संसर्गजन्य रोग




Like
Like Love Haha Wow Sad Angry

संसर्गजन्य रोग
संसर्गजन्य रोग : संक्रामक रोगाला कारणीभूत असणारे जीव एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या क्रियेला रोगसंसर्ग असे म्हणतात. विकारग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे होणाऱ्या संक्रामणाच्या या क्रियेत अनेकदा सूक्ष्मजीवांचा प्रसार फार मोठया प्रमाणात, जलद गतीने आणि थेट  होत असतो. त्यामुळे रूग्णाच्या सान्निध्यात असणाऱ्या परिचारकांना व आप्तेष्टांना अधिक काळजी घ्यावी लागते. अशी परिस्थिती निर्माण करू शकणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. थेट संक्रामण न होता डास, पिसवा, उवा यांसारख्या संधिपाद प्राण्यांमार्फत पसरणाऱ्या रोगांचा  त्यात सहसा समावेश होत नाही.

संसर्गजन्य रोगांचे पुढील तीन मुख्य प्रकार आहेत 
(१) विषाणुजन्य : देवी, कांजिण्या, गोवर, गालगुंड, इन्फ्ल्यूएंझा, बालपक्षाघात , कावीळ (हिपॅटायटिस ए), डोळे येणे (खुपऱ्या), रतिजन्य एड्स (२) सूक्ष्मजंतुजन्य :  घटसर्प, डांग्या खोकला, क्षयरोग, मस्तिष्कावरणशोथ, कॉलरा, विषमज्वर, कुष्ठरोग, जठरांत्रशोथ, गुप्तरोग  आणि (३) एककोशिकीय व बहुकोशिकीय परोपजीवीजन्य : अमीबा विकार, खरूज, उवा यांखेरीज ऋतुमानानुसार प्रादुर्भाव होणारे विषाणुजन्य व शाकाणुजन्य श्वसनमार्गाचे शोथ, घशाचे विकार, डोळ्यांचे विकार व आतडयाचे दाह  यांसारखे रोगही संसर्गजन्य म्हणता येतील .

संसर्गाचे मार्ग : श्वसनमार्ग : रूग्णाच्या नाकातील, घशातील, तोंडातील किंवा श्वसनमार्गाच्या फुप्फुसांतील खोलवरच्या भागातील स्राव शिंकणे, खोकणे, थुंकणे इ. क्रियांमुळे बाहेर फेकला जातो. त्यातील सूक्ष्मतुषारांमध्ये असलेले रोगजनक जीव हवेत सर्वत्र पसरतात. निरोगी व्यक्तीच्या श्वसनाबरोबर ते शरीरात प्रवेश करतात. श्वसनमार्गाच्या श्लेष्मल (बुळबुळीत) पटलातून त्यांचा रक्तात प्रवेश होतो किंवा श्वसनमार्गाच्या पटलाखाली आणि फुफ्फुसांच्या वायुकोशांतच त्यांची वाढ सुरू होते. श्वसनमार्गातील स्राव केसलयुक्त अधिस्तर, भक्षिकाकोशिका यांसारख्या संरक्षक यंत्रणा दूषित पदार्थांना बाहेर टाकण्यास असमर्थ ठरल्यास या निरोगी व्यक्तीत रोगसंक्रामण घडून येते. कधीकधी हे दूषित द्रव्य रूग्णाच्या त्वचेवरील स्रावांमधूनही बाहेर पडते.उदा., देवी, कांजिण्या यांसारख्या रोगांच्या पुटकुळ्या फुटणे. देवी, कांजिण्या, गोवर, जर्मन गोवर, गालगुंड, घटसर्प, डांग्या खोकला, इन्फ्ल्यूएंझा, क्षय, मस्तिष्कावरणशोथ, प्लेगचे फुप्फुसीय संक्रामण  हे श्वसनमार्गे संसर्ग होणारे विकार आहेत.

पचनमार्ग : रूग्णाच्या विष्ठेतून  बाहेर टाकले जाणारे जंतू निरोगी व्यक्तीच्या अन्नात किंवा पिण्याच्या पाण्यात, स्वयंपाकाच्या व जेवणाच्या भांडयांमध्ये, हातांवर, पेयांमध्ये व त्यांच्या प्याल्यांमध्ये प्रवेश करतात. अन्नमार्गात जाणारे हे जंतू जठरात किंवा आतडयात नष्ट न झाल्यास आतडयांच्या पटलांखाली वाढू लागतात किंवा रक्तात प्रवेश करून इतरत्र जातात. दूषित पदार्थ अन्नापर्यंत पोहोचविण्यात माशी या प्राण्याचा मोठा वाटा असतो. शौचानंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुण्याच्या सवयीचा अभाव, रूग्णाच्या मलमूत्राची व दूषित पदार्थांशी संपर्क आलेल्या वस्तूंची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्याची काळजी न घेणे, उघडयावरील अन्नपदार्थांचे सेवन, भाजीपाला धुण्यातील निष्काळजीपणा इ. कारणांनी या प्रकारचा संसर्ग होत असतो. पोलिओ, कावीळ, कॉलरा, विषमज्वर, जठरांत्रशोथ, अन्नविषबाधा, अमीबाविकार हे पचनमार्गे होणाऱ्या संसर्गाचे विकार आहेत.

त्वचा किंवा श्लेष्मलपटलावर थेट संसर्ग : सूक्ष्मजंतूंनीयुक्त दूषित स्राव हाताळलेले हात, दूषित कपडे , निर्जंतुक न केलेली उपकरणे (जखमा स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी किंवा औषधोपचार करण्याची), मलमपट्टीचा कापूस व कापडी पट्टया यांसारख्या अनेक साधनांनी संसर्ग होऊ शकतो. अशा संसर्गाने पुढील रोग होतात : डोळे येणे, खुपऱ्या, कुष्ठरोग, उपदंश, परमा, एड्स, खरूज, उवा व त्यामुळे पसरणारा टायफस ज्वर.

संसर्गाचे परिणाम : कोणत्याही व्यक्तीस रोगाचा संसर्ग झाल्यास रोगजनक जीवांचे संक्रामण घडून येते परंतु त्याची परिणती त्या व्यक्तीमध्ये रोगाचे दृश्य स्वरूप निर्माण होण्यात होईलच असे नाही. त्या व्यक्तीची नैसर्गिक न रोग प्रतिकार शक्ती, तोच रोग पूर्वी झाल्याचा इतिहास, लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असण्याची शक्यता, काही औषधी द्रव्यांचे सेवन, एड्स किंवा अन्य रोगांमुळे प्रतिकारशक्ती घटली असण्याची शक्यता, पोषणाची स्थिती, मधुमेहासारखे विकार यांसारखे अनेक घटक रोगनिर्मितीवर बरा वाईट प्रभाव पाडू शकतात. ज्या व्यक्तीपासून संसर्ग झाला आहे ती व्यक्ती रोगाच्या कोणत्या अवस्थेत आहे, प्रभावी औषधोपचार घेत आहे अथवा नाही आणि इतरांना संसर्ग टाळावा म्हणून आपल्या परीने किती काळजी घेत आहे यांवरही संसर्गातून पसरणाऱ्या जीवांचे प्रमाण अवलंबून असते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास पुढील शक्यता उद्भवतात.  निरोगी व्यक्ती संसर्गामुळे थोडयाच अवधीत रोगाची प्राथमिक लक्षणे दाखविते. त्यानंतर गंभीर स्वरूपाचा आजार निर्माण होतो.  सुरूवातीस काही लक्षणे आढळतात परंतु नंतरचा आजार सौम्य असतो. तो लवकरच बरा होतो. (इ) कोणतीही लक्षणे निर्माण होत नाहीत. रक्ताची तपासणी केल्यास संरक्षक प्रतिपिंडाची निर्मिती झालेली आढळते. त्यामुळे भविष्यातही असा विकार होण्याची शक्यता कमी असते. झालाच, तर तो सौम्य असतो. यावरून त्या व्यक्तीमध्ये अव्यक्त संक्रामण घडून आले होते असा अंदाज करता येतो. (ई) वर दिलेल्या तीनही प्रकारांपासून काही काळ इतर व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो. परिणामतः रोगाची साथ निर्माण होऊ शकते किंवा एखादया भौगोलिक क्षेत्रात दीर्घकाळ रोगाचे अस्तित्व टिकून रहाते. याला देशज किंवा प्रदेशनिष्ठ प्रसार असे म्हणतात. (उ) कांजिण्या, गालगुंड यांसारख्या रोगांत एकदा निर्माण झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते. याउलट श्वसनमार्गाचे विकार अमीबाजन्य आंत्रशोथ यांसारख्या संक्रमणात रूग्ण बरा झाल्यानंतरही रोगबीजे सुप्तावस्थेत शरीरात राहिल्यामुळे पुन:पुन्हा तोच विकार प्रकट होत राहतो. कधीकधी अशा पुनरावृत्तीचे कारण वरचेवर बाह्य संसर्गाला सामोरे जावे लागणे हे असू शकते. (ऊ) संसर्गकारक जीवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रतिजैविकांचा (अँटिबायॉटिक पदार्थांचा) उपयोग योग्य मात्रेत न केल्यामुळे किंवा त्या उपचाराची सुयोग्य कालमर्यादा न पाळल्यामुळे औषधाची प्रभावक्षमता नष्ट होते. सूक्ष्मजीवांमध्ये निर्माण होणारा हा प्रतिरोध अन्य व्यक्तींना संसर्ग झाल्यावरही टिकून राहतो. त्यामुळे या व्यक्तींमध्ये औषधोपचाराचा प्रश्न प्रारंभापासूनच गंभीर असू शकतो. उदा., क्षयरोग, रूग्णालयात घडून येणारा रोगसंसर्ग इत्यादी. (ए) संसर्गजन्य विकाराचे निदान होऊन त्यावर योग्य उपचाराने नियंत्रण ठेवणे यशस्वी रीत्या पार पडेपर्यंत काही कालावधी लोटू शकतो. या काळात आहारातील कमतरता आणि प्रकाशशक्तीवर पडणारा ताण यांमुळे मूळ रोग बरा झाल्यानंतर दुय्यम संक्रामण होऊ शकते. उदा., इन्फ्ल्यूएंझानंतर होणारे श्वसनमार्गाचे संक्रामण.

संसर्गजन्य रोग लक्षणे पुढील प्रमाणे
हा करोना नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे.
ताप व थंडी
थकवा
डोकेदुखी
खोकला, घसादुखी
सर्दी
चक्‍कर येणे
अनेकवेळा सार्सच्‍या गंभीर रुग्‍णाला कृञिम श्‍वासोच्‍छवासाची आवश्‍यकता भासते.

संसर्गजन्य रोगांवरील प्रतिबंधक उपाय : संसर्ग टाळण्यासाठी करावयाचे उपाय रोगाचे निदान होताच त्वरित अमलात आणणे आवश्यक ठरते. अनेकदा रोगाची लक्षणे स्पष्ट होऊन निश्चित निदान होण्यापूर्वीच निकटवर्तींना संसर्ग पोहोचलेला असतो. तरीही त्यांना झालेल्या संसर्गाची मात्रा कमी असावी आणि इतरांना तो होऊ नये म्हणून सावध रहाणे इष्ट ठरते. विशेषतः श्वसनमार्गे होणारा संसर्ग टाळणे अधिक कठीण असते. मातेपासून स्तनपान करणाऱ्या अर्भकांना होणारा संसर्गही असाच अनिवार्य असतो. तरीही क्षयासारख्या दुखण्यात तो टाळण्याचा प्रयत्न करावा लागतो. प्रतिबंधक उपायांमध्ये संसर्ग टाळण्याबरोबरच संपर्काचे रूपांतर संक्रामणात आणि गंभीर आजारात होऊ नये असाही उद्देश असतो. काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत : (१) रूग्णाचे विलग्रीकरण करून त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू स्वतंत्रपणे हाताळणे. (२) रूग्णापासून निघणाऱ्या जैव पदार्थाचे आणि स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी जंतुघ्न द्रव्ये वापरून नंतरच त्यांची विल्हेवाट लावणे, उदा., थुंकी, लघवी किंवा विष्ठा, त्वचेवरील स्राव, कापसाचे बोळे, अंग पुसण्यासाठी वापरलेले पाणी इ. (३) रूग्णावर उपचार करणाऱ्यांनी संसर्गाच्या प्रकारानुसार प्रतिबंधक साधने वापरणे. उदा., तोंड व नाक झाकणारे कापडी मुखवटे, रबरी हातमोजे तसेच पचनमार्गे संसर्गाच्या बाबतीत घरातील सर्वांनी पाणी उकळून पिणे, माशा होऊ नयेत यासाठी उपाय करणे, बाहेरील व्यक्तींना घरातील अन्नपेये आदरातिथ्यासाठी न देणे यांसारखी काळजी घेणे इष्ट ठरते. (४) रोगप्रतिबंधक लसीकरण, संपर्कातील व्यक्तींचे आवश्यकतेनुसार लसीकरण करणे व पूर्वीच ते केले असल्यास जरूर तर पूरक मात्रा देणे. प्रदेशनिष्ठ विकाराच्या क्षेत्रात प्रवास करण्यापूर्वी लशीकरण उपयुक्त ठरते. (५) औषधयोजना करून संसर्गजनक व्यक्तीमधील रोगजंतूंचे प्रमाण कमी करणे, उदा., क्षयाच्या रूग्णाला औषधे देऊन त्याच्या थुंकीमध्ये आढळणाऱ्या जंतूंचे प्रमाण शक्य तेवढया लवकर शून्यावर आणता येते. संपर्कात येणाऱ्या व अधिक धोका असणाऱ्या निरोगी व्यक्तींनाही काही प्रसंगी प्रतिबंधक औषधयोजना करावी लागते. उदा., मस्तिष्कावरणशोथ, प्लेग, कॉलरा, घटसर्प, डोळे येणे. (६) रूग्णाच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तींनी आपल्यावरील संसर्गाचा धोका पूर्ण टळला आहे याची खात्री होईपर्यंत सर्वत्र हिंडणे – फिरणे शक्यतोवर कमी करणे. मर्यादित हालचालींमुळे त्यांच्याकडून रोगाचा प्रसार होण्यास आळा बसू शकतो. कधीकधी सक्तीने असे नियंत्रण विलग्नवासाच्या रूपात करावे लागते. (७) संसर्गजन्य रोगाचा प्रसार मोठया प्रमाणात होऊन त्याचे साथीत रूपांतर होण्याची शक्यता असल्यास आरोग्याधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांच्या सूचनांचे अनुपालन करणे. आवश्यक वाटेल तेव्हा विशेष रूग्णालयात रोग्याला दाखल करण्याचा सल्ला आरोग्याधिकारी देतात. (८) संसर्गाचे निश्चित उगमस्थान माहित नसूनही त्याची शक्यता गृहीत धरून काही प्रसंगी प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे हितावह ठरेल. उदा., लष्करी छावण्या, निर्वासितांच्या छावण्या, तुरूंग यांसारख्या ठिकाणी टायफस ज्वर आणि मस्तिष्कावरणशोथ या रोगांची शक्यता असल्याने गर्दी कमी करणे. वैयक्तिक स्वच्छता यांवर भर दयावा लागतो बालकांमध्ये बालपक्षाघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वत्रिक लसीकरणाची मोहिम राबविली जाते गुप्तरोग व एड्सचा धोका अधिक असलेल्या व्यक्तींना कंडोमचा वापर करण्याचा सल्ल देण्यात येतो मोठया प्रमाणात अन्न शिजविणाऱ्या ठिकाणी व प्रसंगी शिळे अन्न न खाण्याच्या सूचना दयाव्या लागतात सांडपाण्याचा वापर करून पिकविलेल्या भाज्यांचा वापर करताना त्यांच्या स्वच्छतेकडे अधिक कटाक्षाने लक्ष पुरवावे लागते.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu