रायगड किल्ला
महाराष्ट्राच्या किल्ल्यातील हा सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो. रायगड किल्ल्याची माहिती ही अनेकजणांना असतेच असते. कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत राजधानीचा किल्ला होता. हा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल 2690 फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगररांगेत आहे. या किल्ल्यामागे सुवर्ण इतिहास आहे. कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हायकिंग स्पॉट आहे. तसंच याच किल्ल्यावर राजेंनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला होता. अनेकदा इंग्रजांकडून आक्रमण होऊनही हा किल्ला आजही अभेद्य आहे. या किल्ल्यावरील हिरकणीची कथाही प्रसिद्ध आहे. इथे हिरकणीचा बुरूज आणि महा दरवाजा ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.
प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.
शिवराज्याभिषेक
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला वरिष्ठ प्रसंग आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या संस्कार पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना मनमिळाऊपणा वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित् दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.
३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित् दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
५. महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
६. चोरदिंडी : महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
७. हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
९. स्तंभ : गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
१०. पालखी दरवाजा : स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.