नागपूर- शिवणगावचा ४८ कोटींचा मोबदला मार्गी
ऐनवेळी निकष बदल्याने शिवणगावातील मिहानग्रस्त मोबदल्यापासून वंचित राहत होते. मात्र आता अशा ११०४ प्रकल्पग्रस्तांच्या ४८ कोटी रुपयांच्या मोबदल्याचा मार्ग मोकळा होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सोमवारपासून मिहानग्रस्तांसाठी विशेष शिबिर थेट गावातच लावले जाणार आहे. निकष बदलांमुळे अनेक गावकरी मोबदल्यापासून वंचित राहत असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने २६ डिसेंबर २०१३ ला प्रकाशित केले होते. त्याची दखल घेते हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मिहान व सेझग्रस्तांच्या बहुतेक समस्या आता मार्गी लागल्या आहेत. केवळ शिवणगावातील नागरिकांच्या काही समस्याच तेवढ्या बाकी आहेत. त्यामुळे त्यांनी आंदोलन करून टॅक्सी वेचे बांधकाम रोखले आहे. ‘ मटा ‘ नेदेखील हा मुद्दा उचलून धरला होता. याबाबत विमानतळ प्रभागातील भाजप नेते विजय राऊत व अन्य गावकऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एमएडीसीचे उपाध्यक्ष तानाजी सत्रे यांची बुधवारी भेट घेतली. त्यावेळी गावकऱ्यांनी बैठकीत मिहानच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला. अखेर सत्रे यांच्या सूचनेनुसार सोमवारपासून हे विशेष शिबिर गावातच सुरू होत आहे.
दहा दिवसांत निपटारा
२००२ पासून तब्बल ११ वर्षांनंतरही पूर्णपणे मार्गी न लागलेले मिहानचे भूसंपादन आता सरकारसाठी भिजत घोंगडे ठरत आहे. येणारा काळ हा निवडणुकींचा आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता महिनाभरात लागण्याची शक्यता आहे. यामुळेच मिहान-सेझ प्रकल्पातील भूसंपादन समस्यांचा निपटारा दहा दिवसात करण्याची सूचना तानाजी सत्रे यांनी प्रशासनाला केली आहे. त्याअंतर्गतच हे शिबिर होत आहे. समस्या लवकर सोडविण्यासाठीच स्वत: गावात जाऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
प्रश्न ३०० घरांचा
शिवणगावच्या लाभार्थी यादीत घोळ झाल्याने सुमारे ३०० ते ३५० घरांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. यामध्ये काहींना प्रॉपर्टी कार्ड नसल्याने अतिक्रमणधारक दाखविण्यात आले आहे , काही घरातील चार भावांपैकी फक्त एकाला शेतकरी दाखवले , काहींना शेतकरी असून बिगर शेतकरी असल्याने ३ हजारऐवजी १५०० चौरस फुटाचाच भूखंड मिळणार आहे. असे घोळ असल्याने ही कुटुंबे पुनर्वसनापासून वंचित राहण्याची भीती आहे.
शिबिरात काय होणार ?
आखिव पत्रिकेऐवजी सुयोग्य दस्तावेज सादर केल्यास ताबा वहिवटदारासही मोबदला मिळणार
विस्तारित गावठाणातील अतिक्रमण दाखवलेल्या घरांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
वडील-आजोबा अथवा त्याआधीच्या नावे आखिव पत्रिका असल्यास कुटुंबातील सर्वच भावांचे आखिव पत्रिकेवर नाव येणार
शेतकरी असताना बिगर शेतकरी असल्याची नोंद बदलणार
अधिकाधिक लोकांना ३ हजार चौरस फुटाचा भूखंड मिळणार