फरसाणाची भाजी – Marathi Recipe

Like
Like Love Haha Wow Sad Angry
फरसाणाची भाजी – Marathi Recipe

साहित्य – दोन-अडीच मुठी भरून कुठलंही फरसाण , दोन टोमॅटो , दोन कांदे , लाल तिखट मीठ , तेल,जिरे, चिमटीभर साखर कोथिंबीर वरून घ्यायला.फरसाण किती आहे त्यानुसार जरा प्रमाणं बदलतील.

कृती -: साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत फरसाणादी प्रकार सादळतात आणि मग ते कुणी खात नाही. एकदिवस हा प्रकार करून आणि खाऊन पाहीला; अफलातून चव जमली होती; म्हणून इथे देतोय. लोखंडी कढई सणसणून तापवून त्यात जरा तेल तापवावं आणि जिरं चांगलं फुलवावं; तसं ते फुललं की मगच बारीक चिरलेला कांदा, कडा लालसर तांबूस होईतो परतून घ्यावा.यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून मसाला तेल सोडेस्तोवर परतावं. यात चवीनुसार मीठ, तिखट घालावं आणि त्याचा कच्चटपणा जाईतो अजून एखादमिनिट परतावं. नंतर हातानीच जरा कुस्करून फरसाण यात घालावं आणि भाजी छान हलवून घ्यावी. फारच कोरडं वाटत असेल तर जरासा पाण्याचा शिपका देऊन एक दणदणीत वाफ आणावी. चव पाहावी आधी आणि गरज पडली तरच मीठ आणि टोमॅटो ने फारच आंबटसर झालेली असेल तर पाव चमचा साखर घालून सिजनिंग अ‍ॅडजस्ट करावं. वर कोथींबीर घालून गरमगरम भाजी, पोळी, फुलके यांसोबत खावी.

अधिक टिपा:
– तिखट, मीठ आणि साखर घालतांना जरा जपून. फरसाणात या तीनही गोष्टी असतातच.
– हवे असतील तर यात थोडे फ्रोजन मटार, मके थॉ करून घालता येतील.
– ताज्या फरसाणाचीही अशी भाजी जमेल आणि त्यात कुरकुरीत पणा हवा असेल तर राखता येईल.
– ही भाजी जरा चढ्या चवीचीच सुरेख लागेल सो त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठरवा.
– भाकरी, पोळी ऐवजी या भाजीकरता फुलका जास्त चांगला लागतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories