राष्ट्रीय युवक दिवस
प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. अशा संकल्पनेची आठवण म्हणून आणि प्रत्येक युवक देशाप्रती अभिमानाने देश सेवा करण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य म्हणजे एक प्रकारचे तपच म्हणता येईल. यामध्ये त्यांचे कार्य युवकांसाठी खूप प्रेरक होऊ शकेल. त्याचा प्रत्यय म्हणून प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात विविध कार्यक्रम साजरे करून त्यांचे कार्य तरुणांसमोर आणले जाईल अशी भावना राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यामागे आहे.१२ जानेवारीला प्रत्येक शाळेत, कार्यालयात, जेथे युवा लोक जास्त प्रमाणात असतील त्या ठिकाणी तेथील युवक परेड करतात. विविध कला जसे की नृत्य, संगीत, नाटक सादर केले जातात. या दिवशी देशभक्ती, योगा, स्वामी विवेकानंद साहित्य, आणि इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर कला सादर केली जाते. या दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान देखील दिले जाते.संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.
राष्ट्रीय युवक दिनाचे महत्त्व
देशाची युवा शक्ती एका महापुरुषाकडे पाहून स्वतःचा आदर्श ठरवेल तर तसा व्यक्ती स्वामी विवेकानंदांव्यतिरिक्त दुसरा कोणी नसेल.
भारतीय धर्म, योग, ध्यान, अध्यात्म, आणि मानवी विकास यांचा प्रसार खऱ्या अर्थाने जागवायचा असेल तर भारतीय तरुण तशा स्वप्नाने भारावून गेला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे जीवन हे तार्किक आणि आध्यात्मिक अनुभवाच्या कसोटीवर पारखून घडलेले आहे. तो आदर्श समोर ठेऊन अंधश्रद्धा न पाळता, व्यसन तसेच क्षणिक सुखाच्या आहारी न जाता भारतीय युवक देशसेवेसाठी आणि धर्मासाठी झटला पाहिजे अशी भावना हा दिवस साजरा करण्यामागची आहे. तो दिवस १२ जानेवारी हा एकदम सूचक असा दिवस आहे कारण याच दिवशी स्वामीजींचा जन्म झालेला होता.