डहाणूचा किल्ला(Dahanu fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

डहाणूचा किल्ला

डहाणू महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील गाव आहे.या गावाला सुंदर व शांत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.मूळ डहाणू परिसर हा आदिवासी वस्ती असलेला परिसर असल्यामुळे इथल्या परिसरात आदिवासी पारंपरिक सण आणि उत्सव तसेच जग प्रसिद्ध वारली चित्रकला पाहावयास मिळते.

डहाणू हे निसर्गरम्य असे प्रसिद्ध बंदर आहे. डहाणू खाडीच्या मुखाजवळ हा किल्ला असून या किल्याला १५ मिटर उंचीची तटबंदी आहे. गडावर प्रवेश केल्यावर ध्वजस्तंभ असलेला बुरुज लक्ष वेधून घेतो. या बुरुजाकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. हा किल्ला खूप जुना असून सध्या येथे सरकारी कचेरी असल्यामुळे किल्याची एकूण अवस्था फारशी चांगली नाही. १५३३ मध्ये पोर्तुगीजांनी डहाणू बंदर ताब्यात घेतले तेव्हा येथे कोट बांधला. १५८२ मध्ये मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेताना प्रयत्न केला होता. पोर्तुगीज कॅप्टन नोसासेन्होरा याने हा किल्ला नव्याने बांधून मनोरे, तटबंदी व भक्कम बुरुज केले. पेशवेकाळात मराठ्यांनी स्वारी करून राणोजी शिंदे याने १७३९ मध्ये डहाणू जिंकले. काहीकाळ डहाणूवर इंग्रजांचा ताबा होता व पुन्हा त्याचा ताबा मराठ्यांकडे आला आणि १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या तहामुळे डहाणू किल्ला पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. १८८८ पासून सरकारी कचेरी येथे सुरु झाली व ती स्वातंत्र्यानंतर आजही आहे.

महाराष्ट्र राज्यामधील पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकापासून ४-५ किलोमीटर अंतरावर डहाणू खाडीच्या तटावर एक पुरातन किल्ला आहे. डहाणू खाडीच्या उत्तरकडे लागूनच हा किल्ला बांधला होता. खाडीच्या दक्षिणेकडे मुख्यतः कोळी समाजाची वस्ती आणि उत्तरकडे मोठा डहाणू आहे.पोर्तुगिजांनी सन १५३३-३४ मध्ये हा किल्ला बांधला. मुघलांनी १५८२ मध्ये त्यावर आक्रमण केले होते पण ते परतवले गेले. सन १७३९ च्या मोहिमेत चिमाजी आप्पाने ह्या परिसरातून पोर्तुगिजांचे बस्तान उठवले त्याबरोबर हा किल्लाही मराठ्यांकडे आला. सन १८१८ च्या इंग्रज-मराठा करारानंतर डहाणूचा किल्ला इंग्रजांकडे गेला.

डहाणूच्या हया किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशदार उत्तर दिशेकडे आहे. चार भक्कम बुरुज ह्या गढीला संरक्षित करतात. गडाला बारा मीटर उंच तटबंदी असल्याचा उल्लेखही सापडतो. सन १८१८ च्या एका इंग्रजी साधनात ह्या किल्ल्याला तीन मीटर रुंद व ११-१२ मीटर उंच तट असल्याचे म्हटले आहे. उरलेला किल्ला ओसाड व वापरात नसलेला आहे असेही त्यात म्हटले आहे. नंतर इथे तहसिलदाराचे कार्यालय उघडले होते. काही दिवसांनंतर ते बंद केले गेले.प्राचीन काळी डहाणू हे एक मोठे बंदर होते. नाशिकच्या गुहांमध्ये डहाणू शहर व नदीचा उल्लेख सापडतो. नहपान राजाचा जावई उशवदत्त ह्याने डहाणू खाडीतून होडीमार्गे जाण्याची सोय केली होती असाही उल्लेख आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu