चाहत्याकडून धमक्या येत असल्याने अभिनेता-मॉडेल जॉन अब्राहम हैराण झाला आहे. जॉनला भेटण्यासाठी त्याचा चाहता जॉनचे आईवडील, पीए व ड्रायव्हरला फोन करून धमक्या देत आहे.
त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जॉनला फोन न करता त्याच्यासाठी इतरांशी संपर्क साधणारा माथेफिरू असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीपासून जॉन अब्राहमच्या ड्रायव्हरला फोन करून ‘जॉनसे मुलाकत करके दे, वरना तुझे जानसे मार दुंगा’ असे धमकाविले होते. त्यानंतर त्याच्या पीएच्या मोबाइलवर व जॉनच्या घरच्या नंबरवर फोन करून भेट घालून देण्यासाठी धमकावित होता. घरी वयस्कर आईवडील असल्याने त्यांना काही त्रास होऊ नये, म्हणून या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.