Way to Eternal Peace –
There are several ways to get eternal peace such as meditation, prayer. meditation towards ulmighty leads to calmness and serenity for one’s mind. Inner peace (or peace of mind) refers to a state of being mentally and spiritually at peace, with enough knowledge and understanding to keep oneself strong in the face of discord or stress.
हृदयस्थ परमात्म्याच्या अधिकाअधिक निकट जाण्याचा आपण प्रयत्न करुया. सुख, शांती, समाधान आपल्याला मिळावे असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी ते जीवापाड आणि आटोकाट प्रयत्न देखील करतात. तथापि हे सुख किती जणांच्या वाट्याला येते ?
भौतिक सुखापेक्षा अध्यात्मिक, आत्मिक आनंद हा कितीतरी श्रेष्ठ प्रतीचा आहे. अध्यात्म अथवा परमार्थ विचार हे केवळ तत्त्वचर्चा किंवा वाणीविलास करण्यासाठी नसून आचरणात उतरविण्यासाठी असतात. ‘आपुला आपणासी विसर हे महापाप’ अर्थात आपण कोण आहोत याचे भान नसणे, आपण म्हणजे नश्वर देहरूप नसून आत्मरूप आहोत ही ओळख नसणे हे पापच आहे.
सरावाने साधना सुलभ होते. प्रथम त्यात मन रमत नसले तरी नंतर मात्र गोडी वाटायला लागते. साधना ही आत्मोन्नतीचे साधन होय. संसारही स्वप्नवत आहे. ब्रम्हज्ञान अथवा आत्मबोध हीच खरी जागृती. उपासनेने साधक स्वरुपाकार बनतो. शुद्ध चरणी मनुष्य परमात्मपदाला पोचतो.
जन्म, मृत्यू ही जीवनप्रवाहाची प्रमुख प्रवेशद्वारे होत. मन जसजसे शुद्ध, पवित्र निर्मळ होत जाते तसतसे ते एकाग्र, निव्ह्रेर, विचारशुन्य होत जाते. विचार हेच विकार. वासनाविकार, दुर्भावनाग्रस्त मन म्हणजे दु:ख आणि सरळ, निष्पाप मन म्हणजे सुख.
चारही धाम यात्रा करून जर मनाची मलीनता गेली नसेल, तसेच गंध, टिळे, माळा धारण केल्या आणि जटा वाढविल्या परंतु हृदयाला शांती, समाधान काही मिळाले नाही तर काय अर्थ साकारलात म्हणावे? वेद, शास्त्रे, पुराणे वाचलीत याचा बडेजाव माजवलात त्याचा काय अर्थ? हे सर्व अनर्थ होय.
अध्यात्मिक जीवनासाठी प्राकृतिक बनावे लागेल. दु:ख हेच देवदूत आहेत. जीवनात दु:ख आले की न घाबरता आपल्या जीवनात देवदुतांचा सहवास लाभला असेच समजावे व त्याचा आनंदाने स्वीकार करावा. दु:ख आणि पीडा जीवनाचे अनिवार्य अंग होत. विपरीत परिस्थितीनंतरच सुख येत असते. हेच जीवनाचे चक्र आहे. मनाला आचार-विचाराच्या घोळात न घालता जीवनाचा मार्ग ध्यानातून जातो हेच योग्य आहे. ध्यान म्हणजे चित्ताचे मौन. निर्विकार, परिपूर्ण शुद्धावस्था, ध्यान आणि प्रार्थना हे एकाच ठिकाणी जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत. सुकर्म हे मनाचे भोजन होय आणि अहंकार हे इंधन होय. ध्यान आणि मौन म्हणजेच अमृत. ध्यान म्हणजे वेळ आणि स्थान याहीपलीकडे नेणारे साधन होय.
जो खऱ्या अर्थाने परमेश्वरावर निर्भर असतो त्यालाच ईश्वर चालवितो. जो ध्यानाशी परिचित आहे. त्याचे ईश्वराशी सुंदर नाते जडते. तो सर्वत्र आहे. अप्रसन्नता ही मनुष्याची सावली आहे, तिचा सहवास नको. ती सतत आपल्यामागे धावत असते. जीवन जसे आहे तसेच स्वीकारून आनंदाने, उत्साहाने जगा. हेच सत्य धर्म होय. आंतरिक शांतीशिवाय सुखाची कल्पनासुद्धा व्यर्थ होय. मनाला वशमध्ये ठेवल्यास आंतरिक शांती मिळेल. भौतिक सुखसुविधात शांती कधीच नसते कारण मनाची जशी चेतना तसेच कर्म फळ प्राप्त होते. तेव्हा चांगल्या कर्माकरीता मनातील चेतना शुद्ध असावी लागणार आहे.