वेताळगड किल्ला
वेताळगड हा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यातील एक डोंगरी किल्ला आहे. सोयगाव तालूक्यातील डोंगररांगात विविध लेण्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातीलसोयगाव तालूक्यापासून अंभई हळदाघाट हळदागाव मार्गे गेल्यावर चार किलोमिटर अंतर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो. हा किल्ला अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला लागतो. येथे बर्यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, मशीद बारादरी आहेत. वेताळगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतातसह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील अनेक लहान-मोठय़ा डोंगरमाथ्यांना विविध राजसत्तांच्या कालखंडात गड-किल्ल्यांचे साज चढले. यापैकीच एक किल्ला म्हणजे वेताळवाडी उर्फ वसईचा किल्ला. किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शिल्लक असल्याने अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला गडप्रेमींचे आवडते ठिकाण आहे.जंजाळ्याचा औरस चौरस गड पाहून आम्ही आमच्या पुढच्या लक्ष्याकडे निघालो, तो म्हणजे वेताळवाडीचा किल्ला. अंभईमार्गे आधी उंडणगावला पोहचलो, तेथून हळदामार्गे सोयगाव रस्त्यावर असलेल्या हळदा घाटाकडे निघालो. मात्र हा गड या परिसरात वेताळवाडीच्या एवजी “वाडीगड” या नावाने परिचित आहे, त्याचे कारण आम्हाला पुढे समजले. अर्थात या गडावर येण्यासाठी बरेच पर्याय आहेत.
निम्मा हळदा घाट उतरुन आल्यानंतर वेताळवाडी गावाजवळ येताच समोरच्या डोंगरावरचे तटबुरूजांचे अवशेष आणि गडावरच्या वास्तू स्पष्ट दिसू लागतात. गडाच्या डोंगराला वळसा घालून हळद्या घाटानं किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी जाता येते. वेताळवाडी किल्ल्याचे इथून एक सुरेख दर्शन घडते.डोंगर उताराला बांधलेली लांबलचक तटबंदी आणि बुरुज, समोर दोन बलदंड बुरुजात दडविलेला दरवाजा आणि उजवीकडे वर चढत जाणारी भक्कम तटबंदी आपले लक्ष वेधून घेते.गडाच्या दरवाजाकडे जाताना दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. या दोन बुरूजामागे नक्षीदार सज्जा असणारे त्यांच्यापेक्षा उंच व मोठे बुरुज आहे. दरवाजापर्यंत पोहचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजांची रचना केलेली आहे. वेताळवाडी किल्ल्याच्या दरवाजाची रचना थोडी वेगळी आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर बुरुजांच्या पुढे जिभी बांधण्यात आली आहे. जिभी म्हणजे मुख्य दरवाजापुढे उभारलेली एक भिंत. जेणेकरून शत्रुचा हल्ला झाल्यास थेट दरवाजावर हल्ला करता येऊ नये अशी रचना.अशीच जिभी मला पुढे नांदेड जिल्ह्यातील कंधार किल्ल्यावर पहायला मिळाली.
या दोन बुरुजामधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख दरवाजाकडे जाते.डावीकडच्या बुरुजाच्या तळात एक लहान दरवाजासारखे बंद बांधकाम दिसते पण त्याचा उपयोग लक्षात येत नाही.हा दरवाजा जंजाळा किल्ल्याच्या दिशेने असल्याने जंजाळा दरवाजा म्हणुन ओळखला जातो.दरवाजाची उंची २० फुट असून त्याच्या दोन्ही बाजूस शरभशिल्पे कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला दरवाजाच्या बुरुजावर जाण्यासाठी पाय-या आहेत.बुरुजाच्या वरील बाजुस आत उतरणारा एक लहान जिना असुन हा जिना आपल्याला बुरुजातील कोठारात घेऊन जातो.दरवाजावर उभे राहिल्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी,गडाखालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. वेताळवाडी धरणाच्या मागे प्रचंड विस्ताराचा वैशागड उर्फ जंजाळयाचा किल्ला दिसतो.हा दरवाजा पार करून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याची संपुर्ण माची अंदाजे २०-३० फूट उंचीच्या तटबंदीने संरक्षित केली आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी प्रत्येक तट-बुरुजात जंग्या ठेवलेल्या आहेत. इथून वरील बाजुस वेताळवाडी किल्ल्याचा बालेकिल्ला व त्याची तटबंदी दिसते.दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक प्रचंड मोठे खांबटाकं आहे. वास्तविक या टाक्याचे पाणी आधी पिण्यायोग्य होते,मात्र आता आतमधे वटवाघळांनी मोठ्या प्रमाणात वसाहत केल्याने पाणी खराब झाले आहे. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन गडाला फेरी मारण्यासाठी उजवीकडे वळायचं.
ह्या वाटेच्या सुरुवातीलाच उजवीकडे बुरुजात एक छोटा दरवाजा दिसतो.दरवाजाच्या पाय-या उतरून खालच्या भागात गेल्यवर किल्ल्याच्या बुरुजामध्ये हवामहल सारखी सुंदर खोली बांधून काढलेली दिसते. इथेच बाजुला दारुगोळा ठेवण्यासाठी असलेली कोठडीसुध्दा दिसते. एकंदरीत पहारेकर्यांना पहारा कसा सुसह्य होईल हे पाहिले आहे.गडाबाहेरून नक्षीदार सज्जा दिसणारा बुरुज हाच बुरुज आहे. अतिशय कल्पक अशी ही रचना दुर्ग निर्मात्याच्या रसिकपणाची दाद देते.उजवीकडे वर तिरपी चढत गेलेली तटबंदी आणि शेवटाला एक बुरुज व त्यावर असलेले झाड नजरेस पडते. तटबंदीतील पूर्व टोकाचा हा बुरुज तटबंदीपासुन थोडासा सुटावलेला आहे.या बुरुजावर जाण्यासाठी आठ-दहा पायऱ्या आहेत. इथून अजिंठा डोंगररंग व डावीकडच्या डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी दिसुन येतात.अंजिठा रांगेत असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून १९०० फुट ( ६२५ मीटर ) आहे.या बुरुजावरून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर दहा मिनिटात बालेकिल्ल्याच्या बुरुजाला वळसा घालून आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो.दुर्दैवाने झालेल्या दुर्लक्षामुळे या देखण्या बुरुजाची पडझड झाली आहे. मात्र तरीही त्याचे सौंदर्य उणावलेले नाही.तोफेसाठी ठेवलेल्या खिडकीतून हळदा घाटाची वळणे आणि त्यावरुन प्रवास करणारी लाल बस मोठी झक्क दिसत होती. बालेकिल्ला दक्षिणोत्तर लंबवर्तुळाकार पसरलेला असुन येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे.बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ सुंदर नक्षीकाम व छ्ताला झरोका असणारी हमामखान्याची घुमटाकार वास्तू आहे. हा हमामखाना भिंतीतील खापराच्या नळ्यावरून लक्षात येतो. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेलतुपाचे गोलाकार रांजणटाके पहायला मिळतात.
इथे झाडीझुडुपातून वाट काढत आपण समोरच्या एका इमारतीपाशी पोहोचतो.हि इमारत म्हणजे गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारतीचे वाड्याचे अवशेष आहेत.वास्तविक गड पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे.मात्र दम देणार्या निळ्या-लाल फलकाशिवाय इथे कोणतेही काम पुरातत्व खात्याने केलेले दिसत नाही.गडावर पहारेकरी नेमला आहे, असे समजले पण हा कधीही दिसत नाही.पुढे गेल्यावर नमाजगीर नावाची सुंदर नक्षीकामाने व कमानीने सजलेली इमारत (मस्जिद) आहे.त्याच्या भिंतीवरचे निजामाचे चिन्ह आपल्याला गतकाळातील निजामशाहीच्या वर्चस्वाची जाणीव करून देते.नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर असुन समोर एक प्रचंड मोठा बांधीव शेवाळलेला तलाव आहे.सध्या किल्ल्यावरचा हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे.अर्थात या तलावातील पाणीसुध्दा पिण्यायोग्य नाही. एकंदरीत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्याने या गडावर मुक्काम करणे शक्य नाही.पुढे पश्चिमेकडे किल्ल्याची निमुळती होत जाणारी माची असून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील या उत्तर टोकावर बारदरी उर्फ हवामहल नावाची सुंदर बांधकाम केलेली २ कमान असलेली इमारत आहे.राजघराण्यातील स्त्रियांना वारा खाण्यासाठी खास तयार केली गेलेली ही वास्तू आहे. ह्या वास्तूच्या आत कोणतही बांधकाम नाही. खरेतर वेताळवाडी गडाच्या सौंदर्याचा सर्वोच्च अविष्कार म्हणजे हि वास्तु. गडाचा ईतिहास आज फारसा ज्ञात नसला तरी गडावर कदाचित एखादे राजघराणे मुक्कामाला असावे असे एकंदरीत इथल्या वास्तुंची बांधणी बघता अंदाज करता येतो. कदाचित संध्याकाळच्या निवांत वेळी गडावरील राणी किंवा ईतर राजस्त्रिया इथे बसून आजुबाजुच्या मुलुखाची शोभा पहात असतील, पश्चिमवारा अंगावर घेत जंजाळ्याच्या गडामागे बुडणारा सुर्यास्त निरखत असतील. आज फक्त अंदाज बांधणे आपल्या हाती उरले आहे. पण निदान या बारादरीसाठी तरी ह्या गडाला भेट द्यायला हवीच. हि वास्तु राबता असताना कदाचीत वरुन लाकडाच्या छताने बंदिस्त असावी, आज मात्र छप्पर उरलेले नाही.
इमारतीकडे जाताना डाव्या बाजूला सदरेची एक इमारत आहे.बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याच्या भक्कम बुरुज असणारा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.वास्तविक हि जागा मुक्कामासाठी आदर्श आहे, पण गडावर पिण्याच्या पाण्याच्या ठणठणाटाने हे अवघड वाटते. तरीही पुरेशी तयारी करुन गेल्यास हा अनुभव घ्यावा.किल्ल्याच्या मुख्य दरवायाकडे जाण्यासाठी बारदरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे लागते.शिबंदीचा विचार करुन पाण्याची चोख व्यवस्था केली आहे.या टाक्याच्या बाजूला ६ फुट १० इंच लांबीची खणखणीत तोफ पडली आहे. वास्तविक गडावर असणारे बुरुज आणि त्याला असणार्या जंग्या पहाता, या गडावर मोठ्या प्रमाणात तोफा असणार हे नक्की. पण आज हि एकमेव तोफ गडावर दिसते. बाकीच्या तोफा कोठे गेल्या, कि स्थानिकांनी त्या पळवल्या याचे उत्तर सापडत नाही. पण निदान हि तोफ तरी जपली पाहिजे.
इथे समोरच उजव्या बाजूच्या तटबंदीतील पाय-या उतरल्यावर वेताळवाडी किल्ल्याचा चोर दरवाजा लागतो.मध्यम आकाराचा हा गड फिरण्यास साधारण दीड तासाचा अवधी लागतो.ईतिहासामधे या गडाचा फार उल्लेख नाही. बहुधा जवळ असलेला जंजाळा आणि हा गड एकाच कालखंडातील कागदपत्रांमध्ये वेताळवाडी किल्ल्याचा उल्लेख “बैतुलवाडी” असा येतो. वेताळवाडी गावच्या लोकांना वेताळवाडी किल्ल्याच्या नावातला “वेताळ” हा शब्द आवडत नसल्याने ते ह्या किल्ल्याला वाडीचा किल्ला म्हणुन संबोधतात.एकंदरीत खणखणीत तटबंदी, प्रचंड दरवाजे, उपदरवाजे, जिभीसारखे सहसा न पहायला मिळणारे दुर्गवैशिष्ट्य, कातळकोरीव टाकी, तलाव, अंबरखाना, हमामखाना,तोफा आणि बारादरीसारखी अनोखी वास्तु अशी गडाला आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये उराशी बाळगून हा वेताळवाडीचा गड उभा आहे.गड,किल्ले पहाण्यात रस असणार्यांनी या किल्ल्याला सवड काढून किमान एकदा तरी नक्की भेट द्यावी. मात्र मला एकाच गोष्टीची उणीव भासली,ती म्हणजे एखादा शिलालेख असता तर या गडाच्या ईतिहासावर प्रकाश पडला असता. बाकी एखादा महाराष्ट्रातील गड पहातोय कि राजस्थानमधील, ईतका देखणा हा किल्ला आहे.