भरतगड किल्ला
इतिहास
शिवाजी महाराजांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली होती. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांना मिळाला. तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.भरतगड किल्ल्याचे बांधकाम सावंतवाडी कर फोंड सावंत यांनी इ.स. १६८० मध्ये केली.वाडीकर फोंड सावंत यांनी किल्ल्यावर पाणी लागल्यानंतर किल्ल्याची बांधणी केली.पुढे तुळाजी आंग्रे यांनी भरतगड किल्ला जिंकला.पुढे इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात किल्ला गेला.भरतगडाचे दार भग्नावस्थेत आहे. तटबंदीची सुद्धा खूप प्रमाणात पडझड झालेली आहे. गडावर घनदाट
वनराई आहे. गडावर मुख्यत: काजू व आंब्याच्या बागा आढळतात.भरतगडावर २०० फूट खोल विहीर आहे.विहीरीच्या तळाशी असलेल्या गुप्त दरवाजातून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते. भरतगडाचे वैशिट्य म्हणजे गडावर मंदीर आणि मशीद शेजारी आहे.गड पाहावयास एक तास पुरेसा आहे.
पहाण्याची ठिकाणे
चिरेबंदी पायऱ्यांच्या वाटेने गडावर पोहोचायला ५ मिनीटे लागतात. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण बाजुचे बुरुज, तटबंदी शाबूत आहेत. गडाच्या भोवताली २० फूट खोल व १० फूट रुंद खंदक आहे; दाट झाडीमुळे तो झाकला गेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या हाताला तटबंदी ठेवून दक्षिणेकडे चालत गेल्यास तटबंदी व बुरुज लागतात. दक्षिणेकडे तटबंदी जवळ एक खोल खड्डा आहे, ते पावसाचे पांणी साठवण्यासाठी खोदलेले “साचपाण्याचे तळे” असावे. तटबंदीच्या कडेकडेने गडाला प्रदक्षिणा घालून उत्तर टोकाला यावे. गडाच्यामध्ये उंचावर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज व १० फूट ऊंच तटबंदी आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर देवड्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील बुरुजावर चढण्यासाठी जिना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला महापुरुषाचे छोटे देऊळ आहे. देवळामागे कातळात खोदलेली खोल विहीर आहे. त्याच्या उजव्या हाताला दारूचे कोठार, धान्याचे कोठार यांचे अवशेष आहेत. दक्षिणेकडील बुरुजात चोर दरवाजा आहे. या दरवाज्याने बाहेर आल्यास आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो.