माहुलीगड (Mahuligad)

Like
Like Love Haha Wow Sad Angry

माहुलीगड

इतिहास
हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काहीच माहिती नाही पण निजामशाहीत हा किल्ला शहजीराजेंकडे होता पण परकीय आक्रमणासमोर सैन्यबळ कमी असल्याकारणे त्यांना तो मुघलांच्या स्वाधीन करावा लागला नंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात शामिल केला. जवळ जवळ ३ वेळा हा किल्ला परकीयांनी हल्ले करून स्वराज्याकडून जिंकून घेतला आहे पण नंतर तिन्ही वेळा शिवरायांनी माहुली किल्ला पुन्हा जिंकला यावरूनच या किल्ल्याचे महत्व काय असावे याचा अंदाज बांधलेलाच बरा.किल्ले माहुली हा ठाणे जिल्ह्यातील किल्ला असून चढाई साठी मध्यम श्रेणीचा आहे.ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाज वळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्यान वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.

माहुलीगाव ते किल्लाच्या पायथा या १० मिनिटांच्या रस्त्यात आपल्याला एकूण ४ मंदिरे लागतात. हि मंदिरे सुद्धा ऐतिहासिक आहेत. प्रथम मारुतीचे मंदिर लागते. या मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती जुनी आहे. विहिरीच्या समोर एक शिवमंदिर असून त्याला माहुलेश्वेर असे म्हणतात.मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारा लगतच नांदी असून नंदी ज्या पायावर तो पाय पाहता त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. नंदिसमोर शिवलिंग असून इतर शंकराच्या मंदिरा प्रमाणेच हे शिवलिंग सुद्धा जमिनीच्या समान पातळीवर नसून काहीसे खाली आहे. गाभारयातील शिवलिंगाच्या मागे एका कोनाड्यात मत पार्वतीचे शिल्प आहे. या माहुली मंदिरात माहुलीचा संक्षिप्त इतिहास व माहुलीची रचना दुर्गप्रेमी मंडळाने चित्रित केली आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या बाजूने उजव्या हाताला एक रस्ता जातो. तो माहुली किल्ल्यावर उगम पावणाऱ्या भारंगी नदीकडे जातो. पावसाळ्या व्यतिरिक्त या नदीत फारसे पाणी नसते. मंदिराच्या डावीकडे देवीचे मंदिर असून त्यातील देवीची मूर्ती शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. यातील मुख्य मूर्ती हि वज्रेश्वरीच्या मूर्तीसारखी आहे असे पुजारी सांगतात. या दोनही मंदिराच्या आसपास काही प्राचीन शिल्प सुद्धा विखुरलेली आहेत. देवीच्या मंदिरामागे एका पिंपळ वृक्षाखाली गाडी चौथऱ्यावर शिवलिंग व गणेश मूर्ती आहे. माहुलेश्वर मंदिराच्या मागून एक पायवाट जाते.या पायवाटेने पुढे गेल्यास दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून त्याचा जीर्णीधारला झाला आहे.

मंदिराच्या समोर एक दगडी घुमट, दगडी अर्धवट फुटलेला पाटा, युद्धप्रसंगांचे चित्रण असलेले अर्धवट फुटलेले विरगळ आहे. या चारही मंदिरातील मूर्ती किती जुन्या आहेत हे सांगता येणे तसे अशक्य आहे. पण त्य शिवकालीन वा पेशवेकालीन म्हणजेच मध्ययुगीन तर नक्कीच आहेत. पेशावेकाळात यातील काही मंदिरांची स्थापना झाली असे मानले जाते. किल्ल्याचा इतिहास आणि पायथ्याचा परिसर एकदा लक्षत आल्यानंतर प्रत्यक्षात किल्ला चढणे व किल्ल्याची पाहणी करणे सोपे जाते. मुळात हा एकाच किल्ला नसून दुर्गत्रिकुट आहे. मध्यभागी माहुली उजवीकडे पळसगड आणि डावीकडे म्हणजे काहीसा पश्चिमेकडे भंडारगड असे हे त्रिकुट असल्याने एका दिवसात हे तीनही पाहता येणे शक्य आहे. गडावर जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. किल्लाचा महादरवाजा हा मूळ मनाला जातो. एका नाळेच्या तोंडाशी कातळ खोदून पायरया खोदलेल्या असून पहारेकारांच्या देवड्या कोरलेल्या आहेत. या देवड्याच्या पुढे बुरुज उभारले आहेत. वास्तविक हि किल्ल्यावर जायची मूळ वाट आहे. पण ह्या वाटेवर केवड्याचे वन वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या मुख वाटेवर दुर्लक्ष झालेले आहे. ह्या महादरवाजा बरोबरच भंडारगडावरून कल्याण दारावाजाद्वारे किल्ल्यावर जाता येते. पण हा मार्ग खूपच अवघड असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाण्यासाठी गणेश मंदिराच्या समोरून गेलेली पायवाट हाच एक योग्य मार्ग आहे. *सध्या ह्या पायवाटेने किल्ल्याकडे जाता येते.

या पायवाटेने जाताना वाटेत एक डोंगराचा सुळका वा डोंगराची कडा लागते. तिचा आकार घोड्याच्या मानेसारखा असल्याने त्याला घोड्याची मान असे म्हणतात तेथून पुढे वर आल्यानंतर वाट साधी आणि एकदम उभी चढणीची होते. येथे आपण माहुलीच्या कड्याला येतो. कडा चढून जाण्यासाठी सुमारे ८-९ फुट उंचीची एक लोखंडी शिडी आहे. पूर्वी हि शिडी मोकळी होती. आता मात्र ती मजबूत केली आहे. संपूर्ण किल्ला चढताना हे एकाच ठिकाण अवघड आहे. ते मात्र जपून जावे लागते. शिडी चढून वर आल्यानंतर जवळ जवळ किल्ल्यात मागील बाजूने प्रवेश होतो. हा पायवाटेचा मार्ग मुळच्या महादरवाज्याच्या वाटेपासून किमान पाचशे फुटापेक्षाहि दूर आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे झाडा झुडूपात न जाता उजवीकडे जी पायवाट आहे, तेथून महादरवाजाकडे जाता येते. तेथे एक पाण्याचे टाके व देवड्या म्हणजे पहारेकरयाची जागा आहे. दुसरे एक पाण्याचे टाके शिडी चढून वर आल्यानंतर लगेच दिसून येते. पायथ्याशी शिवमंदिरासमोर विहीर आणि दोन टाकी या व्यतिरिक्त पाण्याची सोय अन्यत्र नाही. महादरवाज्या वरून उजवीकडे न जाता सरळ वरच्या अंगाकडे गेल्यानंतर एक भिंत आणि कलाकुसरीची काही शिल्प आढळतात. तेथे उर्दू लिपीतील शिलालेख असून त्याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही. या जागेला नमाजगिर असे म्हणतात. नमाजगिराच्या उजवीकडे गेल्यानंतर एका वाड्याचे अवशेष आढळतात. एकेकाळी चिरेबंदी असणाऱ्या वाड्याचे आज भग्नावशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावरच्या पठाराच्या मध्यभागी एक तळे असून त्याला माहुलेश्वराचे तळे असे म्हणतात. पळसगडावरून तानासातलावाचे विहिंगमय दृश्य दिसते. पळसगडावर जाणारी वाट बांबूच्या बनातून जाते. पळसगड का म्हंटले जाते हे सांगता येत नाही. मात्र कदाचित येथे पूर्वी पळसाची झाडे विपुल प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यालाच गिर्यारोहक छोटा माहुली असेही म्हणतात.

माहुलीच्या डाव्या बाजूस म्हणजेच काहीसा दक्षिणेस भंडारगड आहे. भंडारगड नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे गडावरील या ठिकाणी भांडार असावे. या गडाच्या दक्षिणेस चार सुळके असून त्याला स्थानिक लोकांनी भटजी, नवरा, नवरी, करंगळी अशी नवे दिलेली आहेत. माहुलीवरील टाक्यांकडून भंडारगडाच्या दिशेने जाताना दोन शिल्पे असून त्यांचे चेहरे डूक्करांसारखे आहेत. म्हणून त्याला डूक्करतोंडी शिल्पे असे म्हणतात. पायथ्याजवळील मंदिराच्या परिसरात पडलेल्या विरगळ प्रमाणे येथे सुद्धा एक विरगळ आहे. मध्यभागी काही ज्योतीसुद्धा आहे. त्याच्यापुढे एक तळे व काराविमध्ये हरवलेली माहुलेश्वर मंदिराची जागा आहे. भंडारगडावर दहा खांबांचा एक हत्तीखाना असून येथे कायम थंडगार पाणी असते. माथ्यावर पश्चिम दिशेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा कल्याण दरवाजा आहे.

कल्याण सुभ्याकडून येणारा रस्ता म्हणून त्याला कल्याण दरवाजा असे नाव मिळाले असावे. या दरवाजातील आतल्या बाजूस मराठीत एक शिलालेख असून त्याची भाषा दुर्बोध आहे. माहुली किल्ला व भंडारगड यांच्यामध्ये एक आडवी तिडवी पसरलेली खिंड असून भंडारगडावर पोहोचण्यासाठी खिंड उतरून एक डोंगर चढावा लागतो. पळसगडावरील कल्याण दरवाजातून खाली उतरण्याची वाट अत्यंत अवघड आहे. एका घळीत एक झिजलेला व अर्थबोध न होणारा लेख व काही कोरीव पायरया आहेत. तर दरवाज्याजवळ एक टाके असून त्याला माठ टाक म्हणतात. तेथून पुन्हा माहुलीकडे जाताना उजव्या बाजूस एका डोंगराच्या माथ्यावर कड्यापाशी एका दरवाजाचे अवशेष आढळतात. याला हनुमान दरवाजा म्हणतात. तेथून पुढे हनुमान व गणपतीची कोरीव शिल्पे आहेत. तेथून खाली पायथ्याशी येणे किव्हा माहुलीच्या मध्यभागी जावून त्या रस्त्याने पायथ्याशी येता येते, परंतु ह्या वाटेने स्थानिक लोकच ये जा करू शकतात कारण वाट अवघड आहे. भंडार गडाच्या दक्षिणेस असलेल्या चार सूळक्यांचा व खिंडीच्या अलीकडे एक डोंगर असून त्यास माहुली-चंदेरी या नावाने ओळखले जाते पण हे नाव मुळचे नाही. माहुली किल्ल्यावरील भारंगी नदी तेथे उगम पावते. हि नदी पायथ्याला वेढाघालून पुढे जाते तेथून ती शहापूर येवून शेवटी भातसा नदीलाजावून मिळते.असे एकंदरीत माहुली किल्ल्याचे स्वरूप असून दोन शिलालेख, कल्याण, हनुमान व महादरवाजा, चिरेबंदी वाड्याचे अवशेष, पाण्याच्या टाक्या, माहुलेश्वर, मंदिर, तळे, बुरुज, देवड्या, विरगळ घोड्याची मान, भटजी, नवरा, नवरी, व करंगळी हे सुळके, तीन जोती, डूक्करतोंडी शिल्प, हनुमान व गणेशाची शिल्पे, तानसा तलाव पोंईन्ट, भारंगी नदीचा उगम, सूर्योदय व सूर्यास्त, खिन्डी, दरी, बांबू व केवड्याची बने, पावसाळ्यातील धबधबे व दुथडी भरून वाहणारी भारंगी नदी, किल्लाच्या पायथ्याशी असणारी चार मंदिरे, माथेरान पेक्षाही उंच व थंड हवा, हिरवीगार वनश्री यामुळे माहुली हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे. वानरे, ससे, माकडे, डुकरे, हरीण, हे प्राणी व मोर, घार, गिधाड, यासारखे पक्षी तर फुरश्यासारखे विषारी साप असे येथील वन्य जीवन समृद्ध आहे.

सावरोली रस्त्यावरील सरकारी गोदामाजवळ एक वाघोबाचे मंदिर आहे. माहुलीच्या जंगलातील वाघाचा आपणास उपद्रव होवू नये म्हणून हे मंदिर बांधले गेल्याचे सांगितले जाते. यावरून माहुलीच्या वन्यजीवानाची कल्पना येते. माहुलीवरील सुळके, माहुली किल्ला, व भंडारगड यामधील खिंड, वाटेवरली शिडी, हनुमान दरवाजा व कल्याण दरवाजा वरून खाली उतरण्याची वाट याठिकाणी दक्षता घ्यावी लागते. सकाळी लवकर जावून संध्याकाळी परतणे शक्य आहे. किल्ल्यावर राहायची व्यवस्था नाही. स्थानिक लोकांना विचारून रस्त्याची माहिती करून घ्यावी. माहुली किल्ला हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. किल्ल्यावरील व पायथ्यावरील ऐतिहासिक अवशेष हा आपल्या इतिहासाचा व संस्कृतीचा एक अनमोल ठेवा असून पर्यटकांनी, गिर्यारोहकांनी आणि अभ्यासुनी त्याचे योग्य ते जतन करावे.माहुली किल्ल्याकडे जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशन वर उतरून रिक्षा अथवा बसने शहापूर गावात उतरणे सोयीस्कर ठरते. शहापूर गावातून माहुली गावाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षा, बस असतात. बस अनिश्चित आहेत. किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात विश्रांती घेवून किल्ला चढणे हा एक उत्तम पर्याय आहे. सुमारे दीड ते दोन तासाच्या चढणीत वाटेत कोठेही पाणी नसल्याने पाणी जवळ असावे. किल्लाच्या पायथ्याशी जी मंदिरे आहेत त्यांना सुद्धा इतिहास आहे. पेशवेकालीन वाड्याचे काही अवशेषही किल्लाच्या पायथ्याशी आहेत. *पेशवाईच्या काळात किल्लाच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे होते. त्यांचे अवशेष आजही आहेत. मंदिरासाठी वर्षासने दिली होती. परंतु पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटीश काळात आणि स्वातन्त्रायानंतर मंदिराकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन उदासीनच होता.ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ला तीन भागांत विभागलेला आहे. यांच्या उत्तरेकडील भागाला पळसगड म्हणतात तर दक्षिणेकडील भाग हा भंडारगड म्हणून ओळखला जातो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories