राजगड किल्ला (Rajgad Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

राजगड किल्ला

हा किल्लाही पुण्याजवळ असून तो सह्याद्रीतील मुरूंबदेवी डोंगर माथ्यावर बांधण्यात आला आहे. हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होय. तसंच असंही म्हटलं जातं की, शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ इथे व्यतित केला होता. हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. राजगडावरून तुम्ही सह्याद्रीचा अप्रतिम नजारा पाहू शकता. शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजींची सुरूवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (वेल्हे तालुका) वेल्हे गावाच्या आग्नेयीस सु. १६ किमी.वर समुद्रसपाटीपासून १,३७६ मी. उंचीवर आहे. पायथ्याच्या गुंजवणे गावापासून पायवाटेने गडावर जाता येते. तेथूनच राजगडचा चढ सुरू होतो. हत्ती, घोडे वगैरे वाहने जातील एवढी रूंदी वाट आहे. या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. यावर येण्यास गुंजपा, पाली, आळू व काळेश्वरी असे चार दरवाजे व तीन दिंड्या आहेत.

प्रत्येक माची व बालेकिल्ला यांवर पाण्याची व्यवस्था असून पद्मावती माचीवरील तळे पुष्कळच मोठे आहे. बालेकिल्ल्यावर लहानशी बाजारपेठ असून, त्या नमुन्यावरच पुढे रायगडची बाजारपेठ उभारलेली दिसते. या डोंगराचे प्रारंभीचे नाव मुरूमदेव. याला बहमनी आमदानीत महत्त्व नव्हते; पण अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. तदनंतर त्यास गडाचे रूप येऊ लागले. या गडाचे रक्षण करण्याचे काम प्रथम गुंजण माळवातील शिलिमकर देशमुखांकडे होते.

शिवाजीने १६४७ नंतर लवकरच मावळातील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले. त्याबरोबरच मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. यामुळे प्रथम काही दिवस शिलिमकर व शिवाजी यांत कुरबुरी होत असत. शिवाजींनी १६७० पर्यंत हीच राजधानी ठेवली. शिवाजी व पुढे संभाजीनंतर हा किल्ला एकदोन वेळा औरंगजेबाच्या ताब्यात गेला असला; तरी तो सामान्यतः मराठयांच्याच ताब्यात राहिला. छ. शाहूंच्या कारकीर्दीत मावळातील कित्येक किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले होते. सिंहगड वगळता संस्थाने विलीन होईपर्यंत ते त्यांच्या ताब्यात राहिले. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग असे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
सुवेळा माची
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे; एक ब्रम्हर्षी मंदिर आहे. सुवेळा माचीवरुन सुर्योदय पाहणे ही दुर्ग भाटक्यांसाठी एक पर्वणीच असते. गड किल्ल्याची भटकंतिकर्न्यसथि हे उपयुक्त आहे.
पद्मावती तलाव
गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडा
रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. या वाड्याच्या सभोवतालच्या पंचवीस एकरात महाराजांनी बागही तयार केली त्यास ‘शिवबाग’ असे म्हणत. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.

पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ‘फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

गुंजवणे दरवाजा
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवाजी महाराज पूर्व काळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते.

राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.

पद्मावती मंदिर
२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्ती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजी महाराजांने स्थापित केलेली आहे. या दोन मूर्तीच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.

संजीवनी माची
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली गेली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे .

आळू दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जात असे. आळू दरवाजा सद्यास्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाज्यावरील शिल्पात. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे दाखवले आहे.

सुवेळा माची : मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनीएवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते.

आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेढ किंवा ‘हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागातसुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

काळेश्र्वरी बुरूज आणि परिसर
सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.

बालेकिल्ला
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे.कोणत्याही मानवानी अशा प्रकारची वास्तू रचना या पूर्वी केलेली नाही .प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आपणास पहिला भेटते. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.
गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

गडावर जाण्याची साधने
कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकांवरून जाणाऱ्या महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या बस,खाजगी वाहन, गाड्या जाउ शकते.
१. गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे – राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
२. पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे खरीव या गावी उतरुन कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात
३. गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
४. आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५. गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.

राहण्याची सोय:
१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.
जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय: पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा