गाविलगड किल्लाची
गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.
इतिहास
महाभारत काळात या परिसरात विराट राजाचे राज्य होते. पांडव अज्ञातवासात असतांना भिमाने किचकाचा वध याच ठिकाणी केला होता. मूळचा गाविलगड किल्ला मातीचा होता. १२ व्या शतकात गवळी राजाने ( यादव) हा किल्ला बांधला होता. त्यावरूनच त्याला “गाविलगड” हे नाव पडले. आज अस्तित्वात असलेला दगडाचा किल्ला बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने इ.स.१४२५ मध्ये बांधल्याचा उल्लेख ” तारिख-ए-फरीश्ता” या ग्रंथात आढळतो. पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला. इमादशाही घराण्याच्या मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राम्हणाचा मुलगा होता. बहामनी राज्याच्या बेरार (वर्हाड) प्रांताचा सेनापती खान-ए-जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहामनी राज्याचा सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या काळात त्याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली.गाविलगड किल्ल्याची दुरुस्ती करतांना त्याने शार्दुल दरवाजाची निर्मिती केली, त्या दरवाजावर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह गंड भेरूंड कोरले, त्याच बरोबर खजूराचे झाड व शार्दुल ही मुसलमान शासकांची चिन्हेही कोरली. इमादशाही घराण्याने ९० वर्षे वर्हाड प्रांतावर राज्य केले. त्यानंतर १५७२ मध्ये गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामिल झाले. बैरामखान याने इ.स. १५७७ मध्ये निजामशाहीच्या कारकिर्दीत किल्ल्याची पुन्हा दुरुस्ती केली व एका बुरूजावर शिलालेख कोरला.आज तो बुरुज “बैराम बुरुज” म्हणून ओळखला जातो.
इ.स.१५९८ मध्ये अकबराने गाविलगड किल्ला मुघल साम्राज्याला जोडला. परंतू मलिक अंबरने तो पुन्हा निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात गाविलगड किल्ला पुन्हा मुघल साम्राज्यात गेला.इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी शुजातखानचा पराभव करुन गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतले. पण लवकरच हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम व पेशवे यांच्यातील भांडणाचा फायदा घेऊन मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये गाविलगड जिंकून घेतला. इ.स. १७६९ मध्ये माधवराव पेशवे वर्हाडावर चालून येत आहेत असे कळल्यावर भोसल्यांनी त्यांचा कुटुंब कबिला व जडजवाहीर गाविलगड किल्ल्यावर हलविले. भोसल्यांनी किल्ल्याच्या बाहेर परकोट बांधला तोच बाहेरील किल्ला म्हणून ओळखला जातो.१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले. इ.स. १८५७ मध्ये किल्ला क्रांतिकारकांच्या हाती जाऊ नये म्हणून इंग्रजांनी गाविलगडाची डागडूजी केली.
गडावरील ठिकाणे
किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ मोठे तर ३ लहान तलाव आहेत. साधारणत: ६ ते ७ तोफा असून नाजूक स्थितीमध्ये आहेत, पण त्यातील फक्त ३ तोफा अजूनही शाबूत आहेत. त्यामध्ये बिजली तोफ ही लांबीला कमी तर व्यासाला मोठी आहे, तर कालभैरव तोफ ही २० फुट लांब तर व्यासाला कमी आहे. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.
मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे.
शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्या संपल्या की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो. आतील पहारेकऱ्यांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा आहे. आज त्या दरवाज्याच्या उजव्या हाताला राजा बेनीसिंह किल्लेदाराची व त्यांच्या सैनिकांची समाधी आहे, त्या मध्ये बेनीसिंहची समाधी ही अष्टकोनी आहे तर बाकीच्या समाधी चौकोनी आहे, अशा एकूण चार समाधी आहेत. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. थोड पुढे गेल की छोटी मस्जिद असून त्यापुढे एक तलाव आहे. त्याच्या उजव्या भागास बारूद खाना असून त्याची वास्तू अजूनही शाबूत स्थितीत आहेत, त्यामध्ये ४ ते ५ फुटावर कप्पे आहेत जेणेकरून बारूदाला ओल येऊ नये. पुढे समोर गेल्यावर राण्यांची समाधी आहे, तिथे आधी ४ समाध्या होत्या आता मात्र ३ शिल्लक आहेत. त्या पासून डाव्या हाताला पुढे गेल्यावर एक शिव मंदिर आहे पण त्या मध्ये शिवपिंड आज अस्तिवात नाही तरीही ती जागा व तिथे पूर्वेस एक झरोका असलेली खिडकी आहे. समाधीच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यास एक वास्तू आढळून येते ती मोठी मस्जिद असून त्या पुढे एक समाधी आहे. मोठ्या मस्जीदी मध्ये २१ झुंबर होते त्या पैकी आता १४ बाकी राहिलेले आहेत. त्या मध्ये मोठ्ठा परिसर असून त्या मध्ये शामियाना उभारण्यासाठी काही – काही अंतरावर छोटे – छोटे छिद्र आहेत. त्याला चारही बाजूने ४ सुबक नक्षी कम केलेले मिनार होते, परंतु आज मात्र एकच शिल्लक राहिला आहेत. वरती जाण्यास वास्तूच्या डाव्या बाजूस छान कोरीव पायऱ्या आहेत. त्याच्या उजव्या भागाकडून खाली उतरल्यास आपल्याला एक छान पैकी त्या काळचे पाणी शुद्धीकरण यंत्र आढळून येईल. ते पाहून पुढे गेल्यास आपल्याला पिरफत्ते दरवाजा आहे त्यापुढे बरालींगा नावाचे गाव आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही.