सिंधुदुर्ग किल्ला
मालवणच्या किनाऱ्यावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला तब्बल 43 एकरवर पसरलेला आहे. हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. या किल्ल्याला भव्य संरक्षक भिंत आहे. जी किल्ल्याचं समुद्राच्या पाण्यापासून आणि शत्रूपासून संरक्षणाकरता बांधण्यात आली होती. या किल्ल्यांमधील काही परिसरात काही घरंही आहेत आणि मारूती, महादेव आणि महापुरूष अशी देवळंही आहेत. या किल्ल्यात मान्सून म्हणजेच पावसाळ्यात एंट्री नसते. कारण पावसाळ्याच्या दिवसात भरतीचं पाणी किल्ल्याच्या आत भरतं.
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली.
असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
“चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।
छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची चिरा २५ नोव्हेंबर १६६४ रोजी प्रथम बसविली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून कारागीर मागविला होता. किल्ला बांधताना कित्येक खंडी शिशाचा उपयोग पायाच्या कामासाठी केल्याचा उल्लेख कागदोपत्री आढळतो. सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्याजवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची योजना केलेली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते.सिंधुदुर्गचा विस्तार १९ हेक्टर व परिघ सु. साडेतीन किमी. आहे. किल्ल्याला ४२ बुरुज असून तटाची उंची सु. १० मी. आहे. किल्ल्याच्या ईशान्येस जिथे समुद्र खोल आहे आणि सहजासहजी नजरेस येणार नाही तिथे प्रवेशद्वार आहे; कारण ओहोटीच्या वेळीही तिथे पाणी असते. महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर दोन देवळ्या आहेत. यांपैकी एका देवळीत डाव्या पायाचा व दुसरीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे.
ते ठसे शिवाजी महाराजांचेच असावेत, असे जनमत आहे. किल्ल्यात मध्यभागी छत्रपती राजाराम महाराज (कार१६८९–१७००) यांच्या कारकिर्दीत बांधलेले शिवाजी मंदिर भव्य व लक्षणीय आहे. त्यातील वीरासनातील वालुकाश्म मूर्ती नावाड्याच्या टोपीसदृश शिरस्त्राण घातलेली, दाढी नसलेली अशी आहे. येथे एक म्यानात ठेवलेली तलवार आहे. मूळ मंदिर १३ X ७ मी. असून त्यापुढील सभागृह कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी उभारले (१९०७). याशिवाय किल्ल्यावर महादेव, भगवतीदेवी, महापुरुष, जरी-मरी, द्वाररक्षक हनुमंत अशी पाच छोटी मंदिरे आहेत.खाऱ्या समुद्रात किल्ला असूनही किल्ल्यातील विहिरींचे पाणी मात्र गोडे आहे. दुधबांव, दहीबांव, साखरबांव या नावाने येथे विहिरी आहेत. तसेच एक छोटा तलाव आहे. किल्ल्यात नारळ व पोफळीची झाडे असून गोरखचिंचेचे एक झाड आहे.
कालौघात लाटांमुळे किल्ल्याचे काही बुरुज व तटाचा भाग ढासळला आहे. तटबंदीवरुन किल्ल्यात उतरण्यासाठी जिने आहेत. किल्ल्यात आडभिंत बांधलेली असून त्यात पूर्वी होडी वगैरे गुप्त साधनांची तरतूद करुन आणीबाणीच्या वेळी सुटका करुन घेण्याची व्यवस्था होती. दक्षिणेकडच्या तटाकडे चंद्राकृती व मऊ रेतीची छोटी पुळण आहे. यालाच ‘राणीची वेळा’ किंवा ‘राणीच्या समुद्रस्नानाची जागा’ म्हणतात. याखेरीज महादरवाजावरील मोडकळीस आलेला नगारखाना, राजवाड्याचे काही अवशेष दिसतात.इ. स. १७१३ मध्ये हा किल्ला करवीर संस्थानच्या आधिपत्याखाली आला. १७६५ मध्ये तो इंग्रजांनी घेऊन त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस असे ठेवले; परंतु मुंबईच्या इंग्रजांनी तो पुढे करवीरच्या छत्रपतींना काही अटींवर परत दिला आणि मालवणला वखार घालण्यास संमती मिळविली. १८१२ मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील चाच्यांचा बंदोबस्त केला.
किल्ल्यावर शिवजंयती, रामनवमी, नवरात्र इ. उत्सव तिथीनुसार साजरे करतात. काही कुटुंबांची येथे वस्ती असून अंगणवाडी व एक पूर्व प्राथमिक शाळा आहे. करवीर छत्रपतींच्या वतीने येथील शिवाजी मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात. तसेच किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते.‘चौऱ्यांशी बंदरांत हा जंजिरा मोठा व अठरा टोपीकरांचे उरावर अजिंक्य दुर्ग होता’ असे बखरकार म्हणतात, म्हणून महाराजांनी मोठ्या अभिमानाने त्याचे नाव ‘शिवलंका’ ठेवले. स्वराज्याच्या आरमारी दलाची साक्ष देणारा हा किल्ला पर्यटक व दुर्गअभ्यासकांचे आकर्षण ठरला आहे.
किल्ल्यावर महादेव, भगवतीदेवी, महापुरुष, जरी-मरी, द्वाररक्षक हनुमंत अशी पाच छोटी मंदिरे आहेत. खाऱ्या समुद्रात किल्ला असूनही किल्ल्यातील विहिरींचे पाणी मात्र गोडे आहे. दुधबांव, दहीबांव, साखरबांव या नावाने येथे विहिरी आहेत. तसेच एक छोटा तलाव आहे. किल्ल्यात नारळ व पोफळीची झाडे असून गोरखचिंचेचे एक झाड आहे. कालौघात लाटांमुळे किल्ल्याचे काही बुरूज व तटाचा भाग ढासळला आहे. तटबंदीवरून किल्ल्यात उतरण्यासाठी जिने आहेत. किल्ल्यात आडभिंत बांधलेली असून त्यात पूर्वी होडी वगैरे गुप्त साधनांची तरतूद करून आणीबाणीच्या वेळी सुटका करून घेण्याची व्यवस्था होती. दक्षिणेकडच्या तटाकडे चंद्राकृती व मऊ रेतीची छोटी पुळण आहे. यालाच ‘राणीची वेळा’ किंवा ‘राणीच्या समुद्रस्नानाची जागा’ म्हणतात. याखेरीज महादरवाजावरील मोडकळीस आलेला नगारखाना व राजवाड्याचे काही अवशेष दिसतात.