सिद्धगड
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुरबाड ते म्हसा आणि येथून २१ किमी अंतरावरील सिद्धगड परिसर हा भीमाशंभर अभयारण्यात येतो.नारिवली या गावापासून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पडा हे गाव लागत तिथून पायवाट काढत अगदी जंगलाच्या मधोमध पोहचल्यावर काकड माळ लागत तिथे भावरी कुटुंब फार पूर्वी पासून राहत आहे, तिथून अगदी जवळच हे स्थळ आहे. गर्द झाडे व घनदाट अरण्यात विविध प्रकारचे वन्यजीव, पशु-पक्षी आढळतात. भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येत असल्याने येथील जंगलाचे चांगले संवर्धन झाले आहे. अनेक उपयुक्त वनौषधी येथे आढळतात. दक्षिण तटावर भैरवाचे स्थान आहे.क्रांतीकारकांची भूमी स्वातंत्र्य लढयात ब्रिटिशांना सळो-की-पळो करून सोडणा-या आणि आपल्या प्राणांची आहुती देणा-या वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतीकारकांची ही ‘बलिदानभूमी’ ही तरुणांसाठी स्फूर्तीस्थान आहे.२ जानेवारी १९४३ रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते. तेव्हा पासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र वरती डोंगर माथ्यावर असणारा प्राचीन किल्ला फारसा परिचित नव्हता. तसेच किल्ल्यावर जाणारी वाट पण बिकटच असल्याने ट्रेकर्स व्यतिरिक्त कुणी फारसा तिथे जाण्याचा प्रयत्न करत नव्हते. मुरबाडपासून २१ किमी अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याचा कालखंड निश्चित सांगता येत नसला तरी या ठिकाणी असणारी बौद्धकालीन लेणी, उद्ध्वस्त वाडयांचे अवशेष, सैनिक बराकी, धान्याची कोठारे, पाण्याची टाकी यामुळे किल्ल्याचा थोडाफार इतिहास उलगडण्यास मदत होते. हा किल्ला गायधरा या महत्वाच्या घाटरस्त्याच्या लगतच असल्याने त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘भिवाचा आखाडा’ येथे विश्रांतीसाठी थांबत होते. या किल्ल्यावर आजही शेकडो वर्षापूर्वीची एक तोफ आहे. कोकण स्वारीतून (इ। स. १६५७ – ५८ )शिवाजीराजांनी सिद्धगड काबीज केला होता. पेशवे दप्तरानुसार १७३४ मध्ये मराठयांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काहीकाळ सनिक ठेवल्याची नोंद आहे. १८१८ नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याचे अतोनात नुकसान केले. नंतरच्या काळात या किल्ल्याचा इतिहास पुसटसा होत गेला.
१९४२ साली ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमा पाटील या क्रांतिवीरांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडाची ओळख ठाणेकरांसाठी नवी नाही. दरवर्षी २ जानेवारीला येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यास आजुबाजूच्या परिसरातील व ठाण्यातील देशभक्त नागरिक नियमितपणे मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. ‘असाध्य ते साध्य करण्याची प्रेरणा’ देणाऱ्या सिद्धगडाचे उत्तुंग रांगडे रूप मनाला भुरळ घालीत असल्यामुळे गिरीभ्रमण व दुर्गभ्रमण करणाऱ्या साहसी युवकांचीही पावले हमखास इकडे फिरकत असतात. सिद्धगडावर जाण्यासाठी ठाणे-मुरबाड एसटीने व तेथून म्हसा-धसईमार्गे उचले गावी येऊन पायउतार व्हावे. किंवा कल्याणहून थेट धसई बससेवा उपलब्ध आहे. त्या बसने उचले गावी यावे. समुद्रसपाटीपासून १४०० फूट उंच असलेले बोरवाडी हे अवघ्या पंधराएक उंबरठ्याचे आदिवासी गाव सह्याद्रीच्या ऐन कुशीत घनदाट जंगलाने वेढलेले आहे. बोरवाडी सिद्धगडाला अगदी खेटून आहे. आपले वाहन गावात ठेवून गड चढावयास सुरुवात केली की, तासाभरात आपण गडावर दाखल होतो. सिद्धगड हा पुणे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर उभा आहे. सह्याद्रीतील भीमाशंकर रांगेच्या उभ्या भिंतीला बिलगून असलेली सिद्धगडाची माची किंवा सिद्धगडवाडी सुमारे दोन हजार फूट उंच आहे. हा आहे किल्ल्याचा पहिला भाग. माचीवरील प्रवेशद्वार ओलांडले की, मग सुरू होतो शिखरमाथा म्हणजे बालेकिल्ल्याचा दुसरा भाग. सिद्धगडाच्या माचीवर सह्याद्रीपासून किंचित सुटलेला आणि समुद्रसपाटीपासून ३२३६ फूट उंच असा हा बालेकिल्ला घराच्या दोन पाकी छपरासारखा आकाशात निमुळता होत गेलेला दिसतो. जणू विशालकाय चौरंगावर अलगदपणे आणून ठेवलेला इजिप्तचा पिरॅमिड वाटावा तसे दुरून सिद्धगडाचे विलोभनीय दर्शन होते. परंतु त्याचे हे देखणे रूप त्याच्याजवळ जाईपर्यंतच टिकते, कारण प्रत्यक्ष सिद्धगडावर चढाई करीत जसजसे आपण वर जावे, तसतसे त्याचे रौद्रभीषण स्वरूप समोर येत जाते. समोरची सह्याद्रीची उंच कातळ भिंत आणि तळकोकणातील वाढत जाणारी खोल दरी पदोपदी आपल्या काळजाचा ठोका चुकवीत असते. सिद्धगडाची भव्यता आणि भीषणताही आपल्याला स्तिमित करते व आपसूकच त्याच्याबद्दल एकप्रकारे भीतीयुक्त सुप्त आकर्षण वाटू लागते. या आकर्षणापायीच शेकडो वर्षांची परंपरा जपणारी आदिम संस्कृती सिद्धगडावर अद्याप सुखनैव नांदते आहे, याचे मग आपल्याला आश्चर्य वाटत नाही. गडावर शिवलिंग, नंदी, गणपती कार्तिकेय आणि शिवपरिवारातील देवदेवता तसेच सतीशिळा व वीरगळ गडावरील अज्ञात झुंजीची आठवण करून देतात.
सिद्धगडाच्या पायथ्यापासून रानेवने पालथी घालत, घामाच्या धारात धुळीने माखलेला चेहरा पुसत अडीच-तीन तासांत डोंगर चढून आपण पहिल्या प्रवेशद्वारापाशी येतो. या ठिकाणी मजबूत आणि अद्यापही सुस्थितीत असलेला चिरेबंदी दरवाजा आणि त्यापलीकडचा निसर्गसंपन्न परिसर पाहून मन थक्क होते. आपल्यासमोर चहूबाजूने पसरलेली घनदाट झाडी आणि त्याच्या मधोमध काळाकभिन्न कातळ भिंतीचा गगनावेरी गेलेला सिद्धगडाचा शिखरमाथा आव्हान देत उभा ठाकतो. त्याच्या पायथ्याशी दाट वृक्षराजीत श्री नारमातादेवीचे प्राचीन मंदिर लक्ष वेधून घेते. आत देवीचा तांदळा आहे. तिचे दर्शन घेऊन आपण सिद्धगडवाडीत येतो, तेव्हा सुखद धक्का बसतो. अवघ्या पंचवीस-तीस घरांचा उंबरठा असलेला सिद्धगड गाव अतिशय उंच आणि आडरानात असूनसुद्धा स्वयंपूर्ण आहे. सदाहरित वनराई, आल्हाददायक हवा, प्राथमिक शाळा, अलीकडेच गावात आलेली वीज, मुबलक पाणी, शेती आणि जंगल संपत्तीमुळे गावकऱ्यांच्या साऱ्या मूलभूत गरजा इथेच भागत असल्याने त्यांचा आधुनिक जगाशी फारसा संबंध येत नाही. इथली आदिम वस्ती महादेव कोळी जमातीची असून येथे हेमाडे, घीगे, वडेकर, यंदे, कोकाटे, भवारी या आडनावांची कुटुंबे राहतात. लोक सुखी-समाधानी आणि अगत्यशील आहेत. २००४ पर्यंत येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा होती. तिचे रूपांतर वस्तीशाळेत केले असून सिद्धगड वाडीतील तानाजी मारुती हेमाडे हे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. अशा या स्वावलंबी, स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या गावावर २६ ते २९ जुलै २००५ साली नैसर्गिक प्रकोप झाला, त्यावेळी संपूर्ण कोकणातच अतिवृष्टीने थैमान घातले होते. त्या काळरात्री धरणीकंप व्हावा तसा गड हादरला. कानठळ्या बसविणारा कडकडाट करीत सिद्धगडाच्या दक्षिणेकडील काही भाग व पूर्वेकडील सह्याद्रीचा प्रचंड कडा, त्यावरील मोठमोठ्या झाडाझुडुपांसहीत खाली कोसळला आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्याने दरीतील नदीचे पात्र बदलले. यामुळे सिद्धगडावरील लोकांचा जगाशी असलेला संपर्क तुटला. परंतु या विलक्षण आपत्तीनंतर गावकरी लगेच सावरले आणि त्यांनी नव्या उमेदीने जीवनक्रम सुरू करताना हजारो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या आकाशातील घरट्याशी जोडली गेलेली नाळ तुटू दिली नाही.