याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार गडाचा उल्लेख नाशिक किल्ला असा करतात. पुढे बहामनी अहमदनगरच्या निजामशहा त्यानंतर शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, मोरोपंत पिंगळे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्रिंबक सार्जी प्रभू यांनी हा गड जिंकून पेशवाईत दाखल केला. त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून तिसरे पेशवे नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वराला साकडे घातले होते. गड ताब्यात आल्यानंतर त्यांनी हा नवस फेडल्याची नोंद पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मिळते. पुढे पेशवाईच्या पतनानंतर हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आज या गडाचे फक्त भग्नावशेष आढळतात. ब्रह्मगिरीच्या वाटेवर एक दगडी विश्रामगृह आवर्जुन पाहण्यासारखे आहे. हे फार कोणाच्या लक्षात येत नाही. पण दगडातील कोरीव कामाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. इंग्रजांविरूद्धच्या बंडात त्र्यंबकेश्वरनेही वासुदेव भगवंत जोगळेकरांच्या पुढाकाराने मोठा लढा दिला. अखेर जोगळेकरांना त्र्यंबकमध्ये इंग्रजांनी फाशी दिली. यावरून त्र्यंबकेश्वरचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग स्पष्ट होतो. कवी गोविदांच्या स्वातंत्र्यकवितांनी तर सावकरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण शिंपडले होते. मात्र आता कवी गोविंदांच्या आठवणीच फक्त पिंगा घालतात. त्र्यंबकेश्वरमध्ये कवी गोविंदांचे साधे स्मारकही दिसत नाही.
पेशवाईच्या काळात अनेक मातब्बर मंडळींनी त्र्यंबकेश्वरमधील मंदिरांचा, तीर्थांचा जीर्णोद्धार केला. त्र्यंबकेश्वरांचे मंदिर, कुशावर्ताजवळील केदारेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्री गंगामंदिर, परशुराम मंदिर, श्रीराममंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, ब्रह्म आणि सावित्रीचे दुर्मिळ मंदिरही त्र्यंबकेश्वरमध्ये पहायला मिळते. गंगासागर तलावाजवळ निवृत्तिनाथांचे मंदिर व समाधी सह असंख्य मंदिरे व त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक तीर्थे आहेत. स्नान,दान, श्राद्ध करण्यासाठी कुशावर्त तीर्थ व इतरही असंख्य तीर्थे अत्यंत पवित्र स्थान मानले जातात. यात कनखळ तीर्थ, कंचन तीर्थ, गंगाद्वाराजवळ वराह तीर्थ, रामलक्ष्मण तीर्थ,बिल्व तीर्थ, प्रयाग तीर्थ, इंद्र तीर्थ, पल्लाळ तीर्थ, गंगालय इत्यादींचा समावेश होतो. मात्र या तीर्थांमध्ये भारताच्या चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके नावाचे एकही तीर्थ त्र्यंबकेश्वरला भटकताना पहायला मिळत नाही. ज्या महापुरूषांची ख्याती त्र्यंबकेश्वर आपल्या उराशी मिरविते त्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके व स्वातंत्र्यकवी गोविंद यांचे स्मृतीस्थळ येथे नसावे हे पर्यटकांना चुकल्याचुकल्यासारखे वाटते. त्र्यंबकेश्वराचे आणि ब्रह्मगिरीचे नुकतेच समोर आलेले एक गुपित म्हणजे इतिहासकार म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतहून लुटलेल्या खजिन्याचा काही भाग त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरीवर लपविलेला आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने संशोधन करण्याची गरज आहे.
काय पाहाल
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूस दिसणारा डोंगर म्हणजे ब्रम्हगिरी.या डोंगरावर त्र्यंबकचा किल्ला आहे आणि त्याला एक जोड किल्ला आहे तो म्हणजे मेटघरचा किल्ला.ब्रम्हगिरी चा डोंगर म्हणजे साक्षात शिवाचे रूप आहे असे भाविक मानतात.या डोंगरावरील पाच शिखरे म्हणजे शिवशंभूची पाच रूपे आहेत: वामदेव, अघोर, ईशान, तत्पुरुष आणि व्योमजटा.यातील सगळ्यात उंच शिखर म्हणजे ब्रम्हाद्री.ब्रम्हगिरी किल्ल्यावर पाय ठेवणे पूर्वी निषिद्ध मानले जायचे पण काही शेठ लोकांनी इथे पायऱ्या बांधल्या आणि ब्रम्हगिरी वर भाविकांची पावले पडू लागली.ब्रम्हगिरीच्या डोंगरावर गंगाद्वार, गोरक्षनाथ गुंफा, आणि १०८ शिवलिंग असलेली गुंफा आहे.शंकराने जटा आपटल्या ते ठिकाण, गोदावरी उगमस्थान, वैतरणा नदीचे उगमस्थान.ब्रम्हगिरी डोंगरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.एक पायऱ्यांचा मार्ग जो त्र्यंबक दरवाजातून गडमाथ्याकडे जाणारा दुसरा मागील बाजूस हत्ती (मेट) दरवाजातून जाणारायातील दुसरा मार्ग कठीण आहे.त्र्यंबक दरवाजातून वर जाणारी वाट मात्र थेट खालपासून वरपर्यंत पायऱ्याच पायऱ्या बांधल्याने सोपी झाली आहे. मेटघर गावाच्या बाजूला ब्रम्हगिरी च्या डोंगरावर असलेल्या दुर्ग भंडार चे नाक दिसते पण इकडे वर जायची वाट मात्र ब्रम्हगिरी वरून जाते. त्र्यंबकेश्वर वरून गंगाद्वार कडे निघायचं ब्रम्हगिरी चा डोंगर दोन तिन टप्प्यांचा आहे.चढण पार करताच थोडी सपाटी लागते इथे पुढे बऱ्याच मंडळींनी दुकाने थाटली आहे दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी जिथे उगम पावते ते ठिकाण उजवीकडे डोंगरकड्याच्या पायथ्याशी एक गुफेमध्ये आहे.. डावीकडे एक पायवाट दुतर्फा दुकानांच्यामधून जाते. हा रस्ता आपल्याला थेट ब्रम्हगिरी च्या सोपनाकडे घेवून जातो.२०-२५ मिनिटांची वाट तुडवून दगडी बांधीव पायऱ्यांचा मार्ग गाठायचा आणि ब्रम्हगिरी कडे निघायचं ब्रम्हगिरी च्या ५० एक पायऱ्या चढताच उजवीकडे एक दगडी कोरीव खांब आणि कमानी असलेली वास्तू नजरेस पडते हि धर्मशाळा आहे वाटसरुंसाठी क्षणभर विश्रांतीची जागा या धर्मशाळेच्या मागे एक पाण्याचे टाके आहे काही क्षण धर्मशाळेची बांधणी न्याहाळून पुन्हा पायऱ्या चढण्यास सुरुवात करायची.
पायऱ्यांनी वर सरकताना वाटेत एक हनुमानाचे भव्य शिल्प पाहायला मिळते याशिवाय ब्रम्हदेवाचे एक शिल्प कातळात कोरले आहे.कातळाच्या पोटातून कोरलेला सोपान चढून आपण गडमाथ्यावर दाखल होतो.इथून उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे.पायऱ्यांन पाठ करून समोर पाहिल्यास डावीकडे ब्रम्हगिरीचा सर्वोच्च माथा असलेले टेकाड आणि उजवीकडे आणखी एक टेकाड दिसते या दोन टेकाड जोडणारी धारेवर चढायचं आणि पलीकडे उतरायचं इथे डावीकडे गेल्यास.. गौतम ऋषींनी तपश्चर्या जिथे केली ते स्थान आहे.. एक लहानसा मठ आहे इथे.. इथून मागे फिरून डोंगरकड्याच्या काठाने चालत आपण शंकराच्या जटा स्थानाला येऊन पोहोचतो.शंकराने जटा आपटून गंगा इथे अवतरल्याची आख्यायिका आहे. या मंदिराच्या मागून एक वाट दुर्ग-भंडार किल्ल्याकडे जाते.