साहित्य – २ वाट्या तांदूळ, बटाटा १ मोठा- १ इंचाचे तुकडे , १ कप ग्रीन बीन्सचे (श्रावण घेवडा?) १ इंचाचे तुकडे २ मध्यम गाजर थोडे मोठे तुकडे, १ .५ कप कॉलीफ्लावर मध्यम आकारचे तुकडे,आलं लसूण १ टे. स्पून ,कांदा १ मोठा उभा चिरून टोमॅटो २ बारीक चिरून, हि. मिरची ३ उभ्या चिरून,लवंग ५-६,हि. वेलची ५,दालचिनी १ इंचाचे २-३ तुकडे,मसाला वेलची २-३ तमालपत्र ३-४ पानं ,काळी मिरी ८-९,दही एक मोठा चमचा, काजू १ वाटी- तळून घेऊन, बेदाणे १/२ वाटी- तळून घेऊन, केशर दोन तीन चिमूट – ३-४ मोठे चमचे दुधात खलून तूप २-३ चमचे, बिर्याणी मसाला २ चमचे केवडा इसेंस १ टि. स्पून (ऐच्छिक),हळद एक लहान चमचा, तळलेला कांदा १ वाटी बारीक चिरलेली कोथंबीर , पुदीना – दोन्ही मिळून अर्धी वाटी, झाकणाच्या कडेनं लावायला कणीक
कृती -: १. तांदूळ स्वच्छ धुवून निथळून अर्धा तास ठेवा.
२. तांदळाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल, १ मसाला वेलची, तमालपत्र घालून उकळी आणावी.
३. तांदूळ एक-दोन कणी राहतील इतपत शिजवून उरलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकून बाजूला ठेवावे.
४. ज्या पातिल्यात बिर्याणी करायची त्यात तेल तापवायला ठेवावे.
५. सगळा खडा मसाला घालून कांदा घालून परतून घ्यावा
६. कांदा मऊ झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून १-२ मिनीटे परतावे
६. टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतावे
७. हळद घालावी परत एकदा परतून घ्यावे
८. बिर्याणी मसाला घालावा
९. केवडा इसेंस घालावा, परतावे
१०. दही घालावे
११. बटाटा, गाजर घालून परतावे
१२. उरलेल्या भाज्या घाल्याव्यात
१३. मीठ घालून नीट परतून घ्यावे
१४. भाज्या साधारण ३/४ शिजल्या की गॅस बंद करावा.
१५. भाताचा लेयर लावून लाकडी चमच्याच्या मागच्या बाजूने ५-६ भोकं पाडून त्यात केशराचं दुध घालावं उरलेलं दूध भातावर शिंपडावं.
१६. काजू, बेदाणे घालावेत, कडेने तूप सोडावे
१७. भरपूर बारिक चिरलेली कोथिंबीर, पुदीना घालावा
१८. तळलेला कांदा घालावा.
१९. झाकण लावून कडेनं कणीक लावून बंद करावं
२०. १ ते सव्वा तास मंद आचेवर ठेवावी. जाड बुडाच्या तव्यावर पातिलं ठेवल्यास खाली करपत नाही.
अधिक टिपा:
१. मी शानचा बिर्याणी मसाला वापरते.
२. तेल न वापरता पूर्ण तुपातपण करता येते पण खूपच हेवी होते. काजू, बेदाणे पण तुपात तळून घ्यायचे.
३. दह्याच्या रायत्याबरोबर सर्व्ह करायची