नागपूर मेट्रोच्या दोन मार्गांना मंत्रिमंडळाची मान्यता
नागपूर शहरातील दोन मेट्रो मार्गांना बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. नागपूर शहरातील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर असे हे दोन मेट्रो मार्ग आहेत. या मार्गांची लांबी एकूण ३८.२ किलोमीटर असून, हा प्रकल्प सहा वर्षांत पूर्ण करण्यात येणार. या संपूर्ण प्रकल्पासाठी ८ हजार ६८० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे. या दोन्ही मार्गिकांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे.
नागपूर मेट्रोसाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीस हा प्रकल्प अंमलबजावणी संदर्भातील अधिकार देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ही कंपनी स्थापन होईपर्यंत नागपूर सुधार प्रन्यास या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन संस्था म्हणून काम पाहील.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये केंद्र शासनाचा २० टक्के तर राज्याचा २० टक्के वित्तीय सहभाग आणि नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांचा प्रत्येकी ५ टक्के वित्तीय सहभाग असेल आणि उर्वरित ५० टक्के कर्ज आणि इतर स्रोताद्वारे उभारणी करण्यात येणार आहे.