रस्ता सुधारा किंवा टोल काढा
महाराष्ट्रात राज्य सरकारच्या टोलविरोधात सध्या सर्वत्र आंदोलन सुरू आहे. जनतेचा हाच रोष केंद्र सरकारच्या टोलवर केंव्हाही उलटू शकतो. त्यामुळे आत्ताच रस्ता सुधारा किंवा टोल काढा , असा इशारा विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनने (व्हीटीए) यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिलेला आहे. या संदर्भात ‘ मटा ‘ ने दिलेल्या वृत्तानंतर व्हीटीएने राष्ट्रीय महामार्गांचा विषय उचलून धरलेला आहे.
व्हीटीएचे अध्यक्ष जे.पी. शर्मा व सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग ७वरील दोन टोल नाक्यांबाबत प्रकल्प व्यवस्थापक एम. चंद्रशेखर यांची नुकतीच भेट घेतली आहे. या महामार्गावरील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर व दारोडा येथील टोल नाका अत्यंत चुकीचा आहे. एनएचएआयच्या नियमानुसार या टोल नाक्याच्या दोन्ही बाजूकडील ५०० मीटर अंतरापर्यंतच्या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी टोल आकारणाऱ्या कंपनीची असते. ज्या रस्त्यासाठी टोल घेतला जात आहे , तो दुरूस्त करण्याचे काम एनएचएआयचे आहे. मात्र केळापूर, दारोडा व नागपूरच्या उत्तर भागातील सिवनी येथील टोल नाक्याजवळील रस्त्याची स्थिती तर फार भयंकर आहे. दारोडा टोल नाका असलेल्या बोरखेडी-वडनेर रस्त्याची स्थिती तर भयावहच आहे. अवजड वाहने पाच किमी प्रती तास वेगापेक्षा अधिक धावू शकत नाहीत. खड्ड्यांपासून वाचण्यासाठी यवतमाळ अथवा वणीमार्गे लांबचा रस्ता पकडून जावे लागते. या सर्वांवर तात्काळ उपाय करण्याची गरज आहे, असे सांगितले जात आहे.
व्हीटीएची मागणीवर चंद्रशेखर म्हणाले, ‘ दारोडा येथील रस्त्याचे काम कंत्राटदाराने बंद केले आहे. त्याबाबत विचार सुरू आहे. सिवनी येथील रस्त्याबाबत वन विभागाच्या मंजुरीचा अडथळा येत आहे. हे दोन्ही विषय लवकरच मार्गी लावले जातील.