वेसावे किल्ला
आपल्या या मुंबई बेटावर सागराच्या किनारी काही जणांना माहीत नसणारे, इतिहासात आपली छाप उमटवून गत काळातील आपली गौरवगाथा सांगणारे अनेक किल्ले पाहण्यास मिळतात. पण आज माणसांच्या प्रचंड गर्दीत हे सारे किल्ले हरवून गेलेले आहेत. या स्वप्ननगरीत त्यांचा इतिहासही जवळ जवळ दबून गेलेला आहे. असाच एक विस्मृतीत गेलेला किल्ला आहे, वेसावचा किल्ला.मुंबई बेटावर पूर्वीच्या काळी काही किल्ले होते. पण आज गेट वे, फोर्टसारख्या उच्चभ्रूंच्या वस्तीतून तर काही किल्ले नामशेष झालेले आहेत. त्या किल्ल्यांचा थोडाफार इतिहास आज उपलब्ध आहे म्हणून येथे कधीतरी किल्ले होते हे आपणास कळण्यास मदत होते.काही किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदा. सायनचा किल्ला, शिवडीचा किल्ला, माहीमचा किल्ला, वरळीचा किल्ला, रिवा किल्ला, धारावीचा किल्ला यासारखे अनेक किल्ले आज पडझड होऊन झोपडपट्टीच्या विळख्यात घुसमटून गेलेले आहेत. माहीमच्या किल्ल्याची अवस्था पाहून तर मन विदीर्ण होऊन जाते.
यातील एक किल्ला मात्र आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत आपले अस्तित्व जपून आहे. कारण हा किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे. येथे सर्वसामान्य जनतेला मुक्त प्रवेशास बंदी आहे. आज मुंबईच्या सर्व किल्ल्यांमधील हा एकच देखणा किल्ला अस्तित्वात आहे. तो म्हणजे वेसाव्याचा किल्ला, याला मढचा किल्ला असेही म्हणतात.वेसाव्याच्या किल्ल्याबद्दल मी ऐकून होतो; पण अजूनपर्यंत पाहण्याचा योग आला नव्हता. त्यातच माझा परम बालमित्र व गिर्यारोहक संजय पोतदार याला मिळालेल्या सुट्टीमध्ये मुंबईतलाच वर्सोव्याचा किल्ला पाहूया का? असे त्याला विचारताच त्यानेही वर्सोव्याला जाण्यासाठी होकार भर वर्सोवा स्टेशन ते वर्सोवा गाव तसे जरा दूरवरच आहे. वर्सोवा गावाच्या मध्यावरच रिक्षावाल्याने आम्हाला सोडले. कारण पुढे रस्ता बंद होता.
येथून पुढे किल्ल्यावर जाण्याचा रस्ता विचारत, विचारत आम्ही जेट्टीवर येऊन पोहोचलो. आता आम्हाला फेरी बोटीने मढला जायचे होते. वर्सोवा ते मढ यांच्या मधोमध अंदाजे हजार ते बाराशे फुटाची छोटी खाडी होती. या खाडीतले पाणी अतिशय दरुगधीयुक्त असून काळे कुळकुळीत होते.फेरीबोटीचे माणशी तीन रुपयाचे तिकीट काढून आम्ही दोन मिनिटातच पलीकडच्या मढ बेटावर पोहोचलो. येथून शेअर रिक्षा पकडून आम्ही वर्सोवा किल्ल्याकडे जाणा-या फाटयावर उतरलो. दुपारचे बारा वाजून गेले होते. माथ्यावर सूर्यनारायण तळपत होता. वातावरण चांगलेच तापले होते.किल्ल्याकडे जाणारी वाट मात्र सुरेख होती. वाट चांगली पक्क्या सडकेची होती. वाटेच्या दोन्ही हाताला गर्द झाडी असून येथे नीरव शांतता होती. बरेच पुढे चालत आल्यावर उजव्या हाताला नौदलाची वसाहत दिसली. येथे दोन बंदूकधारी जवान तैनात दिसले. येथून थोडे पुढे आल्यावर डाव्या हाताला एक रस्ता खाली दूरवर गेलेला दिसला. या वाटेच्या फाटयावरच मुक्तेश्वर महादेव मंदिर असा फलक लावलेला दिसला. येथून काही अंतर पुढे जाताच आम्हाला पुढे जाणारी वाट खंडित झालेली दिसली.
पुढे वाटेवर लोखंडी तारांचे कुंपण घालून किल्ल्याकडे जाणारी वाट बंदिस्त केलेली होती. कुंपणाच्या उजव्या हाताला एक चौकी होती. त्या चौकीत हातात रायफल घेऊन एक तरणाबांड फेटेवाला सरदार सैनिक रक्षणास तत्पर होता. किल्ल्याकडे जाणारी आमची वाट त्याने अडवून धरली. येथून तो जवान आम्हाला पुढे जाऊ देईना. तो आम्हाला म्हणाला, यहांसे आगे आप जा नही सकते.यहांसे आम आदमीको अंदर जाना मना है. किला देखने के लिये आगे ऑफिस है वहांसे परमीशन लेके आईये नही तो यहांसे चले जाईये. येथे आमची डाळ शिजत नाही असे पाहून आम्ही हिरमुसले होऊन काढता पाय घेतला. विचार करा, एवढया दूर येऊन हाकेच्या अंतरावर आमचे ध्येय्य उभे आहे. पण ध्येय्य साध्य न करता परत फिरायचे आहे. केवढी निराशा झाली. शेवटी आलोच आहोत तर महादेवाचे दर्शन घेऊन तेवढेच समाधान घेऊन निघूया असे ठरवून आम्ही आल्या मार्गी परत फिरून मुक्तेश्वर महादेव मंदिराजवळ येऊन पोहोचलो.मुक्तेश्वर मंदिर चांगलेच ऐसपैस असून वर्सोव्याच्या सागर तटाच्या काठावरच होते. मंदिराच्या समोरच जेट्टी आहे. सागराच्या पलीकडे वर्सोवा शहर नुसत्या डोळयाने स्वच्छ दिसत होते. सागराच्या पाण्यावर कोळी बांधवांची अनेक मासेमारी गलबते डौलाने डोलत होती आणि आश्चर्य म्हणजे या शिव मंदिराच्या पाठीच वेसाव्याच्या किल्ल्याची तटबंदी व बुरूज पाहून आम्ही हरखून गेलो.
या मंदिरात आम्हाला मंदिराचे काही विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला मंदिराची, किल्ल्याची व येथील परिसराची छान माहिती पुरवली. मंदिराच्या पाठी मात्र वेसाव्याच्या किल्ल्याच्या संरक्षणाची काहीही व्यवस्था नव्हती. आम्ही पण मंदिराच्या खाली सागराच्या काठाकाठाने किल्ला पाहण्यास निघालो.किल्ल्याचे बुरूज गोलाकार व उंच असून भव्य आहेत. तटबंदीही मजबूत असून वीस फूट तरी उंच असावी. तटबंदीवर ठरावीक अंतरावर ठिकठिकाणी तोफांसाठी कोनाडे केलेले आहेत. पण येथे तोफा आहेत की नाही हे समजण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या मध्यभागी काही नवीन, जुनी बांधकामे पाहण्यास मिळतात.किल्ल्याच्या तटबंदीलगत खालच्या बाजूने आम्ही अर्ध गोलाकार वळसा पूर्ण करून थोडासा उंचवटा चढून आम्ही वेसावा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर येऊन ठेपलो. उजव्या हाताच्या बुरूजाला लागूनच किल्ल्यात चढून जाण्यासाठी छोटा जिना आहे. पण येथे लोखंडी प्रवेशद्वार लावून दरवाजाला टाळे ठोकून वर जाण्यास प्रतिबंध केलेला आहे.किल्ल्यासमोरच प्रशस्त पटांगण आहे. या पटांगणावर ताड वृक्षाची मोठमोठी झाडं किल्ल्याच्या व येथल्या सौंदर्यात भर घालत होती. डाव्या हाताला जरा दूरवर आम्हाला किल्ल्यात जाण्यास मज्जाव करणारा सरदार जवान व त्याची चौकी स्पष्टपणे दिसत होती. त्याही पुढे संरक्षणासाठी उभारलेला उंच मनोराही दिसत होता; पण तिथे टेहाळणीसाठी कोणीही नव्हते.
मला अजून येथला परिसर पाहायचा होता. जरा पुढे जाऊन जेवढा पाहता येईल तेवढा डोळे भरून वर्सोव्याचा किल्ला न्याहाळायचा होता; पण संजूने माझ्यापाठी येथून लवकरात लवकर निघण्याचा तगादा लावला. शेवटी नसती सरकारी आफत नको म्हणून आम्ही आल्या माग्रे पाठी फिरलो.किल्ल्याच्या खाली उतरून सागर काठावरच्या मोठमोठया दगडांवर जाऊन जरा विसावा घेत बसून निसर्गरूप पाहण्यात दंग झालो. आम्हाला जेवढा किल्ला पाहण्यास मिळाला त्यावर आम्ही समाधानी नव्हतो. पण नाही म्हणायला असमाधानीही नव्हतो. कारण नाही म्हणायला बरेच काही पाहून माहिती घेतली होती. पुन्हा एकदा नवीन माहिती घेऊन सरकारी परवानगी घेऊन तयारीनिशी वर्सोव्याचा किल्ला सर करायचाच. हे मनाशी ठरवून दुपारी तीनच्या सुमारास आल्या मार्गाने परतीच्या प्रवासाला लागलो.