कन्हेरगड
शके ११५०(इ.स.१२२८)मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. या मंदिराच्या परिसरात भारतीय गणितज्ञ भास्कराचार्यांनी शून्याची संकल्पना मांडली आणि गणितशास्त्राची खऱ्या अर्थाने प्रगती सुरू झाली.कन्हेरगड किल्ल्याची उंची 660 मीटर असून तो गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेत असलेला हा किल्ला चढाईसाठी मध्यम स्वरुपाचा आहे. त्यामुळे तरुणांबरोबर मुले, महिलाही येथे सहज जाऊ शकतात. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्टेशनपासून 18 किलोमीटर अंतरावर कन्हेरगड हा किल्ला आहे.या इतिहासदुर्गाची उभारणी आठव्या शतकात झाली. येथे यादव सम्राट आणि त्यांच्या मांडलिकांचे राज्य होते. शके 1150 मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. या मंदिराच्या परिसरात खगोलशास्त्रज्ञ व गणितसूर्य भास्कराचार्यानी शून्याची संकल्पना मांडली आहे. त्याच्या वास्तावासंबधीचा शिलालेख येथे आढळून येतो. हा परिसर अतिशय नयनरम्य व मनमोहक निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.
चाळीसगाव हे तालुक्याचे ठिकाण असून पाटणादेवी येथे येण्यासाठी मध्य रेल्वेने सहजपणे पोहचू शकतात. चाळीसगाव बसस्थानकावरुन दर तासाला पाटणादेवी या पर्यटनस्थळी जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. सकाळी साडेसहा वाजेपासून बससेवा आहे. बसने पाटणादेवी स्थानकाच्या दिड किलोमीटर अलिकडे महादेव मंदिर थांब्यावर कन्हेर गडासाठी उतरावे लागते. डाव्या हाताच्या खडकाळ पायवाटेने दहा मिनिटात मंदिरात जाता येते.मंदिराच्या मागून पंधरा मिनिटे चालल्यावर एक सिंमेटमध्ये बांधलेली मेघडंबरी येते. तेथून डाव्या हाताने जाणाऱ्या पायवाटेने कन्हेरगडचा डोंगर चढायला सुरुवात करावी. कन्हेर गडावर जाण्यासाठी असलेला प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. वाटेत दगडी पायऱ्या ही लागतात. पुढे दहा मिनिटात पायवाट उजवीकडे वळते आणि नागार्जुन गुंफापाशी पोचतो. उजवीकडे वळणाऱ्या वाटेवर शृंगारचौरी लेणी आणि डावीकडे वळणाऱ्या वाटेवरचा दगडी कातळ चढली की कन्हेरगडाची माची लागते. तिथून पुढे जात राहिले की गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.
पाहण्यासारखी ठिकाणे
हेमांडपती महादेव मंदिर
उंच चौथऱ्यावर काळ्या दगडांनी बांधलेल्या ह्या पूर्वेकडे तोंड असलेल्या सुंदर मंदिराच्या चारी बाजूने अनेक मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्यावर गणेशपट्टी आणि सप्तमातृका आहेत. मंदिराचा सभामंडप आणि तेथील एक शिलालेख पाहाण्यासारखा आहे. हे मंदिर भारतीय पुरातन खात्याने संरक्षित म्हणून जाहीर केले आहे.
मेघडंबरी नागार्जुन गुंफा
या गुंफा इसवी सनाच्या नवव्या शतकात कोरलेल्या आहेत. येथे तीन दालने नक्षीकाम केलेले खांब, इंद्राची प्रतिमा, महावीराची एक व अन्य तीर्थकरांच्या मूर्ती आणि त्याच्यावर चवरी ढाळणाऱ्या सेवकाची एक मूर्ती आहे.
सीतेची न्हाणी लेणी
लेण्यांची ओवरी 18 फुट रुंदीची असून दोन्ही बाजूला साधे खांब आहेत. येथे प्रभू रामचंद्र येऊन गेले होते अशी आख्यायिका ऐकायला मिळते.
शृगांरचौरी लेणी
ही अकराव्या शतकातली हिंदू पद्धतीची लेणी आहेत. लेणी पाच खांब्यावर उभी असून आत काही शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत. पाटणादेवी मंदिराच्या परिसरात राहण्यासाठी वनखात्याच्या वतीने भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. चहा, नास्त्यासाठी स्थानिकांची दुकाने आहेत. सर्व लेणी, पुरातन मंदिरे आणि आसपासची सर्व ठिकाणे पाहण्यासाठी पाटणादेवीला दोन दिवसांचा मुक्काम करावा लागतो.