अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाने शुक्रवारी नवीन वळण घेतले. जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे वृत्त आहे.
३ जुलैरोजी अभिनेत्री जिया खानने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जियाचे आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजशी प्रेमसंबंध होते. यामध्ये दुरावा निर्माण झाल्याने निराश झालेल्या जियाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सूरजला अटकदेखील केली होती. सध्या सूरज जामीनावर तुरुंगातून सुटला आहे. मात्र या प्रकरणाचा तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानाच गुरुवारी जियाच्या कुटुंबियांनी हायकोर्टात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका दाखल केली आहे. जिया खानच्या कुटुंबीयांचे वकिल मनिष तिवारी यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत काही पुरावे सादर केले आहेत. मात्र या याचिकेत त्यांनी हत्येचे संशयीत म्हणून कोणाचेही नाव जाहीर करणे त्यांनी टाळले आहे. घटनेच्या तब्बल तीन महिने लोटल्यावर जियाच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप का केला, ऐवढे दिवस त्यांनी याबबात भाष्य का केले नाही असा सवाल एका पोलिस अधिका-याने उपस्थित केला आहे.
जियाच्या कुटुंबीयांनी घेतलेले आक्षेप
जियाच्या मृतदेहाची काही छायाचित्र त्यांनी सादर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये जियाच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आहेत.
जियाच्या मानेवर, खांद्यावर मारहाणीचे वळ असल्याचे यात दिसते. तसेच जियाच्या मानेवर गळफास घेतल्याने वळ आले आहेत. मात्र गळफास घेताना ‘V’ आकारात गळ्यावर वळ येतात. मात्र जियाच्या गळ्यावर गळफासाचे वळ सरळ आहेत.
जियाने पंख्याला लटकून गळफास घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पंखा उंचीवर असून पंख्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जियाला स्टूलचा वापर करणे भाग होते. मात्र घटनास्थळावरुन पोलिसांना स्टूल मिळालेला नाही.
जियाच्या घरात दोन ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. आत्महत्या करताना रक्तस्त्राव होत नाही.
जियाच्या घरातील एसी ऑन होता. तसेच खिडक्या उघड्या होत्या. त्यामुळे मारेकरी खिडकीव्दारे घरी आले असावे अशी शंका उपस्थित होत आहे.
पोलिसांनी या सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष करुन तपास न करता आत्महत्येची नोंद कशी केली असा सवाल जियाच्या वकिलांनी उपस्थित केला आहे.