निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसला जनता आठवते, मात्र त्यानंतर ते मतदारांना विसरून जातात अशी टीका भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. मध्य प्रदेशमध्ये २५ नोव्हेंबर रोजी होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शहादोल येथील सभेत बोलत होते. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने गरीब, आदिवासींना अनेक आश्वासने दिली, मात्र गेल्या ५० वर्षात ती कधीही पूर्ण झाली नाही. मात्र अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळात आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय आले, नव्या योजना आखल्या गेल्या, बजेटमध्येही त्यांच्यासाठी खास सुविधा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे जेथे जेथे राज्य आहे, तेथील आदिवासींची अवस्था हलाखीची असल्याचे सांगत, मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. शिवराज सिंह चौहान यांनी आदिवासींसाठी मेडिकल आणि इंजिनियरींग कॉलजेस उघडली आणि तरूणांना नवी संधी उपलब्ध करू दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. काँग्रेस गरीबांना मदतीचे आश्वासन देते, पण देशातील गरीबांना भीक नको आहे, तर त्यांना फक्त कामाची संधी हवी असल्याचे ते म्हणाले. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास, ते मातीतूनही सोने पिकवू शकतील, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. जर शरीराचा एखादा भाग दुर्बल असेल, तर ते शरीर कमकुवत ठरवले जाते, तसेच एखाद्या देशातील एक राज्य कमकुवत असेल, तर ते राष्ट्रही कमकुवतच ठरवले जाते असे सांगत भाजपला सर्व गावांचा, राज्यांचा, सर्व जमातींचा संपूर्ण विकास करून राष्ट्राचा विकास करायचा आहे, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने विविध राज्यांत विविध आश्वासने दिली, माझे त्यांना एवढेच सांगणे आहे, जेथे तुमचे सरकार आहे, तेथे तरी आधी ही आश्वासने पूर्ण करून दाखवा, मग दुस-या राज्यांतील लोकांशी बोला. काँग्रेसचे लोक मत मागायला येतात, तेव्हा अभिवादन करताना एक हात हलवतात, पण सत्तेवर आल्यावर दोन्ही हातांनी लुटतात, असे सांगत धोका देणा-या, आपली वचने मोडणा-या काँग्रेसशी तुम्हीही तुमचे नाते तोडा आणि भरपूर मतांनी भाजपला विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.