साहित्य – 5 मोठ्या आकाराचे बोंबील = ७०० ग्रॅम्स ,1 टीस्पून हळद १ लिंबाचा रस ,३ हिरव्या मिरच्या ,७-८ लसणीच्या पाकळ्या ,१ इंच आल्याचा तुकडा ,तेल ,३/४ कप = १५० ग्रॅम्स रवा ,१/२ कप = ७५ ग्रॅम्स तांदळाचे पीठ (गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ सुद्धा वापरले तरी चालेल ) ४ टेबलस्पून मालवणी मसाला ( मालवणी मसाला नसेल तर ३ टेबलस्पून लाल मिरची पूड + १ टेबलस्पून गरम मसाला वापरावा ) ,मीठ.
कृती -: 1.सर्वप्रथम बोंबील नीट साफ करून त्यांना पोटाच्या भागाकडून मध्यभागी चीर देऊन ते उघडून घ्यावेत. बोंबील साफ करण्याची . जर घरी शक्य नसेल तर मासे विक्रेत्याकडून बोंबील साफ करून घ्यावेत. 2.स्वच्छ पाण्याने धुऊन बोंबील एका कोरड्या फडक्याने कोरडे करून घ्यावेत. बोंबलाला हळद, मीठ आणि लिंबाचा रस चोळून लावावा आणि १० मिनिटे मुरत ठेवावेत. 3.१० मिनिटांनंतर आपण बोंबील चेपणीला घालून घेऊ. बोंबलामध्ये खूप जास्त पाणी असते आणि ते काढल्याशिवाय बोंबील चुरचुरीत तळले जात नाहीत. एका कापडावर बोंबील ठेवून वरूनही एक कापड घालावे. त्यावर एक चॉप्पिंग बोर्ड किंवा कुकर किंवा पाट्यासारखी वजनदार वस्तू ठेवून ३० मिनिटे चेपणीला घालावेत.4.आता आपण बोंबलांना लावण्यासाठी आले लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा जाडसर ठेचा वाटून घेऊ. पाणी फार कमी वापरून मसाला वाटावा. मी १ टीस्पून पाणी वापरले होते. 5.३० मिनिटांनंतर बोंबलामधील पाणी कमी होऊन ते एकदम सपाट होतात . वर वाटलेला ठेचा त्यांना लावून फ्रिजमध्ये १० मिनिटे ठेवावेत . असे केल्याने बोंबील छान चुरचुरीत तळले जातात . 6.बोंबलांना तळण्यापूर्वी घोळवण्यासाठी एका ताटलीत मालवणी मसाला, रवा , तांदळाचे पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यावे. बोंबील फ्रिजमधून बाहेर काढून ते या मिश्रणात चांगले घोळवून घ्यावेत. 7.एका लोखंडी किंवा नॉनस्टिक तव्यात २-३ टेबलस्पून तेल मोठ्या आचेवर गरम करून घ्यावे. मंद ते मध्यम आचेवरच आपण मासे तळणार आहोत. जर तेल चांगले तापले नाही तर मासे तव्याला चिकटून तुटतात . 8.घोळवलेला मासा तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यावा. माशाची एक बाजू कुरकुरीत तळायला जवळजवळ ३ मिनिटे लागतात ! 9.बोंबील तळायला थोडे जास्त तेल लागते म्हणून व्यवस्थित तेल घालून बोंबील तळून घ्यावेत. 10.हे चविष्ट , कुरकुरीत बोंबील कितीही खाल्ले तरी मन भरत नाही .