उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आमदारांचा नरेंद्र मोदींच्या आग्रा येथील सभेत जाहीर सत्कार करण्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. आ. संगीत सोम आणि आ. सुरेश राणा अशी या आमदारांची नावे असून मुजफ्फरनगर दंगलीत सोम यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडीओ अपलोड केला होता. तर राणा यांनी दंगल भडकावणारे भाषण केले होते.
उत्तरप्रदेशमधील आग्रा येथे आज (गुरुवारी) भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेत मोदी मंचावर येण्यापू्र्वी भाजपने दंगलीचा आरोप असलेल्या दोघा आमदारांचा पाठ थोपटली. हे दोघेही आमदार मुजफ्फरनगर दंगलीप्रकरणी नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. तर भाजपचे उत्तरप्रदेशमधील नेते कल्याण सिंह यांनीदेखील मुजफ्फरनगर दंगलीवर भाष्य करताना प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते असे सूचक विधान प्रतिक्रिया नको असेल तर आधी क्रिया थांबवा असा टोला समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांना लगावला आहे.
दरम्यान या सभेत नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षावर टीका केली. तरुणांची सर्वाधीक लोकसंख्या असलेल्या भारतात बेरोजगारी वाढत असून तरुणाईचे जगणे कठीण झाले आहे. मात्र लखवा मारलेल्या केंद्र सरकारचे याकडे लक्ष नसल्याचे मोदींनी सांगितले. तर काही वर्षानंतर जगातील पर्यटन व्यवसाय तीन ट्रीलियन डॉलर्स होईल असे सांगतात. पण याचा फायदा आग्रासारख्या पर्यटन स्थळाला होणार नाही. जगभरातील पर्यटक आग्रा येथे असताना या शहरात विमानतळ नाही, शेजारुन नदी वाहत असूनही पिण्यासाठी पाणी नाही अशी खंत व्यक्त करत यासाठी समाजवादी पक्ष आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही मोदींनी केला. काँग्रेस, समाजवादी आणि बहुजन समाजवादी हे तिन्ही पक्ष केवळ व्होट बँकेचे राजकारण करत असल्याचे मोदींनी सांगितले.
News for narendra modi agra rally, Bharatiya Janata Party’s prime ministerial candidate Narendra Modi is addressing the “Vijay Shankhnaad” rally in Agra.