पन्हाळा किल्ला (Panhala Fort)

Like
Like Love Haha Wow Sad Angry

पन्हाळा किल्ला

कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर अनेक लढाया लढण्यात आल्या. त्यापैकी सर्वात गाजलेली लढाई म्हणजे पावनखिंडीची. खरंतर हा किल्ला कोल्हापूरच्या राणी ताराबाई यांचं घर असं म्हटलं जातं. या किल्ल्यावर अंधार बावडी, भुयारी विहीर, कलावंतीणीचा महाल आणि आंबेरखाना यांचा समावेश होतो. या किल्ल्यावर काही देऊळंसुद्धा आहेत. त्यापैकी एक संभाजीराजे दुसरे यांना समर्पित आहे. दुसरं प्रसिद्ध देऊळ म्हणजे अंबाबाई मंदिर. असं म्हणतात की, कोणत्याही मोहिमेवर जाण्याआधी या देवळात प्रार्थना करत असत. पन्हाळा महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान. लोकसंख्या २,२१९ (१९७१). कोल्हापूरच्या वायव्येस सु. १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी हसरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. त्याची स. स. पासून उंची ८४५ मी. असून थंड हवा व रोगप्रतिबंधक पाणी यांकरिता ते प्रसिद्ध आहे.पन्हाळ्याचे दोन स्वतंत्र भाग आहेत. एक पन्हाळा किल्ला अथवा हुजूर बाजार आणि दुसरा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला रविवार, मंगळवार, गुरुवार, इब्राहीमपूर हा पेठांचा भाग. किल्ल्याचा परिघ ७.२५ किमी. आहे.

पन्हाळ्याचा एकूण परिसर हिरव्यागार वनश्रीने विनटलेला असून पावसाळा सोडून इतर ऋतूंत येथील हवा आल्हादकारक असते. पन्हाळा किल्ला केव्हा व कोणी बांधला यांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या बांधकामासंबंधी काही दंसकथा प्रचलित आहेत; तथापि कोरीव लेख व करवीर पुराण यांतून पन्हाळ्याचे प्रणलाक, पन्नाळे, पर्णाल, पन्नागालय वगैरे नामोल्लेख आढळतात. शिलाहार राजा दुसरा भोज (११७५-१२१२) याची राजधानी येथे होती. त्याने पंधरा किल्ले बांधले अशी आख्यायिका आहे. त्यांपैकी पन्हाळा हा एक असावा. त्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मराठे, मोगल व पुन्हा मराठे यांच्या सत्तांखाली पन्हाळा होता.

आदिलशाही काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी व दरवाजेही नवीन बांधण्यात आले. शिवाजी महाराजांनीही किल्ल्यात काही सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांना सिद्दी जोहारने वेढा दिला तो या किल्ल्यातच आणि महाराजांनी संभाजीस कर्नाटकाचा कारभार करण्यासाठी ठेवले तेही याच किल्ल्यात. ताराबाईने कोल्हापूरची गादी स्थापन केल्यानंतर पन्हाळा ही राजधानी केली. दरम्यान शाहूने काही दिवस पन्हाळ्याचा कबजा घेतला होता. कोल्हापूरचे छत्रपती शहाजी यांच्या वेळी (१८२१-३७) पन्हाळा ब्रिटिशांना काही वर्षें दिला ; पण पुढे स्वातंत्र्यापर्यंत तो कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत होता.

पहाण्याची ठिकाणे :

१) राजवाडा :-
ताराराणींने इ.स. १७०८ मध्ये हा राजवाडा बांधला. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय ,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी होस्टेल आहे.

२) शिवमंदिर :-
शिवाजी महाराजांचे हे मंदिर ताराराणी राजवाड्याच्या समोर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. मंदिरात शिवाजी महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्ती शेजारी ताराराणींच्या पादूका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील गुहा आहेत.

३) सज्जा कोठी (सदर – ई – महल ) :-
राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. ही २ मजली इमारत इ.स. १००८ मध्ये बांधण्यात आली. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी या इमारतीत शिवाजी महाराजांची गुप्त खलबते चालत .याच इमारतीत संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यासाठी ठेवले होते.

४) राजदिंडी :-
ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.

५) अंबारखाना :-
अंबारखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा व प्रकाश खेळ्ण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. याशिवाय येथे सरकारी कचेर्‍या, दारुकोठार आणि टाकंसाळ इत्यादी होती.
धान्यकोठारा जवळ एक महादेवाचे मंदिर आहे.यात पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम तापमाना प्रमाणे रंग बदलतो,म्हणून यास रंग बदलणारी पिंड म्हणतात.

६) चार दरवाजा :-
हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी पाडून टाकला. त्याचे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.

७) सोमेश्वर (सोमाळे) तलाव :-
गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्र्‍यांनी लक्ष्य चाफ्र्‍यांची फुले वाहिली होती.

८) रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी :-
सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.

९) रेडे महाल :-
पन्हाळ गडावर एक भव्य आणि आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुत: ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. पण या महालाची रचना व त्यातील कमानी व कोरीव काम पाहाता हा रेडे महाल नसून डेरे महाल असावा. खासांच्या निवासासाठी याची योजना असावी.

१०) संभाजी मंदिर :-
रेडे महालाच्या पुढे एक छोटे गढी वजा मंदिर आहे, हे छ. राजारामांचा पूत्र संभाजी(१७१४-१७६०) याचे आहे. मंदिरात शिलालेख आहे, तर मंदिराच्या आवारात विहीर व घोड्याच्या पागा आहेत.

११) धर्मकोठी :-
संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म केला जात असे.

१२) अंधारबाव (श्रुंगार बाव) :-
तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. मधल्या मजल्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आहे. वरच्या मजल्यावर राहाण्याची सोय आहे. या इमारतीत एक शिलालेख आहे.

१३) महालक्ष्मी मंदिर :-
राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

१४) तीन दरवाजा :-
हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. याला कोकण दरवाजा असेही म्हणतात. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.दरवाजावर एक शिलालेख शरभ कोरलेले आहेत. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.

१५) बाजीप्रभुंचा पुतळा :-
एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

१६) पुसाटी बुरुज:-
पन्हाळ्याच्या पश्चिम टोकावर हा पुसाटी किंवा पिछाडी बुरुज आहे.येथे २ बुरुज असून त्यामध्ये खंदक आहे. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला असून त्याची उंची २० फूट आहे.

१७) नागझरी:-
गडावर बारमाही पाण्याचे दगडात बांधलेले एक कुंड आहे. याला नागझरी असे म्हणतात. यातील पाणी लोहयुक्त आहे. याच्या जवळच हरिहरेश्वर व विठ्ठल मंदिर आहे.

१८) पराशर गुहा:-
पन्हाळगडावरील लता मंगेशकर यांच्या बंगल्याजवळ एकामागोमाग खोदलेल्या ५ गुहा आहेत. आत मध्ये दगडात खोदलेल्या बैठकी आहेत. याच गुहेत पराशर ॠषींनी तपश्चर्या केली होती.

१९) दुतोंडी बुरुज :-
पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्‍या असलेला बुरुज आहे, त्याला दुतोंडी बुरुज म्हणतात. या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज म्हणतात.
याशिवाय गडावर कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, मोरोपंत ग्रंथालय इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories