अहिवंतगड (Ahivantgad)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

अहिवंतगड

इतिहास
इ.स १६३६ मधे अहिवंतगड निजामशाहीच्या ताब्यात होता. मुघल बादशाहा शहाजहानने नाशिक भागातील किल्ले काबिज करण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तखानाचा सरदार अलिवर्दीखानाने अहिवंतगड जिंकून घेतला.इ.स १६७० मधे शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला.सुरत, करंजा सारख्या शहरांची लुट, मुघलांचे किल्ले जिंकून घेणे या शिवाजी महारांजांच्या कारवायांमुळे औरंगजेब बादशहा संतापला होता.त्याने आपल्या दक्षिणेत असलेल्या सरदाराला महाबतखानास अहिवंतगड घेण्याची कळकळीची विनंती केली.महाबतखान नाशिकला असलेल्या दिलेरखानाला सोबत घेऊन त्याने अहिवंतगडाला वेढा घातला.महाबतखानाने महादरवाजावर तर दिलेरखानाने सैन्याची मागील बाजू मोर्चे लावले.एक महिना झाला तरी अहिवंतगड दाद देत नव्हता.या दरम्यान दंतकथेत शोभावी अशी घटना घडली.या घटनेची नोंद भिमसेन सक्सेनाच्या तारीखे दिल्कुशा आणि जेधे सापडते.दिलेरखानाच्या छावणीत एके दिवशी एक ज्योतिषी आला.त्याला दिलेरखाना समोर पेश करण्यात आल.त्याला किल्ला कधी हाती येईल अस विचारल्यावर त्याने साखर मागवली.साखरेने त्याने अहिवंत गडाचा नकाशा काढला.साखरेनेच महाबत खान आणि दिलेरखानाचे मोर्चे दाखवले.त्यानंतर त्याने आपल्या पिशवीतील पेटीतून एक मुंगळा बाहेर काढला आणि त्या साखरेच्या किल्ल्यावर सोडला.त्या मुंगळ्याने महाबत खानाने महादरवाजावर लावलेल्या मोर्च्याकडे गेला त्यानंतर तो दिलेरखानाच्या मोर्च्याकडे गेला.तिकडून किल्ल्यात प्रवेश केला.त्यावरून ज्योतिषाने गणित मांडली आणि सांगितले की, महाबतखानाकडून महादरवाजावर निकराचा हल्ला होईल.पण ६ दिवसांनी किल्ला दिलेरखानाच्या मोर्च्याकडून हस्तगत होईल.ज्योतिषाने सांगितलेले भविष्य सहा दिवसांनी खरे ठरले.महाबतखानाने महादरवाजावर तिखट मारा केला.किल्ल्यावरील दारूगोळा, धान्य संपत आले होते.त्यामुळे मराठ्यानी किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला.महाबतखान निकराने किल्ला लढवत असल्यामुळे त्याच्याकडे जाण्यात अर्थ नव्हता म्हणुन मराठ्यानी आपला दुत दिलेरखानकडे पाठवला व किल्ला देण्याची इच्छा व्यक्त केली.दिलेरखानाने मराठ्यांना किल्ल्या बाहेर सुखरुप जाण्याचा मार्ग दिला आणि किल्ला ताब्यात घेतला.
इ.स १८१८ मध्ये सर प्रॉथर याने किल्ला मराठ्यांकडून जिंकुन घेतला.

पाहण्याची ठिकाणे:-
अहिवंत किल्ला मोठ्या सपाट पठारावर व्यापलेला आहे. सर्व संरचना उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. गडावर स्टोअर हाऊस आणि कमानींचे अवशेष दिसतात. गडावर काही बुरुज आणि पाण्याचे टाके आहेत. गडाच्या मध्यभागी एक मोठा तलाव आहे. गडाला वेढा घेण्यास सुमारे एक तास लागतो.आजूबाजुला अनेक मोठ्या पडक्या वाड्यांचे अवशेष पडलेले आहेत. यावरुन हा किल्ला मोठे लष्करीय ठाणे असावे असे वाटते. अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडीपण आढळतात. याबाजुच्या वाटेने किल्ल्यावर अनेक गुहा कोरलेल्या आढळतात. सध्या यांचा उपयोग मात्र गोठ्यासाठी होतो. गडावर फिरताना २-३ पाण्याची तळी आढळतात. एका मोठ्या तळ्यापाशी देवीची एक मोठी मुर्ती आढळते. या मुर्तीचे सप्तश्रुंगी देवीच्या मुर्तीशी साधर्म्य आढळते.तलावाच्या आजुबाजूचे हे अवशेष पाहुन गडावरील टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. टेकडीजवळ पोहोचल्यावर टेकडी उजव्या हाताला ठेऊन व दरी डाव्या हाताला ठेऊन चालायला सुरुवात करावी. इथे डाव्या बाजुला दरीच्या टोकाला कातळात कोरलेली गुहा आहे. ही गुहा खालच्या अंगाला असल्यामुळे वरुन दिसत नाही. गुहेत जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्‍या होत्या पण आता त्या नष्ट झाल्याने काळजीपूर्वक खाली उतरावर लागत. गुहेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे. गुहा सध्या राहाण्यायोग्य नाही. गुहेतून च्या पलीकडे परिसर दिसतो.गुहा पाहुन वर येऊन परत टेकडी उजवेकडे ठेवत पुढे गेल्यावर पाण्याच टाक लागत. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या बाजूला एक दगडाची तुटलेली ढोणी आहे. खंडोबाची एक अश्वारुढ मुर्ती आहे. टाक्यातल पाणी पिउन टेकडी चढुन जावे. टेकडीवर उध्वस्त घरांचे चौथरे आहेत आणि एक बुजलेल टाक आहे. टेकडीवरुन गडाचा पसारा आणि टेकडीच्या टोकाखाली असणारा बांधीव तलाव दिसतो. या तलावाच्या दिशेने खाली उतरावे. तलाव पाहुन पुढे गेल्यावर उजव्या बाजुला कड्याखाली  कातळात कोरलेली गुहा आहे. ती पाहाण्यासाठी जाण्यासाठी अरुंद वाट आहे त्यावर घसारा असल्याने जपुन जावे लागते. गडावरील या दोनही गुहा गडाच्या पठाराच्या खालच्या बाजुस खोदलेल्या असल्याने वरुन त्यांचा अंदाज येत नाही. माहितगार बरोबर असल्यास या गुहा पाहाता येतात.

गुहा पाहुन परत पठारावर येउन पुढे चालत गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशव्दाराजवळ येतो. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर कातळात कोरुन काढलेला सर्पिलाकार मार्ग आणि पायर्‍या पाहायला मिळतात. हा त्याकाळी किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग होता. राजमार्ग उतरुन गेल्यावर आपण एका  संकुचित पठारावर येतो. येथे एक पाण्याचे मोठे सुकलेले टाक आहे. टाक पाहुन पुढे गेल्यावर वाट खाली उतरते. या वाटेन एक छोटा वळसा मारल्यावर कातळात कोरलेली एक खांब असलेली गुहा दिसते. ही गुहा राहाण्यायोग्य नाही. गुहा पाहुन खाली उतरल्यावर आपण उध्वस्त दरवाजाजवळ पोहोचतो. या दरवाजाच्या बाजुचे बुरुज आणि देवड्याही नष्ट झालेल्या आहेत . या दरवाजातून खालचा दरेगाव बेलवाडी रस्ता दिसतो. या दरवाजातून बाहेर पडुन थोड खाली उतरल्यावर दोन रस्ता आहेत. एक रस्ता सरळ खाली उतरत रस्त्यावर गेलेली आहे. बिलवाडीला उतरायचे असल्यास ही रस्ता पकडावी.दरेगावला जाण्यासाठी उजव्या बाजुची कड्याखालुन जाणारी रस्ता पकडावी. कातळकडा उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत ही वाट सरळ कड्याच्या टोकापर्यंत जाते आणि तिथुन खाली खिंडीत उतरते. खिंडीतून दरेगाव बेलवाडी रस्ता बनवल्यामुळे याठिकाणी रस्ता थोडी कठीण बनलेली आहे. रस्त्यावर उतरल्यावर मधल्या रस्तानी दरेगावला पोहोचायला अर्धा तास पुरतो.या मार्गाने दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान 3 तास लागतात.किल्ल्यावरुन अचला, मोहनदर, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग पाहायला मिळते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा