अवचितगड
अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो. कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये अवचितगड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला आहे, महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
गडावरील ठिकाणे
किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास “शरभ” हे शिल्प दिसते.. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या “किल्ले अवचितगड”चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजले. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” दुसर्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उद्ध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे. पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ.परिसर न्याहळता येतो.