शेवभाजी

Like
Like Love Haha Wow Sad Angry
शेवभाजी – Marathi Recipe
होळीच्या सणाला घरोघरी पुरणपोळी करायची पद्धत आहे. या गोड पुरणपोळीच्या जेवणात तिखट शेवभाजीची जोड असेल,
तर पंगतीची लज्जत आणखी वाढेल. म्हणऊन शेवभाजीची रेसिपी खास होळीसाठी.

साहित्य – १) शेव २ कप भरून, २) १ मोठा कांदा, ३) अर्धी वाटी खोबर्‍याचा किस ४) ८/९ लसूण पाकळ्या,५) अर्धा इंच आले, ६) आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरच्या,७) १ टिस्पून जिरे,८) २ टिस्पून धणे९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. )१० ) तेल,११) फोडणीचे साहित्य ( हिंग, हळद, मोहरी ),१२) कोथिंबीर,१३) मीठ मुख्य म्हणजे शेव २ कप भरून. हि शेव जाडी आणि तिखट पाहिजे. भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते. याच कारणासाठी अगदी बारीक शेवही वापरता येत नाही. आपल्याकडच्या फरसाणच्या दुकानात हि असतेच. दिवाळीच्या पदार्थातली शेवही वापरता येईल. हि शेव ताजी व कुरकुरीत असावी.

कृती -:नाशिक, जळगाव भागात शेवभाजी फार लोकप्रिय आहे. तिथल्या धाब्यावरचा हा अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे.
धाब्यावर अर्थातच तेल व तिखट जास्त वापरलेले असते.
१) लाल मिरच्या घेतल्या असतील तर त्या आणि तर ताजे मसाले खमंग भाजून घ्या. व त्याची पूड करा
२) खोबर्‍याचा किसही भाजून घ्या
३) कांदा उभा चिरून तेलात लालसर परतून घ्या. ( हल्ली वाळवलेला कांदा मिळतो. तो वापरला तर पटकन भाजला जातो. तो २ टेबलस्पून पुरेल )
४) खोबरे, आले, लसूण व कांदा यांचे बारीक वाटण करा. ( मिक्सरमधे आधी खोबरे आणि मग कांदा, आले, लसूण वाटावे लागेल. )
५) या वाटणात मसाला मिसळा.
६) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मसाला परतून घ्या. त्यात हवे तेवढे पाणी घालून रस्सा उकळू द्या. बेताचे मीठ व कोथिंबीर घाला. ( शेवेत मीठ असतेच, त्या मानाने मीठ घाला. )
७) पाणी थोडे जास्तच घाला कारण शेव घातल्यावर रस्सा दाट होतो.
८) अगदी खायच्या वेळेला त्यात शेव टाका आणि २/३ मिनिटे उकळा.
९) भाकरी किंवा चपाती सोबत खा.

अधिक टिपा:
हा रस्सा तिखटच असतो. यात आंबटपणासाठी काहिही ( टोमॅटो, चिंच ) घालत नाहीत. तसेच गूळ वा साखरही घालत नाहीत. हवे तर सोबत कच्चा कांदा आणि लिंबू घ्या.हा मसाला आधी करुन ठेवता येतो. पाणी न घालता वाटला तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमधे अगदी महिनाभरही टिकेल. ह्याच मसाल्याचे पाणी उकळून त्यात कच्ची अंडी फोडून घातली तर अंड्याचा रस्सा तयार होईल.कोथिंबीर फोडणीत, रस्सा उकळताना किंवा वरूनही घेता येईल.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories