विशाळगड किल्ला
महाराष्ट्रातील शिवकालीन एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. तो कोल्हापूरच्या वायव्येस सु. ७२ किमी. वर शाहूवाडी तालुक्यात गजापूर पर्वतश्रेणीत वसला आहे. त्याची सस.पासून उंची सु. १,००२ मी. असून लांबी ९७५ मी. व रुंदी ३१७ मी. आहे. हा किल्ला निश्चितपणे केव्हा बांधला याविषयी तज्ञांत एकमत नाही तथापि कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज (कार. सु. ११७५ – १२१२) याने दक्षिण महाराष्ट्रात सु. पंधरा किल्ले नव्याने बांधले, त्यांतील हा एक असावा. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी भोजाचा पराभव करून या भागात वर्चस्व प्रस्थापिले. यादवांच्या अस्तानंतर हा किल्ला सरदार शिर्के आणि मोरे (जावळीकर) यांच्या अखत्यारीत होता. पुढे बहमनी सुलतानांचा वजीर महमूद गावान याने १४७० मध्ये तो जिंकून घेतला. बहमनींच्या अस्तानंतर विशाळगड आदिलशाहीकडे आला. प्रतापगडाच्या १६५९ च्या युद्धानंतर छ. शिवाजींनी पन्हाळा जिंकून घेऊन त्याच्या परिसरातील खेळणा, रांगणा, पावनगड आणि वसंतगड हे किल्ले पादाक्रांत केले. खेळणा किल्ल्यालाच नंतर शिवाजी महाराजांनी विशाळगड हे नाव दिले.
आदिलशाही सरदार सिद्दी जोहार याच्या वेढ्यातून पन्हाळगडावरून निसटून शिवाजी या किल्ल्यावर आश्रयासाठी आले. तेविहा वाटेत त्यांनी गजापूरच्या खिंडीत शत्रूला अडविण्याचे काम बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर सोपविले. त्यात बाजीप्रभू धारातीर्थी पडले व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. म्हणून या खिंडीस ‘पावनखिंड’ म्हणतात. महाराजांनी परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यास या किल्ल्याचे सर्वाधिकार दिले(१६६१). पुढे रायगड मराठ्यांच्या हातून मोगलांच्या ताब्यात गेल्यावर (१६८९) मराठ्यांनी विशाळगडावर आश्रय घेतला. छ. राजाराम जिंजीस निसटून गेले व तेथून मराठ्यांचा राज्यकारभार पाहू लागले. त्यावेळी त्यांच्या तीन पत्न्या–अंबिकाबाई, राजसबाई व ताराबाई–काही दिवस विशाळगडावर होत्या. पुढे रामचंद्रपंताने त्यांना सुखरूप जिंजीस पोहोचविले. तेथेही राजारामांस पकडण्यासाठी मोगलांनी जिंजीस सात वर्षे वेढा दिला. राजाराम तेथून महाराष्ट्रात २२ फेब्रुवारी १६९८ रोजी विशाळगडावर येऊन पोहोचले आणि मराठ्यांस अधिक जोम चढून त्यांनी मोगलांचा बराच मुलूख जिंकून घेतला.
तथापि मोगल सेनापती झुल्फिकारखानाने मराठ्यांकडून इतर प्रदेशां बरोबरच विशाळगड जिंकून घेतला. राजारामांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी तो पुन्हा परत मिळविला. ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी यास या किल्ल्यावर राज्याभिषेक करून गादीवर बसविले. मराठ्यांची तात्पुरती राजधानी पन्हाळा व विशाळगड अशी आलटून-पालटून होती. औरंगजेबाने १७०२ मध्ये त्याला वेढा घातला पण परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांच्या कडव्या प्रतिकारामुळे औरंगजेबास काही अटींवर २७ मे १७०२ रोजी हा किल्ला ताब्यात मिळाला. पुढे मराठ्यांनी पुन्हा तो मोगलांकडून घेतला व तो अखेरपर्यंत त्यांच्याच ताब्यात राहिला. ताराबाई व रामचंद्रपंत अमात्य हे दोघे विशाळगडावर राहून मराठ्यांच्या सैन्याच्या हालचालींची सूत्रे हालवीत असत. विशाळगडाच्या प्रतिनिधी घराण्याचा परशुराम त्रिंबक हाच मूळ पुरुष होय. कोल्हापूरच्या छ. संभाजी यांनी जनार्दनपंत प्रतिनिधी यांच्या नावाने नवीन सनद देऊन किल्ल्याचे इनाम चालू ठेवले (१८४४). याच साली ब्रिटिशांविरुद्ध कोल्हापूरात बंड झाले. त्यांनी विशाळगड घेतला पण ब्रिटिशांनी तो पुन्हा प्रतिनिधीस मिळवून दिला. या घडामोडीत किल्ल्याचे नुकसान झाले म्हणून प्रतिनिधींनी मलकापूरला स्थलांतर केले. संस्थाने विलीन होईपर्यंत तो कोल्हापूरच्या प्रतिनिधी शाखेच्या ताब्यात होता.
इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनीधींना दिला. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.पहाण्याची ठिकाणेएस टी किंवा खाजगी वहानाने विशाळगडासमोरील वहानतळावर उतरल्यावर, वहानतळात व विशाळगडामध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतू आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. या पूलावरुन विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर दोन वाटा दिसतात. समोरची खड्या चढणीची शिडीची वाट, तर उजव्या बाजूची पायर्यांची फिरुन जाणारी कमी चढणीची वाट. आपण वर जाताना शिडीच्या वाटेने जाऊन उतरताना पायर्यांच्या वाटेने उतरावे. म्हणजे किल्ल्यावरील सर्व ठिकाणे पाहून होतात.शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायर्यांची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात.
उजव्या बाजूची नव्या पायर्यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जूनी फरसबंदी(दगडांची) वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. आपण डाव्या बाजूच्या वाटेने गेल्यावर ५ मिनिटातच अमृतेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरा समोरील कड्यावरुन पडणारे पाणी कुंड बांधून आडवलेले आहे. मंदिरात पंचाननाची मुर्ती आहे. मंदिरावरुन तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलिकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. मंदिर पाहून पून्हा दर्ग्यापाशी दोन रस्ते फुटतात त्या ठिकाणी यावे.तेथून उजव्या बाजूच्या सिमेंटने बांधलेल्या पायर्यांच्या वाटेने ५ मिनिटात आपण भगवंतेश्वर मंदिरापाशी येतो. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नविन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहिर आहे. श्री हर्डिकर हे मंदिराची देखभाल पाहातात. त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे.