जंजाळा किल्ला
इतिहास
तालतम किल्ल्याची नक्की निर्मिती कुणी व कधी केली ह्याचा आपल्याला अजून मागोवा लागलेला नाही. काही इतिहास संशोधकांनुसार सोळाव्या शतकात ह्या किल्ल्याचा ताबा अहमदनगरच्या निजामाकडे होता तर सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शाहजहानाने मराठवाड्यातील इतर अनेक किल्ल्यांबरोबरच इथेही कब्जा मिळवला. पुढील दोन शतके ह्या प्रदेशावर हैदराबादच्या निजामाचा अंमल होता. निजामाच्या अखत्यारीतील इतर किल्ल्यांप्रमाणे हा विसागड ही स्वतंत्र भारतात सामील झाला व त्याची जबाबदारी राज्य पुरातत्व खात्याकडे आली. किल्ल्याची एकंदरीत दुरावस्था आणि सुलेखित माहितीफलकांचा अभाव पाहता पुरातत्त्व खात्याचे अजूनतरी किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.किल्ले तालतम… सिल्लोड तालुक्यातील अंभईनजीकच्या जंजाळा किंवा सोयगाव तालुक्यातल्या जरंडी ह्या जवळच वसलेल्या गावांवरून किल्ले जंजाळा किंवा जरंडीचा किल्ला म्हणूनही ओळख आहे. औरंगाबादच्या डोंगराळ उत्तर भागात सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यांच्या सीमेवरील अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये २०० ३३’ ५७.८” उ. अक्षांश आणि ७५० ३४’ ५३.५” पू. रेखांशावर वसलेला हा किल्ला. सुतोंडाप्रमाणेच हा किल्लासुद्धा दक्खनच्या उत्तर वेशीवर राज्यरक्षणाचे जणू व्रत घेऊन धीरोदात्तपणे उभा ठाकलेला आहे.
स्थापत्यरचना
महाराष्ट्रातील अवाढव्य किल्ल्यांपैकी एक मानला जाऊ शकेल असा काहीशे एकरांचे क्षेत्रफळ व्यापलेला हा वैशागड किंवा विसागड किल्ला. ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पठारावर वसलेल्या जंजाळा गावाच्या दिशेने भूदुर्ग आणि इतर दिशांना डोंगरउतार असल्यामुळे गिरिदुर्ग अशी किल्ले धारूरसारखी रचना.
अमीबासारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या किल्ल्याची तटबंदीसुद्धा काही किलोमीटर आहे. उत्तर पश्चिमेचा जरंडी दरवाजा, दरीत उतरणाऱ्या वाटेवरून वेताळवाडी किल्ल्याकडे पाहणारा आणि भव्य बुरुजांचे संरक्षण लाभलेला वेताळवाडी दरवाजा, एक चोर दरवाजा आणि ५२ बुरुज असा जामानिमा ह्या किल्ल्याला आहे. प्रत्येक किल्ल्याला देवड्या आणि काही खोल्या जोडलेल्या आहेत. वेताळवाडी दरवाज्यालगत फारसी भाषेतील शिलालेख आहेत. जंजाळा गावाच्या दिशेने ह्या भूदुर्गाच्या संरक्षणासाठी एक खंदकाची योजना दिसते. आता हा खंदक पूर्णच बुजला आहे. इथून तटबंदी फुटलेली असल्यामुळे आज किल्ल्यात जायचा सोपा मार्ग झाला आहे. मात्र ह्या बाजूला एखादे प्रवेशद्वार असेल का हा अंदाज आज लागणे अवघड आहे. ह्या भागात खंदकाच्या बाहेर पूर्वी सुरेखशी एक तोफ पडलेली होती. अंतुर किल्ल्यातील तोफेच्या चोरीनंतर संरक्षणार्थ आणि किल्लेप्रेमींच्या आग्रहाखातर आज पुरातत्त्व खात्याने ती सोनेरी महाल संग्रहालयात आणून ठेवलेली आहे.
संरक्षणरचनेबरोबर किल्ल्यात आज राणी महाल, पडका सहा खोल्यांचा वाडा, तीन कमानींची मशीद, सय्यद कबीर कादरी ह्या पीराचा दर्गाह अशा काही इमारतींचे अवशेषमात्र दिसतात. पीराच्या दर्ग्यामागे तीन ओळींचे दोन शिलालेख आहेत. त्यांचे सुयोग्य वाचन अजून झालेले नाही. सुतोंडा किल्ल्यासारखी इथली पाण्याची गरज किल्ल्यावरचे काही मोठी टाकी आणि एक तलाव यातून भागवलेली आहे.
सहाव्या शतकात कोरलेली घटोत्कच लेणी आणि किल्ला बरोबरीने पाहता येतात. मराठवाड्यातील किल्ल्यांची ढोबळ मानाने वर्गवारी केली तर दक्षिण मराठवाड्यातील भूदुर्ग लढाऊ आणि मोठी वस्ती पोटात सांभाळण्याच्या दृष्टीने स्थापत्यरचना असणारे आहेत. त्यांचा ऐतिहासिक मागोवा घेण्याचे काम ही बऱ्याच प्रमाणात इतिहास संशोधकांकडून झालेले दिसते. उत्तर मराठवाड्यातील बहुतांशी गिरिदुर्ग हे डोंगराळ दुर्गम भागात निर्मिलेले आहेत. अंतूर, जंजाळा सोडले तर इतर किल्ल्यांमध्ये भव्य स्थापत्यरचना आणि मोठ्या वस्तीच्या खुणा सापडत नाहीत. मात्र त्यांचे भौगोलिक स्थान उत्तरेकडील हालचालींवर टेहळणी करण्यासाठी आणि वेळप्रसंगी आक्रमणे थोपविण्यासाठी मोलाचे ठरत असणार. ह्या पहारेदारांसाठी इतिहासातील नक्की कुठले पान राखून ठेवले आहे कुणास ठावे.