पळशीकर वाडा (Palashi Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

पळशीकर वाडा

पळशीच्या किल्ल्याला तसा युद्धाचा काही इतिहास नाहीये. होळकरांचे दिवाण असलेले रामाजी यादव कांबळे- पळशीकर यांनी या किल्ल्याची म्हणजेच गढीची निर्मिती करून घेतली होती. पळशी हि त्या काळात बारा गावांची बाजारपेठ असावी परंतु आज एक छोटंसं खेडेगाव बनलंय. पळशी गावाचा कारभार तेव्हा पळशीकर वाड्यातूनच चालत असावा असा अंदाज आहे. आजही हे वाडे वादाच्या भोवऱ्यात असून सर्व वाड्यांची मालकी हि खाजगी आहे. आपण पाहिलेल्या पळशीकर वाड्याची मालकी हि सध्या वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्याकडे असून ते सध्या इंदूर, मध्यप्रदेश येथे वास्तव्याला असतात. नवरात्र उत्सवात ते भेट द्यायला इकडे येतात देखील.आजच्या वाड्याच्या अवस्थेवरून खाजगी मालकी असल्याने ऐतिहासिक ठेवा जपला जात नाहीये असेच वाटते व गावकरी देखील याची काळजी घेत नाहीयेत हीच खंत वाटते.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पळशी नदीच्या काठी पळशीचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यात असलेल्या होळकरांच्या वाड्यात लाकडावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पहाण्यासारखे आहे. पळशी किल्ल्याबाहेर असलेले विठ्ठल मंदिरही अप्रतिम कोरीवकामाचा नमुना आहे.खाजगी वहानाने एका दिवसात पळशीचा किल्ला, विठ्ठल मंदिर, त्याच बरोबर २५ किलोमीटर वरील टाळकी ढोकेश्वरची हिंदु (ब्राम्हणी) लेणी पाहाता येतात. टाकळी ढोकेश्वर पासून ३३ किमीवर असलेला जामगावचा किल्ला आणि तेथुन १२ किलोमीटरवर असलेले पारनेर येथील सिध्देश्वर मंदिर आणि तेथील निसर्गरम्य परिसर पाहाता येतो.
पहाण्याची ठिकाणे :
पळशीच्या भुईकोटाला १६ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील २ दरवाजे मोठे असून दोन दरवाजे लहान आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाजातून थेट गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात गाव वसलेले असल्याने किल्ल्याच्या उत्तर भागात पक्के रस्त बनवलेले आहेत. किल्ल्याचा उत्तर दरवाजा आणि त्याच्या बाजूचे भक्कम बुरुज आजही दिमाखाने उभे आहेत, गावकर्‍यांनी याला रंग लावून शोभा घालवलेली आहे. दरवाच्या दोन्ही बाजूला दोन शिलालेख कोरलेले आहेत. दरवाजातून किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात शिरल्यावर चौफ़ेर वस्ती दिसते. या वस्तीतून महादेव मंदिराकडे चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. या मंदिराचे दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीवर हनुमान कोरलेला आहे. गाभार्‍या समोर मोठे कासव आहे. मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक गल्ली जाते या गल्लीत एक मोठा तोफ़गोळा पडलेला आहे. तेथेच दोन पुरातन दिपमाळा आहेत. तेथून पुढे गेल्यावर पळशीकरांचा वाडा आहे. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. या वाड्याचा दरवाजा आणि त्याची चौकट यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर एक बोळ लागतो. तो पार केल्यावर डाव्या बाजूला वाड्याचे दुसरे दार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. वाड्यात सध्या दोन भाडेकरु राहातात. वाडा बांधला तेंव्हा दुमजली होता पण आज केवळ एकच मजला शिल्लक आहे. चौकात शिरल्यावर वाड्याच्या खांबांवर , हस्तांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम पाहायला मिळते. वाड्याला तळघर आहे पण ते सध्या बंद केलेले आहे. चौकात मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे.

किल्ला हा भुईकोट असल्याने तशी काही काळजी घ्यायची गरज नाहीये परंतु जर पळशीकर वाडा निरखून बघायचा असेल तर विजेरी(बॅटरी) सोबत ठेवावी. खडकवाडी मधून पुढे पळशी किल्ल्याकडे गेल्यावर आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसू लागते. आपण किल्ल्याच्या उत्तर दरवाजा समोर येऊन पोहोचतो. गावकऱ्यांनी किल्ल्याच्या या मुख्य प्रवेशद्वाराला रंग रंगोटी करून सुशोभिकरण केलेले आहे.गडाला संपूर्ण बाजूने तटबंदी आहे.एकूण १६ बुरुज किल्ल्याला असून संपूर्ण पळशी गाव हे किल्ल्याच्या मध्येच वसलेले होते परंतु आता गावकरी सोयीनुसार तटबंदीबाहेर जात आहेत. किल्ल्याला एकूण ४ दरवाजे असून यातील २ दिंडी दरवाजे अथवा चोर दरवाजे आहेत आणि २ मुख्य दरवाजे आहेत, एक पूर्व दरवाजा आणि उत्तर दरवाजा आहे. दोनही मुख्य दरवाजे इतके भव्य आहेत कि त्यातून चार चाकी वाहने सहज जाऊ शकतील.दीपमाळा बघून आपण पुढे पळशीकरांच्या वाड्याकडे जातो. इथे आपल्याला वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात.इथे ४ वाडे होते असे सांगितले जाते व अवशेष देखील तेच सांगतात. आपण एका पडक्या भिंतीसमोर येऊन पोहोचतो.इथे आल्यावर बिलकुल वाटत नाही कि इथे तो पळशीकरांचा वाडा असेल म्हणून परंतु याच कचऱ्याच्या ठिकाणी आपल्याला पळशीकरांचा वाडा दिसतो.(खरंच इतिहास खितपत पडलाय, याचा अर्थ आज कळतो) वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या आतून आपण पुढे जातो तिथे आपल्याला पहारेकऱ्यांची बसायची जागा आपल्याला दिसते.तिथून आपण वाड्याच्या मुख्य चौकात येऊन थांबतो. इथे आल्यावर आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही. सुंदर कोरीव लाकडी नक्षीकाम आणि एक संघ लाकडातील कला सोबतीला खांबांचे नक्षीकाम आणि स्थापत्य बघून मन तृप्त होते. येथे आपल्याला चौकात स्नानासाठी त्याकाळी वापरला जाणारा भव्य पाट बघायला मिळतो. याशिवाय एक भुयार देखील इथे आहे असे राखणदार भास्कर शिंदे सांगतात.चौकात उभे राहिल्यावर समोरच दक्षिणेकडे आपल्याला कारभाराची जागा बघायला मिळते. इथेच या वाड्याचे सध्याचे मालक रामराव कृष्णराव पळशीकर व त्यांचे वडील कृष्णराव पळशीकर यांचे फोटो बघायला मिळतात. हे बघून आपण वाड्याच्या प्रत्येक खांबाचं नक्षीकाम अगदी बारकाईने बघायचं. उजव्या हाताला आपल्याला देवघर बघायला मिळते, याच देवघरात त्या काळी सोन्याचे देव होते असं सांगितलं जाते परंतु आता ते बंद आहे.आता आपण जिन्याच्या शेजारी असलेल्या भव्य राहण्याच्या खोलीत जायचे. या खोलीत जात्याच्या भव्य तळी आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक भव्य तळमजल्याला जाण्याचे द्वार आहे. इथून आजही कोणी खाली जाऊन बघितलं नाहीये. अजून एक इथेच भुयारी मार्ग बघायला मिळतो. वाड्यातील एक भुयारी मार्ग देवीच्या मंदिराकडे, दुसरा महादेव मंदिराकडे आणि आणखी एक विठ्ठल मंदिराकडे म्हणजेच किल्ल्याच्या बाहेर पडतो असे सांगितले जाते.वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर आपल्याला काही खोल्या व देवड्या सारखी रचना दिसते परंतु आजच्या आमच्याच पिढीने प्रेमप्रकरण इथे कोरून ठेवायचे काम केलंय, इथेच असलेल्या फोटो लावायच्या जागांवर आता विचित्र चित्रकला केलेली आहे. गर्व वाटतो आम्हाला असं काहीतरी करायला आणि आमच्याच इतिहासाला विद्रुप करायला, हो ना?

किल्ल्याच्या वरचे २ मजले आता नाहीयेत परंतु आपण तिसऱ्या मजल्याच्या भिंतीवरून परिसर न्याहाळू शकतात. वाड्याच्या भिंतीला जंग्यांची रचना बघायला मिळते ती तुम्ही बाहेर आल्यावर बघू शकता. आज वाडा दोनच मजल्यात बघायला मिळतो परंतु कधीकाळी इथे ४ मजली चौसोपी वाडा होता आणि आता कालानुरूप तो फक्त २ मजली राहिलाय व अवस्था बिकटच असल्याने कदाचित पुढच्या पिढीला हा बघायला मिळेल कि नाही याची शंकाच वाटते.वाडा बघून आपण बाहेर पडायचं आणि किल्ल्याच्या पूर्व दरवाजाकडे जायचं. पूर्व दरवाजाच्या बुरुजांवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्यावर जाऊन आपण पळशी नदी आणि ऐतिहासिक विठ्ठल मंदिर देखील बघू शकता. दरवाज्याच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या बघायला मिळतात. पूर्व दरवाजा बघून आपण किल्ल्याची भटकंती संपवतो. पुढे ऐतिहासिक पुरातन विठ्ठल मंदिर बघायला आपण जाऊ शकता.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा