For more information kindly read following article.
कलावंत म्हणजे अदभुत किमया करणारे सुस्वप्नाचे कारखानदार – कलावंतांची निर्मिती
पूण: प्रत्ययाचा अनुभव देते. कलावंत माणसातील सौन्दर्यपूर्ण भावना जागृत ठेवतात. जीवन हे
रसिकता पूर्ण जगायला शिकवितात. कलावंत नसतील तर मानवी जीवन निरस,रुक्ष,वैराण मरुभूमी
प्रमाणेच होईल. कारण मानवाला त्यांची चटकच लागली आहे.
रोजच्या धावपळीच्या धाईगर्दीच्या व स्पर्धेच्या या यांत्रिकी अशा रुक्ष जीवनात आपल्याला विसाव्याचे, विरंगुळ्याचे क्षण हवेहवेसे वाटतात. हे विरंगुळ्याचे अमृतसिंचन करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच कलावंत. कलावंतांना सुखस्वप्नांचे कारखानदार म्हटलेले आहे. कलावंत हे स्वतःच्या प्रतिभेच्या आविष्काराने लोकांची सुखस्वप्ने फुलवून त्यांच्या निरस जीवनात नवरसांची कारंजी निर्माण करतात. कलावंत नसतील तर माणसांची आयुष्य शुष्क होऊन जाईल. जीवनातील दुःखाचे डोंगर हलके करण्यास कलावंत मोलाची मदत करतात. दुःखाचे यातनांची निरसन करून आनंद शतगुणित करण्याची अदभुत किमया करणारे प्रतिभावान लोक म्हणजे कलावंत.
कलावंतांची निर्मिती म्हणजे अनुभूती व माणूस यांच्यातील दुवा होय. अनुभूती हि एखाद्या वायुलहरी प्रमाणे तरल व चंचल असते. तिला दृश्य व रम्य कलाकृतीच्या स्वरूपात बद्ध करून तिच्या
द्वारा मानवाला पूण:प्रत्ययाचा आनंद देण्याचे काम कलावंत करतो. त्यामुळे काहीकाळ पर्यंत ती अनुभूती सामान्य माणसाला मिळू शकते. एखाद्या नटाने जीव ओतून केलेली भूमिका प्रेक्षकाला जिवंत अनुभूती मिळवून देते. त्यातच आपण आनंदाच्या शिखरावर लगेच पोचतो. कलावंत नसता तर हा आनंद आपल्याला कुठून मिळाला असता.
रामायण – महाभारत यां सारखी दृश्य, काव्ये, संगीत, प्राचीन भव्य देवालये, भारतातील विविध पद्धतीचे पोशाख, हि आपल्या संस्कृतीतील अमर लेणी कलावंतांनीच केलेली आहे. कलावंत त्या भावना जागृत ठेवण्याचे, त्या उदात्त ठेवण्याचे काम करितो. यांत्रिक हात अवघड वस्तूला आणि नाजूक लहान मुलाला सारख्याच निर्विकारतेणे उचलतो. कॅमेरा सुंदर फुलाला आणि ओंगळ दृश्याला त्याच अलिप्तपणे टिपतो. कलावंताचे तसे नसते. कलावंताच्या प्रत्येक कृतीला भावनेचा स्पर्श झालेला असतो. म्हणून ज्याची कृती जिवंत वाटते, ती रसास्वादाचा आनंद देण्यास समर्थ ठरते. कलावंताच्या कौशल्यामुळे गुलाबाचे सौन्दर्य जसे प्रत्ययास येते, तसेच ओंगळ भिकाऱ्याच्या सौन्दर्याचा आगळावेगळाचं साक्षात्कार घडतो. कलावंत माणसाला रसिकतेने, आनंदाने जगायला शिकवितो. कलावंत नसतील तर माणसाचे जीवन वैराण मरुभूमी होऊन जाईल. कलावंताने केलेली सुंदर कलाकृती मानवाच्या निष्पर्ण आणि रखरखीत जीवनात भावनांचा ओलावा व हिरवळ निर्माण करते.
कलावंताच्या किमयेने सामान्य नराचा नारायण होतो. मानवी सौन्दर्य कलावंतांनी विकसित केले आहे. कलावंत नसते तर निरनिराळ्या आकाराच्या वस्तू, निरनिराळे नयनमनोहर रंग, वेड लावणारे सूर, आकर्षक वेशभूषा, केशभूषा यांतील सौन्दर्याचा आस्वाद आपण घेऊ शकलो नसतो. माणूस पुण्याच्या, मोक्षाच्या कल्पनेने सत्कर्मास प्रवृत्त होतो. या पापपुण्याच्या कल्पना, चारमुक्ती, सप्तस्वर्ग, तिन्हीलोक म्हणजे कलावंतांचा रम्य कल्पनाविलास होय. कलावंत नसते तर सत्कर्म-कुकर्मांचा विधी निषेध राहिला नसता. आणि मानव हा दानव झाला असता. जीवन रटाळ, रुक्ष, कंटाळवाणे झाले असते. जगण्यातील आनंद संपला असता आणि पशुसदृश्य आयुष्याचा कंटाळा येऊन मानवाने हरघडी मनुष्याला साद घातली असती. कलावंतांनी मानवी आयुष्य व्यापून टाकलेले आहे. म्हणूनच कलावंतांची महती सांगताना, केशवसुत यतार्थपणे म्हणतात –
” आम्हांला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे,
आम्हांला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे ”